भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी मोदीजी तुम्हाला महाराष्ट्र धडा शिकवणारच -धनंजय मुंडे

बीड (रिपोर्टर):- आमच्या महाराष्ट्रातल्या मातीतील हुतात्म्यांचा अपमान करणार्‍यांचे समर्थन करणे ही तुमची शिकवणूक असेल तर मोदीजी हा महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. या ट्विटमध्ये मुंडेंनी जगद्गुरू संत तुकोबांच्या अभंगाचा आधार घेत भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी, लिहित मुंडेंनी पंतप्रधानांना इशारा दिला.
मुंबई हल्ल्यात हुतात्मे झालेल्या महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या बाबत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिने वादग्रस्त विधान करताना ‘माझ्या शापामुळेच करकरेंची हत्या झाली, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मला जाणीवपूर्वक अडकवण्यात आले, करकरे यांनी मला खोटेपणाने तुरुंगात डांबले. मी तेव्हा ‘तुमचा सर्वनाश होईल, सर्व काही नष्ट होईल’, असा शाप दिला होता. ठिक सव्वा महिन्यानी सुतक लागले. ज्या दिवशी मी तुरुंगात गेले त्या दिवशीच त्यांना सुतक लागले होते,’ असे संतापजनक वक्तव्य केले होते. या राष्ट्रद्रोही विधान करणार्‍यावर कारवाई करण्यापेक्षा भाजपाकडून प्रज्ञासिंहला भोपाळमधून उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचं समर्थन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. ते समर्थन करताना जगात गेल्या पाच हजार वर्षांपासून ज्या महान संस्कृती आणि परंपरेचे वसुधैव कुटुम्बकम हा संदेश दिला, सर्वभौतु सुखीन हा संदेश दिला, ज्या संस्कृतीने एकम् सद् विप्रा बहुदावदन्तीचा संदेश दिला त्या संस्कृतीला तुम्ही (कॉंग्रेस नेते) दहशतवादी म्हणून मोकळे झालात. या सर्वांना उत्तर देण्यासाठी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी देणे हे एक प्रतीक असून कॉंग्रेसला हे आरोप महागात पडणार आहेत, असे मोदींनी म्हटले होते. हेमंत करकरे हे माझ्या शापामुळेच दहशतवादी हल्ल्यात मारले गेल्याचे प्रज्ञासिंह ठाकूरने भोपाळमधील एका सभेत म्हटले होते. यावर धनंजय मुंडेंनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलेे आहे. आपल्या ट्टिटमध्ये मुंडे म्हणतात, आमच्या महाराष्ट्रातल्या मातीतील हुतात्म्यांचा अपमान करणार्‍यांचे समर्थन करणे ही तुमची शिकवण असेल तर भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी अशी शिकवण आम्हाला जगद्गुरू तुकोबारायांनी दिली आहे. मोदीजी हा महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही

अधिक माहिती: beed

Best Reader's Review