ताज्या बातम्या

आष्टीत सत्तेपुढे शहानपणा चालेना !

पोलिसांनी शिंदेंचं उपोषण उधळून लावलं

प्रकृती खालावल्याचे कारण पुढे करत शिंदेंना नजरकैदेत ठेवले

उपोषणस्थळाचा पँडॉल पाडून टाकला; आज सकाळी उपोषणाला बसायला येणार्‍या समर्थकांनाही पिटाळून लावलं

आष्टी/बीड (रिपेार्टर):- आ. सुरेश धसांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत धसांविरोधात गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी आष्टी तहसीलसमोर उपोषणाला बसलेले सतीश शिंदे यांना रात्री पोलिसांनी अक्षरश: दंडेलशाहीचा वापर करत प्रकृती खालावल्याच्या नावाखाली बीडच्या जिल्हा रुग्णालयात पाच-पंचवीस पोलिसांच्या नजरकैदेत ठेवले. भाजपा आमदाराविरोधा जो कोणी आवाज उठवेल, त्याचा आवाज भाजपाकडून दाबला जात असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा बीडकरांना पहावयास मिळाला. आपली प्रकृती ठणठणीत असताना पोलिसांनी उपोषणस्थळाचा पँडॉल पाडून आपल्याला बळजबरीने रुग्णालयात नजरकैदेत ठेवल्याचा आरोप सतीश शिंदेंनी केला असून धसांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे शिंदेंनी म्हटले. गल्ली ते दिल्ली भाजपाची मुस्कटदाबी सुरू असल्याच्या अनेक घटना देशभरात घडताना दिसून येत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी आष्टीत तालीम पाडण्यात आल्यानंतर सतीश शिंदे विरुद्ध आ. सुरेश धस असा वाद झाला. या वेळी शिंदे यांनी सुरेश धस यांच्याविरोधात गंभीर आरोप करत त्यांनी आपल्याला बंदूक लावली. मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली, अशा आशयाची तक्रार पोलिसात दिली. मात्र पोलिसांनी शिंदे यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. उलट काल मध्यरात्री ज्या ठिकाणी सतीश शिंदे धसांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी उपोषणाला बसले होते त्या तहसीलसमोर आष्टी पोलिस ठाण्याचे पीआय सय्यद, गुन्हे अन्वेषण विभागाचे पाळवदे आणि डीवायएसपी शंभर-पन्नास पोलिसांचा फौजफाटा घेऊन उपोषणस्थळी गेले. त्याठिकाणी सतीश शिंदे यांना प्रकृती खालावल्याचे निमित्त करत त्यांना बळजबरीने ऍम्ब्युलन्समध्ये बसवलं. शिंदेंसोबत असलेल्या उपोषणकर्त्यांना त्या स्थळावरून पिटाळून लावलं. उपोषणाचा पँडॉल पाडून टाकला. जेव्हा सतीश शिंदेंना घेऊन पोलिस बीडला येत होते तेव्हा शिंदे यांनी एक व्हिडिओ व्हायरल तयार केला त्यामध्ये धस यांनी माझ्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावली ,मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकीही दिली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, या पाठोपापाठ अन्य विषयांवरही त्यांनी भाष्य केले. मध्यरात्री दरम्यान पोलिसांनी शिंदेंना बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु पोलिसांनी शिंदेंना पाच पंचवीस पोलिसांच्या नजरकैदेत ठेवल्याचा आरोप केला जात आहे. रिपोर्टरशी बोलताना शिंदे यांनी धसांवर गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका घेतली. सध्या शिंदे हे पोलिसांच्या नजरकैदेत असून आज सकाळी तहसीलसमोर उपोषणाला बसण्यासाठी गेलेल्या शिंदे समर्थकांना पोलिसांनी उपोषणाला बसू दिले नाही.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review