ताज्या बातम्या

गेवराईत दोन ठिकाणी चोर्‍या १० तोळे सोन्याच्या दागिन्यांसह नगदी ४० हजार रुपये पळविले

 नगराध्यक्षांचे घरही फोडण्याचा केला प्रयत्न

गेवराई (रिपोर्टर):- घराच्या पाठीमागून चढून आतमध्ये प्रवेश करत आतील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह नगदी रक्कम चोरून नेल्याची घटना रात्री घडली. त्यानंतर अन्य एका घरातही चोरट्याने चोरी केली. दोन्ही घरातील मिळून दहा तोळे सोन्याचे दागिने व नगदी ४० हजार रुपयांपेक्षा जास्तीचा ऐवज चोरून नेला. नगराध्यक्ष जवंजाळ यांच्या घरीही चोरीचा प्रयत्न झाला. आज सकाळी घटनास्थळी डीवायएसपींसह आदी पोलिस कर्मचार्‍यांनी भेटी देऊन तपासासाठी श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. कैलास भगवानराव जाधव (रा. सावतानगर, गेवराई) यांच्या घराच्या पाठीमागील भिंतीवर चढून आतमध्ये प्रवेश करत चोरट्यांनी कपाटामधील आठ तोळे सोन्याचे दागिने व नगदी तीन हजार रुपये चोरून नेले. त्याचबरोबर श्याम सुरेश पारखे यांच्या घरातही चोरी करून घरातील नगदी चाळीस हजार व दोन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरट्यांनी नगराध्यक्ष सुशिल जवंजाळ व अनिल जवंजाळ यांच्या घरी चोरीचा प्रयत्न केला मात्र त्याठिकाणी चोरट्यांना चोरी करण्यात यश आले नाही. या चोर्‍या मध्यरात्री दोन वाजण्याच्या दरम्यान झाल्या. सकाळी पोलिसांना कळविल्यानंतर डीवायएसपी अर्जुन भोसले, पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, दरोडा प्रतिबंधक विभाग, फिंगर प्रिंट आणि श्‍वानपथकाने घटनास्थळी जावून पाहणी केली. या प्रकरणी गेवराई पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review