ताज्या बातम्या

शिरूरमध्ये पतीकडून आजारी पत्नीचा खून

 शिरूर (रिपोर्टर):- चारित्र्याचा संशय घेऊन वारंवार भांडण करणार्‍या आजारी पत्नीचा पतीने ओढणीने गळा आवळून खून केला. शिरूर शहराच्या मध्यवस्तीतील कुंभार आळी येथे आज सकाळी ही घटना घडली. खून केल्यानंतर पती स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला. लता संदीपान सोळुंके (वय ३२, रा. कुंभार आळी, शिरूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे बंधू पांडुरंग श्यामराव कदम (रा. मुंबई बाजार, शिरूर) यांनी दिलेल्या ङ्गिर्यादीवरून मृत लता हिचा पती संदीपान प्रभाकर सोळुंके याच्याविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आज दुपारी त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे भेंड टाकळी (ता. गेवराई, जि. बीड) येथील सोळुंके कुटुंबीय शिरूरच्या कुंभार आळी येथे दोन वर्षांपासून राहावयास होते. संदीपान सोळुंके हा रांजणगाव एमआयडीसीत खासगी कंपनीत कामाला होता. पत्नी लता यांना संधिवाताचा त्रास होता. पतीचे बाहेर संबंध आहेत, असा संशय त्या घेत होत्या. त्यामुळे पती- पत्नीत वारंवार वादावादी होत होती. रविवारी (ता. ९) रात्रीही याच कारणावरून त्यांच्यात भांडणे झाली. त्यामुळे संदीपान याने पत्नीला मारहाण केली होती. त्यानंतर आज सकाळी कंपनीत कामाला जायचे असल्याने ते पहाटे चार वाजताच उठले. परंतु, त्यांचा डबा बनविण्यासाठी व इतर आवराआवरी करण्यासाठी पत्नी लता या आवाज देऊनही उठल्या नाहीत. त्यामुळे संदीपान याने रागाच्या भरात पत्नी लता यांचा झोपेतच ओढणीने गळा आवळला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मृत लता यांचा भाऊ पांडुरंग कदम हा देखील जवळच राहात आहे. या प्रकारानंतर संदीपान स्वतः त्यांच्या घरी गेला व पांडुरंग याच्या पत्नीला स्वतःच्या घरी घेऊन आला व घडलेली हकिगत सांगितली आणि पोलिस स्टेशनला गेला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे. पोलिस निरीक्षक कैलास घोडके पुढील तपास करीत आहेत.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review