ताज्या बातम्या

मराठवाड्याच्या पाठीवर भाववाढीचा वेताळ!

इंधन दरवाढ सुरुच, परभणीत पेट्रोल ९० वर पोहचलं, देशात सर्वाधिक महाग परभणीत

बीड (रिपोर्टर):- देशभरात इंधन दरवाढीचा आगडोंब उसळला असून गेल्या १९ दिवसांपासून रोज इंधनाची दरवाढ होत असल्याने याचा फटका आता सर्वसामान्यांना बसत आहे. घरातल्या किचनपासून बाजारातल्या भाजीपाल्यापर्यंत नव्हे नव्हे तर प्रत्येक दुकानातल्या वस्तूपर्यंत इंधन दरवाढीचा फटका बसू लागल्याने सर्वसामान्यांचा खिसा खाली होताना दिसून येत आहे. मराठवाड्यात अक्षरश: वेताळागत इंधन दरवाढ सर्वसामान्यांच्या मानगुटीवर थयाथया नाचत असून बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, लातूरमध्ये इंधन दरवाढीने पेट्रोल ८७ च्या वर जावून पोहचले आहे तर देशात सर्वाधिक महाग पेट्रोल हे परभणीत ९०.३३ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच आज सलग सतराव्या दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. पेट्रोल १४ पैशाने तर डिझेल १५ पैशाने महागले आहे. यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर ८८.२६ रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर ७७.४७ रुपये प्रतिलिटर एवढा झाला आहे. तोच मराठवाड्यात दर यापेक्षा महागला असून बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, लातूरमध्ये पेट्रोल ८९.१२ पेक्षा जास्त महागला आहे तर डिझेल ७७.११ पेक्षा जास्त रुपयांवर जावून पोहचला आहे. देशात सर्वाधिक महाग इंधन हे परभणीत झाला असून याठिकाणी पेट्रोलचा भाव ९०.३३ जावून पोहचलं आहे. या इंधन दरवाढीचा देशात सर्वाधिक फटका दुष्काळी मराठवाड्याला बसू लागला आहे. बाजारातले भाजीपाले इंधन दरवाढीने चांगलेच भडकल्याचे दिसून येत आहे. इंधन दरवाढीमुळे ट्रॅव्हलिंग आणि मालवाहतूक खर्च वाढत चालल्यामुळे रोज जिवनावश्यक वस्तूंचे भावही वाढत आहे. देशभरात महागाईचा भडका उडालेला असताना सरकार मात्र इंधन दरवाढ रोखणे आपल्या हातात नसल्याचे सांगून हात झटकत असले तरी २०१४ च्या निवडणुकांमध्ये पेट्रोल, डिझेल पन्नाशीच्या आत दिले जाईल, असे आश्‍वासन भाजप सरकारने दिले होते. सुरुवातीच्या काळात क्रुड तेलाचे भाव अत्यंत नगन्य झाले असताना राज्य आणि केंद्र सरकारने यावरील अतिरिक्त कर कमी केला नव्हता. आताही तो कमी केला जात नाही. सध्या केंद्र सरकार पेट्रोलवर लिटरमागे १९ रु. ४८ पैसे तर डिझेलवर १५.३३ रुपये एक्साईस ड्युटी वसूल करीत आहे आणि राज्य सरकारने हिच एक्साइज ड्युटी पेट्रोलवर २१ रुपयांपर्यंत आणि डिझेलवर १९ रुपयांपर्यंत वसूल करत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशातून एक्साइज ड्युटी किंवा अतिरिक्त करापोटी पेट्रोल मागे ४० पेक्षा जास्त आणि डिझेलमागे ३७ रुपयांपेक्षा जास्त अतिरिक्त करत सरकारला देत आहे. अच्छे दिनची गुहार लावणार्‍या भाजप सरकारने देशभरातील सर्वसामान्यांच्या मानगुटीवर भाववाढीचा वेताळ थयाथया नाचायला मोकळा करून सोडल्याने सर्वसामान्यात सरकारविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review