शापवाणीचा बाप कोण?

अंगी लावुनिया राख | डोळे झांकुनि करतेय पाप

दावुनि वैराग्याचे काळ | भोगी विषयाचा सोहळा

शापवाणीचा बाप कोण?

-गणेश सावंत

समुद्र मार्गे देशात अतिरेकी घुसतात, मुंबई महानगरीवर हल्ला चढवतात, रस्त्यावरच्या जित्याजागत्या माणसांवर गोळ्या झाडतात, रक्तपात करतात, शेकडो निष्पापांचे बळी घेतात, अशा हैवानी दहशतवाद्यांशी दोनहात करण्यासाठी आमची महाराष्ट्र पोलिस त्या दहशतवाद्यांशी निधड्या छातीने लढते. छातींवर गोळ्या झेलते, स्वत: धारातीर्थ पडत सर्वसामान्य माणसांचा जीव वाचवते. मात्र याच हुतात्म्यांना महाराष्ट्रासाठी, देशासाठी खर्ची पडलेल्या शहीदांना भगवी वस्त्र परिधान केलेल्या तथाकथीत साध्वी-साधूंकडून शाप निघत असेल, त्या शहीदाचा तेरावा घातला जात असेल तर जेवढ्या वेदना दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी खर्ची पडलेल्या हुतात्म्यांना झाल्या नसतील त्यापेक्षा अधिकच्या वेदना प्रज्ञासिंह ठाकूर नावाच्या जेलवारी करून आलेल्या महिलेच्या वक्त्यावरून अवघ्या शहीदांना आणि महाराष्ट्राला नक्कीच झाल्या आहेत. कुठल्याही संकटाला सामोरे जाणारे आमचे पोलिस, आमचे सैनिक कधी सह्याद्रीची छाती करतात तर कधी हिमालयासारखे संकटासमोर उभे राहतात. त्याच पोलिसांना अणि सैनिकांना शाप देण्याची भाषा प्रज्ञासिंह ठाकूर करत आपली अक्कल पाजळीत असेल तर अशा प्रतिभा नाही परंतु प्रतिमा उंचावणार्‍या तथाकथीत बुद्धीजीविंसह ‘टिळा-टोपी घालूनिया माळ म्हणती आम्ही साधू, दया धर्म चित्त नाही तेच जाणावे भोंदू’ अशांना आता त्यांची जागा दाखवावीच लागेल प्रज्ञासिंह ठाकूर ही भगव्या वस्त्रातली साध्वी म्हणवून घेणारी मालेगाव बॉम्बस्फोट आरोपी आहे. तिने तब्बल आठ ते नऊ वर्षे जेलमध्ये घातले आहेत. आता ती जामिनावर आहे आणि तिच महिला आज शहीद हेमंत करकरेंचा तेरवा घालत असेल, माझ्या शापाने हेमंत करकरेंची हत्या झाली असा दावा करत असेल तर हा पुरोगामी महाराष्ट्र अशा कावळ्यांना कधीच थारा देणार नाही. परंतु पैसा आणि सत्ता यातच मशगुल असलेल्या आजच्या सत्ताधार्‍यांनी अशा कावळ्यांना आपल्या काखेत घेण्याचा प्रयत्न केलाय.
तो प्रयत्न देशद्रोहाचा
नव्हे काय ? हा सवाल आता विचारावा लागेल. राष्ट्रप्रेमाचा डांगोरा पिटवणारे, आमची तीच राष्ट्रभक्ती, आम्ही म्हणू तीच देशभक्ती या भूमिकेत असलेले संस्कार आणि संस्कृतीचे ठेकेदार ठरू पाहणारे भापाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ती प्रज्ञासिंह ठाकूर देशभक्त वाटतेच कशी? मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला, त्यात कित्येक जण मरण पावले, त्याचे धागेदोरे प्रज्ञा ठाकूरपर्यंत आले, तिच्या मुसक्या बांधण्यात आल्या, कायद्यानुसार तिच्यावर गुन्हे दाखल होऊन ती नऊ वर्षे जेलमध्ये राहिली, तथाकथीत राष्ट्रवाद्यांनी हिंदू दहशतवाद असूच शकत नाही, ही भूमिका घेतली अन् इथही दहशतवाद्यात जात शोधली. राज्यकर्ते आणि तथाकथीत बाजारबुजगे कुठेही जात शोधत असतील तर लोकशाहीची दिवसाढवळ्या हत्याच होते, हे उघड सत्य आतात नाकारता येणार नही. जेंव्हा एवढं सर्व होऊन प्रज्ञासिंह ठाकूर जामिनावर बाहेर येते आणि सत्ताधारी भाजप प्रज्ञासिंह ठाकूरला जवळ घेत भोपाळमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी देते तेव्हाच भाजपातलं पोटातलं अन् ओठातलं दिसून येतं. दुर्दैव याचं वाटतं, हेमंत करकरे या शहीदाच्या बाबतीत प्रज्ञासिंह ठाकूरने वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रभक्तीचे डांगोरे पिटवणारे, नगारे वाजवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रज्ञासिंहचं समर्थन करतात, हा पंतप्रधानांचा देशद्रोह नव्हे का? शहीदाला शिव्या-शाप देणार्‍या प्रज्ञासिंहचा तो देशद्रोह नव्हे का? प्रज्ञासिंहच्या वक्तव्यानंतर तिला पाठिंबा देणार्‍यांचा तो देशद्राह नव्हे का? असे कित्येक प्रश्‍न आता उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाहीत. हे सर्व फक्त प्रतिभेपेक्षा प्रतिमा मोठी करणार्‍यांकडूनच होते. हा देश आणि महाराष्ट्र जेवढा साधू-संत-सुफींचा आहे तेवढाच क्रांतीकार्‍यांचाही आहे. बुद्धिवाद्यांचा आणि बुद्धीभेद्यांचा सामना या महाराष्ट्रात सातत्याने होत आला आहे. त्यामुळे गळ्यामध्ये माळ गालणे, डोक्याचे केस वाढवणे, मस्तकी गोपीचंदलेणे आणि भगवे वस्त्री परिधान करणे म्हणजे तो साधूसंत नव्हे. महाराष्ट्राचा संत हा
मुखी सांगे ब्रह्मज्ञान |
जनी लोकांचे कापितो मान ॥

