ताज्या बातम्या

हुमणी उसाच्या फडाचा फडशा पाडू लागली

 शेकडो हेक्टरमधील उसाचे नुकसान ९६०३२ लाच लागली किड

बीड (रिपोर्टर):- ऊस उत्पादक शेतकर्‍यांवर यंदा हुमणी अळीचे संकट आले. फडचे फड अळी फस्त करू लागल्याने शेतकर्‍यांत चिंता व्यक्त केली जात असून केवळ कारखानदारांच्या हट्टापायी ९६०३२ या जातीचा ऊस लावल्याने याच जातीच्या उसाला अळीची किड लागली. २६५ जातीच्या उसाला मात्र किड लागलेली नाही. हुमणीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी संघटनेचे गंगाभीषण थावरे यांनी केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली. माजलगाव, गेवराई, अंबाजोगाई, परळी, बीड या तालुक्यात उसाचे क्षेत्र गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात वाढले. कारखानदारांनी गतवर्षी २६५ या जातीचा ऊस लावू नये, असे आवाहन शेतकर्‍यांना केले होते. या वाणाऐवजी शेतकर्‍यांनी ९६०३२ या जातीचा ऊस लावला. मात्र या उसाला हुमणी अळी लागल्याने उसाचे फड सुकून जावू लागले. यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून या अळीच्या प्रादूर्भावामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. २६५ जातीच्या उसाला मात्र अळी लागली नाही. आता ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले त्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देणार कोण? असा प्रश्‍न निर्माण होत असून शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाई गंगाभीषण थावरे यांनी केली असून त्यांनी याबाबत साखर संचालकांकडे निवेदन दिले आहे. माजलगाव तालुक्यात अळीमुळे मोठ्या प्रमाणात उसाचे नुकसान झाले. कारण या परिसरात उसाचे क्षेत्र जास्त आहे.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review