ताज्या बातम्या

पवारांच्या मुक्कामाने अनेकांच्या किल्ल्यांना हादरे

पवारांच्या मुक्कामाने अनेकांच्या किल्ल्यांना हादरे
प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पवारांचा दिवस-रात्र बजरंगासाठी
विरोधकांच्या काफिल्यात प्रचंड खळबळ, अस्वस्थता, पवारांचे खलिते अनेक सरदारांना पोहचले, अनेकांसोबत थेट संवाद, काहींना भ्रमणध्वनीवरून सूचना, ज्येष्ठांसोबत खलबत्ते, तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, राष्ट्रवादीचा उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर

बीड (रिपोर्टर):- लोकसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी अख्खा दिवस आणि रात्र बीड लोकसभा मतदारसंघाला देऊन विरोधकांच्या काफिल्यात प्रचंड खळबळ उडवून दिली. काल दिवसभरात दोन सभा अणि छावण्यांना भेटी दिल्यानंतर रात्री उशिरा बीडमधील पंडितांच्या शिवछत्रावर जिल्हाभरातील अनेकांसोबत गुफ्तगू करत बजरंग सोनवणेंच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आज सकाळी साडेसात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत अनेकांच्या भेटी घेत आणि भ्रमणध्वनीवरून संवाद साधत ‘मी’ मी’ म्हणणार्‍यांच्या किल्ल्याचे बुरुजं ढासळून टाकले. दस्तुरखुद्द शरद पवारच भ्रमणध्वनीवर बोलतात. प्रत्यक्ष सांगतात. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजयी मार्ग सुकर झाला.
अवघ्या राज्याचे लक्ष लक्ष लागून राहिलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि सत्ताधारी भाजपाच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक केल्याने या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली. बजरंग सोनवणेंसारखा सर्वसामान्यातील शेतकरी कुटुंबातला उमेदवार राष्ट्रवादीने देऊन जिल्ह्यातील कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार यांचे प्रश्‍न थेट लोकसभेत उपस्थित करणारा उमेदवार म्हणून बजरंगकडे पाहितलं जात असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवारांनी या मतदारसंघासाठी एक दिवस आणि रात्र दिली. दिवसभरात दोन जाहीर सभा घेऊन शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर भाष्य करणार्‍या पवारांनी हा देश आणि हे राज्य शेतकर्‍यांचे आहे. इथं जात-पात, धर्म-पंथापेक्षा सर्वसामान्यांच्या पोटाला महत्त्व असल्याचे दाखवून दिले. भयावह दुष्काळस्थितीत असलेल्या जिल्ह्यात हेलिकॉप्टरने फिरण्यापेक्षा बाय कार फिरून पवारांनी छावण्यांना भेटी दिल्या, शेतकर्‍यांशी संवाद साधला आणि रात्री दहाच्या नंतर बीड मुक्कामी शिवछत्रवर निवडणुकीची अंतिम टप्प्यातील रणनीती आखण्यात आली. आपल्या जुन्या सहकार्‍यांसह तरण्याताठ्या जोशबाज कार्यकर्त्यांशी शरद पवारांनी थेट संवाद साधला. बजरंगच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे आदेश दिले. थेट दस्तुरखुद्द शरद पवारच सांगतात, तेव्हा जिल्ह्यातल्या कान्याकोपर्‍यातील आणि सर्वक्षेत्रातील मान्यवरांनी बजरंग सोनवणेंचा विजय हातात घेतला. रात्री दोन ते तीन तास रणनीतीसह खलबते चालू होते. आज सकाळी साडेसात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत शरद पवारांनी अनेकांशी संपर्क साधला. भ्रमणध्वनीवरून संदेश दिला. मी मी म्हणणारे आणि कोलांटउड्या खाणार्‍या मातब्बरांच्या किल्ल्यांना रात्रीपासून शरद पवारांनी प्रचंड हादरे दिले. अनेक बुरुजे ढासळून टाकले आणि कुठल्याही स्थितीत बीडमध्ये बजरंग सोनवणे निवडून येतील, अशी परिस्थिती निर्माण करून सोडली. शरद पवारांच्या मुक्कामाने विरोधी भाजपाच्या काफिल्यात प्रचंड खळबळ आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. पवारांचं राजकारण हे सकारात्मक दृष्टीकोनाचं, विचाराचं आणि विवेकाचं त्याचबरोबर गनिमी काव्याचं असल्याचं सर्वश्रूत असल्याने पवारांची जादू बीड जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात दिसून आली. एकूणच पवारांच्या एक दिवस, एका रात्रीच्या खलबत्त्याने राष्ट्रवादीचा उमेदवार प्रचंड आघाडीवर गेला तर भाजपाचा उमेदवार पिछाडीवर पडल्याचे अनेक विश्‍लेषकांनी सांगितले.

अधिक माहिती: reporter online

Best Reader's Review