असा असूच शकत नाही. जगद्गुरू संत तुकोबा, नामदेव महाराज, संत ज्ञानेश्‍वर, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्यासह असे कित्येक संत होऊन गेले की जे अंतर मनाने आणि बाह्य मनानेही संतच होते. मोह-माया यापासून दूर असणारे, माणसाला माणूस म्हणून जगण्याची शिकवण देणारे, अंतरमनात कसलंही कपट नसणारे, क्षमा-शांतीचे जणक होते. समााजातल्या अनिष्ठ रुढी-परंपरेला विरोध करणारे ते विद्रोही होते. परंतु आजच्या टिळा-टोपी घालूनि माळ म्हणती आम्हा साधू, असे म्हणणारे नक्कीच नव्हते. भगवे तरी श्‍वान सहज वेष त्याचा | तेथे अनुभवाचा काय पंथ | वाढूनिनी जटा फिरे दाही दिशा | तरी जनंबुवेषा सहज स्थिती ॥ संत तुकोबा म्हणतात, कवडीचाही अनुभव नसताना भगव्या रंगाचे कपडे घातले म्हणजे कोणी साधू होत असतं का? जर असे असले असते तर बर्‍याच कुत्र्यांचा रंग भगवा असतो मग ते कुत्रेसुद्धा साधू झाले नसते का? आजकाल हिंदू धर्मात अंतरमनाने भगवेधारी शुद्ध मनाचे कमी झाले आणि अंगावर वस्त्र परिधान करून दिखावू साधूच मोठ्या प्रमाणावर पैदा झाले. त्यातूनच अशा घटना घडतात आणि प्रज्ञासिंहसारखी जेलमधून आलेली बाई हुतात्म्य आलेल्या निधड्या छातीच्या शहीदाला शिव्याशाप देते. हा महाराष्ट्र आहे. तो रांगडा, निधडा आणि सह्याद्रीच्या मनाचा, इथं, शिव्याशापांना कधीच थारा नाही. इथं आहे

