ताज्या बातम्या

रहिवाशी एका गावचा,जमिन दुसर्‍या गावी  असल्याने शेतकर्‍याला बँक पीक कर्ज देईना

शेतकऱ्यानी घेतली जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव 
बीड (रिपोर्टर):- गेवराई तालुक्यातील वाहेगाव आम्ला येथील एका शेतकर्‍याची जमिन शेजारील गाव सुलतानपुर येथे आहे. सदर शेतकर्‍याला पीक कर्ज हवे असून सुलतानपुरला दत्तक बँक असलेल्या हिरापुरच्या एसबीआय शाखेत त्याला ते कर्ज नियमाप्रमाणे मिळायला हवे. मात्र सदर शेतकर्‍याला हिरापुर शाखेने तुम्ही सुलतानपुरचे रहिवाशी नसल्यामुळे  कर्ज देता येणार नाही. असे सांगून तुमचे गाव दत्तक असलेल्या एमजीबी जातेगाव शाखेकडून कर्ज घ्यावे असे सुचवले. सदर शेतकर्‍याल एमजीबी शाखेने सुलतानपुर आमच्या क्षेत्रात येत नसल्याचे सांगून रिकाम्या हाती परत पाठवले. दोन्ही बँकेत चकरा मारून त्रस्त झालेल्या शेतकर्‍याने शेवटी काल जिल्हाधिकार्‍यांकडे पीक कर्जाची कैफियत मांडत कोणत्याही एका शाखेतून कर्ज द्यावे अशी मागणी केली आहे. 
वाहेगाव आम्ला येथील तुकाराम ज्ञानोबा राऊत यांची शेती शेजारील सुलतानपुर या गावात आहे. तुकाराम राऊत यांना पीक कर्ज काढायचे होते. त्यामुळे त्यांनी सुलतानपुर गाव दत्तक असलेल्या हिरापुर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेशी संपर्क केला. मात्र या शाखेने तुम्ही वाहेगाव आम्ल्याचे रहिवाशी असल्याने तुम्हाला जातेगाव येथील एमजीबी शाखेतूनच कर्ज घ्यावे लागेल असे सांगितले. सदर शेतकर्‍याने जातेगाव येथील एमजीबी बँकेच्या मॅनेजरशी पीक कर्जाची मागणी केली असता सदर शेतकर्‍याला तुमची जमिन सुलतानपुरमध्ये येत असल्याने तुम्हाला एसबीआयच्या हिरापुर शाखेतूनच कर्ज घ्यावे लागेल असे उत्तर मिळाले. सदर शेतकरी गेल्या दोन महिन्यापासून दोन्ही शाखेत चकरा मारत होता. काल तुकाराम राऊत यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे दोन्ही शाखा कर्ज देत नसल्याची तक्रार करत कोणत्याही एका शाखेतून पीक कर्ज द्यावे अशी मागणी केली आहे. अशा प्रकारचे कित्येक प्रकरण सध्या जिल्ह्यात दिसूून येत असून रहिवाशी एका गावचे व जमिन दुसर्‍या गावी असलेल्या शेतकर्‍यांना बँक कर्मचार्‍यांच्या आरेरावी वृत्तीमुळे पीक कर्जाविनाच रहावे लागते. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review