शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर माजी मंत्री सोळंकेंचा तेलगाव चौकात ठिय्या


दीड तासाच्या रस्ता रोकोने चौफाळ्यावर वाहतूक ठप्प; नाकर्त्या आमदारामुळे मतदार संघाची वाट लागली-प्रकाश सोळंके
तेलगाव/माजलगाव (रिपोर्टर):- दुष्काळी परिस्थितीत असलेल्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासह माजलगावातील शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी आज माजी मंत्री प्रकाश सोळंके हे रस्त्यावर उतरले. तेलगाव चौकात रस्ता रोको आंदोलन करून सोळंकेंनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. दीड तासाच्या आंदोलनामध्ये बीड-परळी, माजलगाव-धारूर हे दोनही महामार्ग ठप्प झाले. वाहनांच्या रांगाची रांगा लागल्या. यावेळी हजारो आंदोलक शेतकर्‍यांसमोर बोलतांना माजी मंत्री सोळंके म्हणाले की,  नागरी समस्याची कुठलीही जाण नसणारा विकास शुन्य अकार्यक्षम आमदार माजलगाव मतदार संघाला लाभल्याने यामतदार संघाची वाट लागली आहे. सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडत आहे. अशा सरकारचा धिक्कार करत न्याय हक्काच्या मागणीसाठी शेतकर्‍यांच्या पाठीशी राष्ट्रवादी खंबीरपणे उभी असून शेतकर्‍यांसाठी वेळोवेळी आपण रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
बीड जिल्ह्यात दुष्काळाने हाहाकार माजून सोडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दुष्काळ जाहीर करून महिना लोटला तरी अद्याप उपाययोजना नाहीत. माजलगावातील शेतकर्‍यांचे हाल अद्यापही सुरूच आहेत. नुसत्या घोषणा आणि आश्‍वासनावर हे सरकार शेतकर्‍यांना वेठीस धरत आहे. शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी आज रस्त्यावर उतरणं पसंत केलं. माजलगाव मतदार संघातील शेतकर्‍यांना ऑनलाईन विमा भरूनही त्यांना पैसे मिळाले नाहीत, पीक विमा नाही, बोंडअळीचे पैसे अद्याप शेतकर्‍यांना देण्यात आले नाही, जनावरांना चारा नाही, गावागावातील वाडी, वस्ती, तांड्यावर पिण्याचे पाणी नाही अशा स्थितीत आज सर्वसामान्य शेतकरी दुष्काळाशी दोन हात करत आहेत. परंतू सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करत आहेत. या गंभीर प्रश्‍नी आज माजी मंत्री सोळंके रस्त्यावर उतरले. दीड तास रस्ता रोको करून शासन प्रशासन व्यवस्थेला जाब विचारला. यावेळी बोलतांना सोळंके म्हणाले की,  मतदार संघ दुष्काळात होरपळत आहे. परंतु, आपले आमदार जनतेचे प्रश्न सोडवण्यात सपशेल अपयशी ठरलेले आहे. आज मतदारसंघात पाण्याची व चार्‍याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. परंतु आमदार म्हणून देशमुख यांनी कुठली प्रशासकीय पातळीवर उपाययोजना करण्याचे औचित्य दाखवले नाही.जनता पाण्यावाचुन तडफडत आहे.जनावरांच्या चार्‍याचा गंभीर प्रश्न आहे.तरी देखील दुष्काळ निवारण करण्याची साधी बैठक ही आमदारानी लोकप्रतिनिधी म्हणून घेतली नाही. चार वर्षे झाले तरी मतदारसंघात एकाही विकास कामाची सुरुवात यांनी केली नाही.कुठल्याही प्रशासकीय अधिकारी यांचे ऐकत नाही असा अकार्यक्षम आमदार काय कामाचा. अशा बेजबाबदार आमदाराला घरी बसवण्याची जबाबदारी  सामान्य नागरिकांनी आपल्या हाती घ्यावी असे आव्हान त्यांनी यावेळी केले. दुष्काळ गंभीर आहे त्यामुळे प्रशासनाने शेतकर्‍यांच्या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यात. नसता यापेक्षाही उग्र आंदोलन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या रास्ता रोको आंदोलनालाल सभापती अशोक डक, जयसिंग सोळंके,मनोहर डाके इत्यादी राष्ट्रवादीचे पदाधिकारीसह  मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव रस्त्यावर उतरले  होते दरम्यान दोन तास चाललेल्या या रास्तारोको आंदोलनामुळे मोट्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

अधिक माहिती: beed

Best Reader's Review