ताज्या बातम्या

मोहम्मदीया कॉलनीत २५ दिवसांपासून पाणी नाही

महिलांचा कलेक्टर कचेरीसमोर ठिय्या
बीड (रिपोर्टर):- नगरपालिका प्रशासनाकडून पाणीपुरवठा वेळेवर करण्याचा दावा केला जात असला तरी शहरातील अनेक प्रभागात २० ते २५ दिवसांपासून पाणी नसल्याने तेथील नागरिकांचे मोठे हाल होऊ लागले आहेत. काही लोकांना विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. आज मोहम्मदीया कॉलनीसह इतर भागाती संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
नगरपालिका प्रशासन पाणीपुरवठा का करत नाही ? असा प्रश्‍न या वेळी आंदोलनकर्त्या महिलांनी उपस्थित केला होता. पाणीपुरवठा न करणार्‍या न.प. प्रशासनाविरोधात कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली आहे.
बीड नगरपालिका प्रशासन विकासाचा नुसता पोकळ दावा करत आहे. सध्या भीषण दुष्काळ असल्याने सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई असली तरी दहा ते बारा दिवसाला पाणीपुरवठा करण्याची जबाबदार नगरपालिका प्रशासनाची असताना न.प. २० ते २५ दिवसानेही पाणी सोडत नसल्याने नागरिकांना इतर ठिकाणाहून पाणी आणण्याची वेळ आली आहे. शहरातील मोहम्मदीया कॉलनी, आरेफ कॉलनी, सय्यद अली नगर या भागात तर गेल्या २५ दिवसांपासून नळाला पाणी आले नाही. पाणीपुरवठ्याबाबत नगर पालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरवठा केला मात्र न.प. प्रशासन दिशाभूल करण्याचे काम करत असून पाणीपुरवठा करण्यास नगरपालिका प्रशासन टाळाटाळ करत आहे. नगरपालिका सदरील भागांमध्ये का दुजाभाव करत आहे? असा प्रश्‍न उपस्थित आहे. आज सदरील भागातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे

अधिक माहिती: beed

Best Reader's Review