रंजल्या गांजलेल्यांना
थारा जे के रंजलेगांजले त्यासि म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा, देव तेथिच जाणावा | असं आम्हा महाराष्ट्रवासियांना जगद्गुरू संत तुकोबांनी सांगनू ठेवलं आहे. जर कोणी भगवे वस्त्र परिधान करून समाजाला दिशाहीन करत असेल तर अशांना जळो जळो ते गुरुपण, जळो जळो ते चेलेपण, गुरु आला वेशी दारी, शिष्य पळतो खिंडोरी | या स्थितीत राहत भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी | हाही संदेश दिला आहे. यापुढे जात शहीदांचा, सत्याचा, समतेचा कोणी खून पाडत असेल तर अशा वेळी आम्ही झालो गावगुंड, अवघ्या पुंड भुतांशी म्हणत त्याचा प्रतिकार करण्याचीही शिकवण आम्हाला दिली आहे, महाराष्ट्राच्या मनामनात, तणातणात राष्ट्रप्रेमाचा झरा जसा वाहतो तशी देशभक्तीची नशाही महाराष्ट्रवासियांच्या नसानसात भिणलेली असते. जेंव्हा प्रज्ञासिंह ठाकूरने शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत खालच्या पातळीवरचे वक्तव्य केले, शाप वाणीची भाषा केली तेव्हा महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशातील जनतेच्या तळपायाची आग मस्तकात गेली, देशातल्या प्रत्येक देशभक्ताच्या मनमनातून प्रज्ञासिंह ठाकूर हिलाच शिव्याशाप देण्यात आले, दुर्दैव याचं वाटतं,
राष्ट्रभक्तीचा डांगोरा
पिटवत जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या जत्रेत मतं मागणार्‍या भाजपाला अंतरमनातलं भगवं आणि शरीरावरच्या कपडतल्या भगव्याचा फरक कळाला नाही आणि त्यांनी अंगी लावूनि राख, डोळे झाकुनि करते पाप दाखूनि वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा | अशांची संगत आणि त्यांची पाठराखण करणं सुरू ठेवलं. देशाचा पंतप्रधान एकीकडे राष्ट्रभक्तीवर आणि देशभक्तीवर मत मागत असेल आणि त्याच राष्ट्रासाठी आणि त्याच देशासाठी छातीचा कोट करून खर्ची पडलेल्या शहीदाला अपमानित करणार्‍यांच्या पाठीशी राहत असेल तर त्या पंतप्रधानांच्या देशभक्तीवरही शंका का उपस्थित होऊ नये? प्रज्ञासिंह ठाकूरच्या दहशतवादी कारवाया आणि नंतर तिला मिळालेली जामीन हे जर राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र असेल तर या देशात हुकुमशाहीचे वारे वहायला सुरुवात झाली, असे आता म्हणावे लागेल. ज्या पद्धतीने पंतप्रधानांनी प्रज्ञासिंह ठाकूरला पाठिशी घालताना शिख हत्याकांडाचं उदाहरण दिलं, त्यांनी तसं केलं म्हणून आम्हीही असच करणार, अशी भूमिका घेतली, या भूमिकेतून नरेंद्र मोदींना देश नेमका कुठल्या दिशेने घेऊन जायचा आहे, हे सांगणे कठीण असलं तरी आजमितीला या देशात ‘खजिने को चोरों से नही रखवालदारों से डर है, इस देश को दुश्मनों से नही, गद्दारो से डर है’ असं म्हणण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. असे असले तरीही या महाराष्ट्राचा सह्याद्री आणि देशाचा हिमालय संकटाचा सामना करतच राहिल, महाराष्ट्राचे सुपुत्र खर्ची पडायला मागे पडणार नाहीत आणि कावळ्याच्या शापाने ढोर मरणार नाही हे जेवढे त्रिवार सत्य आहे तेवढेच निवडणुकांच्या कालखंडात जात-पात-धर्म-पंथ, बेगडा राष्ट्रवाद, बेगडी देशभक्ती आणि आता शापवाणी या सर्वांचा बाप कोण? हे तुम्हा-आम्हाला शोधावेच लागेल.

अधिक माहिती: beed reporete

Best Reader's Review