ताज्या बातम्या

गेवराईत कत्तीने वार करून एकाचा खून

मध्यरात्री घडली संजयनगर भागात घटना 
पोलिसांनी पाठलाग करून आरोपी केला जेरबंद

गेवराई (रिपोर्टर):- धाब्यावर बसलेल्या दोघा जणांमध्ये वाद निर्माण होऊन हा वाद त्याठिकाणी मिटला मात्र पुन्हा रात्री सदरील वाद उफाळून आला. एकाने दोघा जणांवर कत्तीने मार केला. यात एकाच्या पायावर गंभीर मार लागल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना रात्री अकरा वाजता शहरातील संजयनगर भागात घडली. घटनेनंतर या प्रकरणातील आरोपी फरार होण्याच्या प्रयत्नात होता मात्र पोलिस निरीक्षक दिनेश आहेरसह त्यांच्या टीमने आरोपीचा पाठलाग करून त्याला जेरबंद केले. 
आकाश ऊर्फ बाब्या श्रीराम जाधव (वय २०, रा. शिवाजीनगर, गेवराई) व विनोद जोगदंड हे दोघे बीड रोडवर असलेल्या पेंडगाव रोडवरील विक्रांत हॉटेलवर जेवण करण्यासाठी आले होते. या ठिकाणी दोघांमध्ये वाद निर्माण झाला मात्र हा वाद तेथेच मिटवण्यात आला. आकाश जाधव याने विनोद जोगदंड याला घरीही सोडले मात्र त्यानंतर काही वेळाने विनोद जोगदंड याने आकाश जाधव याला संजयनगर भागामध्ये बोलावून घेतले. आकाश सोबत त्याचा मेहुणा सचिन गायकवाड आला होता. याठिकाणी पुन्हा दोघांमध्ये वाद निर्माण झाला. हे दोघे काही बोलायचे आहे म्हणून बाजुला गेले. त्यावेळेस विनोद जोगदंड याने आकाश जाधव याच्यावर कत्तीने वार केला. यांच्यामध्ये  मध्यस्थी करण्यासाठी आकाशचा मेहुणा सचिन गायकवाड हा धावून आला. मात्र त्याच्यावरही विनोद जोगदंड याने वार केले. यात सचिन गायकवाड गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला गेवराईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र तत्पूर्वीच तो मयत झालेला होता. घटना घडल्यानंतर आरोपी विनोद जोगदंड पळून जाण्याच्या बेतात होता मात्र गेवराई पोलिसांनी त्याला मनियारवाडी शिवारामध्ये जेरबंद केले. ही कारवाई पो.नि. दिनेश आहेर, पो.कॉ. नारायण खटाणे, रणजीत पवार, बावणकर, मदने यांनी केली. या घटनेने गेवराई शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विनोद जोगदंड याच्याविरोधात कलम ३०२, ३०७, ३२३ भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास भूषण सोनार हे करत आहेत. 

अधिक माहिती: Gevrai

Best Reader's Review