आ. धोंडेंच्या घराशेजारील दुकान फोडलं, आ. धसांच्या पीएच्या कार्यालयातही धुडगूस

 

आष्टीत पाच, कड्यात नऊ तर धानोर्‍यात एक दुकान फोडले

आष्टी (रिपोर्टर):- आष्टी, कडा, धानोरा याठिकाणी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत एक नव्हे दोन नव्हे तब्बल पंधरा दुकाने फोडून आतील हजारो रुपयांचा माल लंपास केला. या चोरीच्या घटनेने तालुक्यात व्यापार्‍यांसह नागरिकांत एकच खळबळ उडाली. चोरट्यांनी एकाच रात्री पंधरा ठिकाणी चोर्‍या करून पोलिस प्रशासनाला एकप्रकारे आव्हानच दिले. सकाळी या चोरीच्या घटनेची माहिती पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून घटनेचा पंचनामा केला होता. आ. भीमराव धोंडे यांच्या घराच्या शेजारी असलेल्या माऊली ऑप्टीकल्स या दुकानाचे शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करत दुकानातील पाच हजार रुपयांचा माल लंपास केला. त्याचबरोबर साई मेडिकलमधून पंधरा हजाराचा माल पळवला. गणपती मंदिर परिसरात असलेल्या आ. सुरेश धस यांचे पीए अशोक पवार कार्यालयही चोरट्यांनी सोडले नाही. कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे चोरून नेले. बंडु साहेबराव तोडकर यांच्या कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात घुसून आतील फर्निचरची तोडफोड करण्यात आली. तर राजस्थानी हार्डवेअर मशिनरी येथील दुकानातील पंधरा हजार रुपयांचा माल चोरून नेला. या पाच चोर्‍यांसह कड्यामध्येही नऊ ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. त्याचबरोबर धानोरा येथील अनघा मेडिकलमध्येही चोरी झाली असून तेथील काही माल चोरट्यांनी लंपास केला. एकाच रात्री पंधरा ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने व्यापार्‍यांसह नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी या प्रकरणाची माहिती पोलिस प्रशासनाला देण्यात आली. आष्टी ठाण्याचे पीएसआय सय्यद यांच्यासह आदींनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review