ताज्या बातम्या

गेवराई तालुक्यात कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

सात महिन्यात जिल्ह्यात ११५ शेतकर्‍यांनी संपवले जिवन

बीड/गेवराई (रिपोर्टर):- राज्य सरकारने शेतकर्‍यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले असले तरी शेतकरी आत्महत्येचे सत्र अद्यापपर्यंत थांबलेले नाही. गेवराई तालुक्यातील एका ३५ वर्षीय तरुण शेतकर्‍याने रात्री विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. गेल्या सात महिन्यात जिल्ह्यात ११५ शेतकर्‍यांनी कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून आपले जिवन संपवलेले आहे. मराठवाड्यासह राज्यभरात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. भाजप सरकारने शेतकर्‍यांचे दीड लाख रुपयांचे कर्ज माफ केलेले आहे. कर्ज माफीनंतरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नसून गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत बीड जिल्ह्यात ११५ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. यात ८६ शेतकर्‍यांच्या आत्महत्या पात्र असल्याचे दाखवण्यात आले असून सात प्रकरणे अपात्र दाखवण्यात आले तर २२ प्रकरणांबाबत पोलिस प्रशासनासह महसूल विभागाची चौकशी सुरु आहे. शेतकरी आत्महत्या थांबवण्याचे आश्‍वासन राज्य सरकारने दिले होते, मात्र आत्महत्येचे सत्र थांबत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेवराई तालुक्यातील खांडवी येथील एका तरुण शेतकर्‍याने रात्री विषारी औषध प्राशन केले. विनायक विश्‍वनाथ नाईकवाडे या शेतकर्‍याकडे फक्त दीड एकर शेती आहे. या शेतीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून त्याला उत्पन्न निघाले नसल्यामुळे तो कर्जाच्या विळख्यात अडकला होता. आज सकाळी त्याचा मृतदेह शेतामध्ये आढळून आला. विषारी औषध पिऊन या शेतकर्‍याने आपले जिवन संपवले. घटनेची माहिती गेवराई पोलिसांना कळवण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात गेल्या सात महिन्यात जवळपास ५०० पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केलेल्या आहेत.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review