इस्लामपुरा भागाकडे नगरपालिका का दुर्लक्ष करते?

इस्लामपुरा भागाकडे नगरपालिका का दुर्लक्ष करते?
जागोजागी कचर्‍याचे ढिग, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
बीड (रिपोर्टर):- नगरपालिका प्रशासनाकडून नेहमीच स्वच्छतेचा आव आणला जात असला तरी अनेक भागांमध्ये स्वच्छता अभियान फक्त नावालाच आहे. शहरातील इस्लामपुरा भागात जागोजागी कचर्‍याचे ढिग जमा झाल्याने कचरा नगरपालिकेचे वेळेवर उचलत नसल्याने त्या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. इस्लामपुरा भागाकडे नगरपालिका का दुर्लक्ष करते? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 
  केेंद्र आणि राज्य सरकार ग्रामीण भागासह शहरी भागात स्वच्छता अभियान राबवत आहे. या अभियानावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असला तरी हा खर्च तितका सार्थकी लागत नाही. बीड नगरपालिका नेहमीच स्वच्छतेचा आणि विकासाचा आव आणत असते मात्र तेवढी स्वच्छता आणि विकास शहराचा झाला का ? असा प्रश्‍न उपस्थित होतो. अनेक भागातील नाल्या, रस्त्यांची कामे प्रलंबित असल्याने त्या त्या भागातील नागरिक रस्त्याच्या मागणीसाठी नगरपालिकेकडे पाठपुरावा करतात. मात्र नगरपालिका नागरिकांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. शहरातील इस्लामपुरा भागात असलेल्या गोशानशीन परिसरात जागोजागी कचर्‍याचे ढिग पडलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा कचरा नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचारी उचलत नसल्याने कचर्‍याची दुर्गंधी सर्वत्र पसरून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. इस्लामपुरा भागातील स्वच्छतेकडे न.प. का दुर्लक्ष करते? असाही सवाल आता उपस्थित होत आहे. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review