प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ऑनलाईनची मुदत फेब्रुवारी अखेर;तलाठी फिरकलेच नाहीत


अनेक गावामध्ये आजतागायत तलाठी फिरकलेच नाहीत
बीड (रिपोर्टर):- केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची ऑनलाईनची मुदत फेब्रुवारी अखेर असतांना दहा दिवस झाले तरी अनेक गावामध्ये तलाठ्यांनी याची माहिती दिली नाही. तलाठी सज्जावरच येत नाहीत त्यामुळे माहिती देण्याचा प्रश्‍नच नाही. अशा स्थितीत शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत.
केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना घोषित करून अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक शेतकर्‍यांना मदत म्हणून काही ठराविक रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दोन हेक्टरची मर्यादा निश्‍चित करण्यात आली असून गावनिहाय खातेदारांची संगणकीकृत यादी फेरफार, तलाठी अहवाल आदी कागदपत्रासह ही यादी ऑनलाईन करणे, त्यानंतर याची गावस्तरावर प्रसिद्धी करणे, या यादीचे चावडी वाचन करणे, यादी ग्रामस्थांना मान्य नसेल तर त्याचा अहवाल तालुकास्तरावर देणे असा हा कार्यक्रम फेब्रुवारी अखेर पूर्ण करायची आहे. या संदर्भात जिल्हास्तरावरून तलाठ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. काही गावचे तलाठी कामाला लागले असून ग्राम रोजगार सेवक, ग्रासेवक, सरपंच आदींच्या मदतीने यांनी काम सुरू केले आहे. मात्र अशा अनेक गावामध्ये ज्या ठिकाणी तलाठी फिरकतच नाहीत अशा गावातील लोकांना याबाबत माहिती देण्यात आली नाही. या कामासाठी तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार आदींना प्रशिक्षण देण्यात आले. अनेक गावामध्ये प्रत्यक्षात काम सुरूही झाले. मात्र काही सज्जामध्ये अद्यापही तलाठी फिरकलेच नसल्याने शेतकर्‍यांना याबाबत माहिती मिळत नाही. हे काम एक महिन्यात पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम केले तर पूर्ण होवू शकते. मात्र तलाठी या यंत्रणेतील महत्त्वाचा दुवॉं असल्याने तलाठीच हजर राहत नसेल तर काम कसे पूर्ण होणार असा प्रश्‍न ग्रामस्थ विचारत आहेत. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review