जयदत्त अण्णा,पांगरी रोडचं अर्धवट काम  पुर्ण करण्याच्या सूचना गुत्तेदारांना द्या


बीड (रिपोर्टर):- बीड मतदार संघाच्या विकासासाठी आ.जयदत्त क्षीरसागर कोट्यावधी रूपयाचा निधी आणतात. मात्र त्या निधीची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते का? हे पाहिले जात नाही. आठ महिन्यापूर्वी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी बीड ते साक्षाळपिंप्री या रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ केला. या कामासाठी २ कोटी ७२ लक्ष रूपये मंजूर करण्यात आले. मात्र संबंधीत गुत्तेदाराने एक दोन किलोमीटर फक्त अर्धवट काम केले. त्यानंतर गुत्तेदार महाशय या रस्त्याकडे फिरकले नाही. संबंधीत गुत्तेदारानंा अण्णासाहेबांनी सूचना दिल्या तर बर होईल. अशी मागणी या भागातील नागरीकातून केली जात आहे. 
बीड खापरपांगरी, उमरद फाटा, पारगाव, सोनगाव, साक्षाळपिंप्री या रस्त्याची अवस्था वाईट आहे. जागोजागी खड्डे पडलेले आहे. या रस्त्यासाठी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी २ कोटी ७२ लाख रूपये मंजूर करून आणले. याचा शुभारंभ एप्रिल महिन्यामध्ये करण्यात आला. उद्घाटन झाल्यानंतर गुत्तेदाराने एक-दोन किलोमीटर अर्धवटपणे काम केले. त्यानंतर संबंधीत गुत्तेदार अद्यापपर्यंत पांगरी रोडकडे फिरकला नाही. एवढा मोठा निधी आलेला असतांना गुत्तेदाराची नेमकी अडचण काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. काम करायचंच नव्हतं तर २ किलोमीटर अर्धवट काम तरी कशाला केलं असाही सवाल उपस्थित होत असून याप्रकरणी जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी संबंधीत गुत्तेदाराला रस्त्याचे काम तात्काळ करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी केली जावू लागली. दरम्यान रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने याचा त्रास वाहन धारकांना सहन करावा लागतो. साक्षाळपिंप्रीच्या अलीकडे संबंधित गुत्तेदाराने रस्त्याच्या बाजुला नुसती खडी नेवून टाकली. ही खडी फक्त पाहण्यासाठी आहे की काय? असा ही प्रश्‍न निर्माण होत आहे. तरी सदरील रस्ता दुरूस्तीबाबतच्या सक्तीच्या सूचना गुत्तेदारांना देण्याची मागणी होवू लागली.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review