महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असतांना मुख्यमंंत्र्यांचा गुजरातला पाणी देण्याचा घाट

महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असतांना मुख्यमंंत्र्यांचा गुजरातला पाणी देण्याचा घाट
उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी जनआंदोलन करणार -माजी आ.भोसले
भोसले याची पाणी यात्रा बीड जिल्ह्यात 
बीड (रिपोर्टर):- महाराष्ट्र दुष्काळाशी संघर्ष करीत असतांना शासन मात्र नारपार, दमन गंगा खोर्‍यातील महाराष्ट्राच्या हक्काचे ४६ टीएमसी पाणी गुजरातला देत आहेत. केवळ पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना खुष करण्यासाठी महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याचा घाट मुख्यमंत्र्यांनी आखला असून हा प्रयत्न हाणुन पाडण्यात येणार असल्याचे सांगत दुष्काळी उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्हे व मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. या भागाला पाणी देण्याची गरज असून पाणी प्रश्‍नासाठी जनआंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी आ.नितीन भोसले यांनी दिली.
नितीन भोसले हे पाणी प्रश्‍नाबाबत आवाज उठवत असून ते आज बीड येथे आले होते. त्यांनी नगर रोडवरील हॉटेल निलकमल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना भोसले म्हणाले की, गुजरातला शेतीसाठी महाराष्ट्राच्या भुमीमधले पाणी देण्याची भूमिका देण्या अगोदर महाराष्ट्राच्या विधी मंडळामध्ये चर्चा करण्यात आली नाही. तसेच गोदावरी खोर्‍यातील पाण्याच्या लवादामध्ये गुजरातला पाणी देण्या संदर्भात कोणतीही भूमिका नसतांना हा प्रश्‍न या लवादापुढे का मांडण्यात आला नाही. महाराष्ट्रातील भाजपा नेते मोदी व शहांना खुष करण्यासाठी आपली धन्यता मानतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे महाराष्ट्राच्या हक्काचे एकही थेंब पाणी गुजरातला देणार नाही असे जाहीर वक्तव्य करत असतांना महाराष्ट्राला अंधारात ठेवून ४६ टीएमसी पाणी गुजरातला देण्याची तयारी पूर्ण केली आहे. महाराष्ट्र दुष्काळाशी संघर्ष करत असतांना शासन मात्र नारपार, दमन गंगा खोर्‍यातील महाराष्ट्राच्या हक्काचे ४६ टीएमसी पाणी गुजरातला देत आहे. दुष्काळग्रस्त भागाच्या दौर्‍यावर असणार्‍या सर्व पक्षीय नेत्यांनी प्रथम महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्यासाठी विरोध करावा असे सांगत भोसले पुढे म्हणाले की, नारपार, दमनगंगा खोर्‍यातील पश्‍चिम वाहिणी असणार्‍या नद्याचे पाणी मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राला देण्याची भूमिका घेण्याऐवजी गुजरातला का दिली जात आहे? उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्हे व मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये जनआंदोलन पेटवण्यासाठी ‘पाणी यात्रा’ दौर्‍या करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राच्या हक्काचा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी पहिल्या टप्प्यात सर्व जिल्ह्यामध्ये गुजरात पळत असलेल्या पाण्याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. व दुसर्‍या टप्प्यात पाणी वाचवण्यासाठी प्रत्यक्ष जनलढ्याची भूमिका असणार आहे. पाणी यात्रेचा मुख्य उद्देश हा महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी महाराष्ट्राला मिळाले पाहिजे हा असून महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यावर घाला घालणारे गुजरातबरोबर करण्यात आलेला करार रद्द करण्यात यावा व अन्य कोणतेही पाणी देण्याचे करार करण्यात येवू नये अशी आपली मागणी असल्याचे भोसले यांनी यावेळी सांगितले. 
 

अधिक माहिती: reporter online

Best Reader's Review