बीड बसस्थानकात पार्किंगच्या नावाखाली लूट

बीड बसस्थानकात पार्किंगच्या नावाखाली लूट

बीड (रिपोर्टर) :- बीड शहरातील बसस्थानकात नातेवाईकांना सोडण्यासाठी दुचाकी घेवून आलेल्या प्रत्येक नागरिकांकडून सक्तीने पार्किंगच्या नावाखाली बेकायदा अव्वाच्या सव्वा रुपये उकळले जात आहेत. वास्तवीक पाहता तेथे कसल्याही प्रकारची अधिकृत पार्किंगची व्यवस्था नसून ही वसूली बेकायदेशीर आहे. नातेवाईकांनी पैसे देण्यास नकार दिला तर त्याच्यासोबत हुज्जत घालून त्याला दमही दिला जातो. बेकायदा वसूली करणार्‍यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
    धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडच्या बसस्थानकात प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. या ठिकाणी नातेवाईकांना सोडण्यासाठी दुचाकी घेवून आलेल्या नागरिकांकडून येथे पार्किंगच्या नावाखाली सक्तीने वसूली केली जात आहे. एखाद्या अपंग प्रवाशाला नातेवाईकाने गेटच्या आतमध्ये दुचाकीवर सोडून तत्काळ बाहेर जात असला तरी त्याच्याकडून पैशाची मागणी केली जात आहे. तु गाडी आतमध्ये आणलीस त्यामुळे तुला पार्किंगचे पैसे द्यावेच लागतील म्हणून त्याच्या सोबतही हुज्जत घातली जाते. नातेवाईकांना दम देवूनही त्याच्याकडून सक्तीने पैसे वसूल करण्याचा धंदा येथील बसस्थानकात सुरु आहे. याला आळा घालण्याची मागणी होत आहे.

तक्रार आल्यास कारवाई करु
बीड बसस्थानकात नातेवाईकांना सोडण्यासाठी दुचाकी घेवून आलेल्या नागरिकांकडून पार्किंगच्या नावाखाली पैसे घेने चुकीचे आहे. शिवाय येथे केवळ पत्र्याच्या शेडमध्येच अधिकृत पार्किंग आहे. जर कोणी सक्तीने पार्किंगच्या नावाखाली वसूली करत असेल तर त्याची तक्रार आल्यास वसूली करणार्‍यावर तत्काळ कारवाई करु
निलेश पवार
आगार प्रमुख, बीड

कोणालाही पैसे देवून नयेत
बीड बसस्थानकामध्ये जर कोणी पार्किंगसाठी पैसे मागत असेल तर त्याची तक्रार नागरिकांनी आमच्याकडे करावी. कोणालाही पार्किंगच्या नावाखाली पैसे देवून नये.
संजिव सुपेकर
विभाग नियंत्रक, बीड

अधिक माहिती: beed reporete

Best Reader's Review