ताज्या बातम्या

कॉंग्रेससह समविचारी पक्षांचा उद्या बंद

मोदींच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्याचे कंबरडे मोडले-कॉंग्रेस

बंदला राष्ट्रवादी, शेकाप, शेतकरी संघटनासह आदींचा पाठींबा

बीड (रिपोर्टर):- केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले. तेलाचे भाव रोजच वाढत असल्याने वाहन धारकामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ज्या मोदी सरकारने अच्छे दिनचे आश्‍वासन दिले होते ते अच्छे दिन तर आलेच नाही. उलट बुरे दिन आले असून शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ उद्या कॉंग्रेस पक्षाच्यावतीने भारत बंदचे आवाहन करण्यात आले असून या बंदला समविचारी पक्षाने पाठींबा दिला असल्याचे सांगत बीडमध्येही बंद यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पापा मोदी यांनी केले. बंदच्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह येथे आज दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला कॉंग्रेसचे टी.पी.मुंडे, माजी आ.सिराज देशमुख, न.प.चे उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर, अशोक हिंगे, बाळासाहेब घुमरे, गंगाधर घुमरे, माजी जिल्हाध्यक्ष काळे, महादेव धांडे, दादासाहेब मुंडे, कुंदाताई काळे, डॉ.हाश्मी, स्वाभिमानीचे करपे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना पापा मोदी म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारने आजपर्यंत लोकांची दिशाभूल केली. जे स्वप्न दाखवण्यात आले होते ते पूर्णत: चुकीचे होते. अच्छे दिनचा नारा दिला गेला होता. अच्छे दिन तर दूरच मात्र बुरे दिन पहावयाला मिळत आहे. वाढती महागाई दुष्काळी परिस्थिती आणि नापिकी, शेती मालाला न मिळणारा भाव यामुळे सर्व सामान्यासह शेतकरी वर्ग संकटात सापडलेला आहे. या सगळ्या प्रश्‍नाचा जाब विचारण्यासाठी आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी उद्या भारत बंदचे आवाहन कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आलेले आहे. या बंदला समविचारी पक्षाने पाठींबा दिला आहे. बीड जिल्ह्यातही बंद यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शेकाप व इतर पक्षाने पाठींबा दिला असल्याचे सांगून उद्याच्या बंदमध्ये सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन पापा मोदी यांनी केले आहे.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review