ताज्या बातम्या

जालना रोडचे गोडाऊन फोडले ११ लाखाचे सिगारेटचे बॉक्स पळवले

जालना रोडचे गोडाऊन फोडले
११ लाखाचे सिगारेटचे बॉक्स पळवले
बीड (रिपोर्टर):- जालना रोडवर असलेले एक गोडाऊन फोडून अज्ञात चोरट्याने आतमध्ये प्रवेश करत आतील सिगारेटचे १२ बॉक्स चोरून नेले. या बॉक्सची किंमत जवळपास ११ लाख रूपये इतकी आहे. हा चोरीचा प्रकार आज सकाळी उघडकीस आल्यानंतर याबाबतची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कळवण्यात आली. त्यानुसार डिवायएसपीसह, फिंगर पथक, एलसीबी, दरोडा प्रतिबंधक विभाग, श्‍वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते. 
बीड शहरातील व्यापारी महावीर सुभाषचंद्र बेथमुथ्था यांचे जालना रोडलगत असलेल्या गणेशनगर भागात गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये सिगारेटसह इतर साहित्य साठवून ठेवलेले आहे. रात्री अज्ञात चोरट्याने संधीचा फायदा उचलून गोडाऊन फोडून आतील सिगारेटचे बारा बॉक्स चोरून नेले. एका बॉक्सची किंमत ९६ हजार रूपये इतकी असून जवळपास ११ लाखाचा माल चोरट्यांनी लंपास केला. आज सकाळी आपल्या गोडाऊनमध्ये चोरी झाल्याचे बेथमुथ्था यांना दिसून आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती शिवाजीनगर पोलीसांना कळवली. त्यानुसार डिवायएसपी शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस, फिंगर पथक, श्‍वान पथक, एलसीबी, दरोडा प्रतिबंधक विभाग घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 
चोरट्यांनी सीसीटीव्हीत कैद होवू नये म्हणून छत्रीचा केला वापर
वेदमुथा यांच्या गोडाऊनमध्ये सिसीटीव्ही कॅमेरा आहे. चोरटे चाणक्ष असल्यामुळे त्यांना आतील सीसीटीव्ही कॅमेरा दिसून आला. आपण कॅमेर्‍यात कैद होवू नये यासाठी एका चोरट्याने छत्री पांघरून एक-एक बॉक्स बाहेर आणून ठेवले. तसेच बॉक्सला फिंगर प्रिंट उमटू नये यासाठी हँडग्लोजचा वापर केला असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात स्पष्टपणे दिसून येत आहे. 
एवढे मोठे गोडाऊन तरी सुरक्षा वार्‍यावर
महावीर वेदमुथा हे बडे व्यापारी असल्याने त्यांचे गणेशनगर भागात मोठे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये लाखो रूपयांचा माल साठवून ठेवण्यात आलेला आहे. सुरक्षेसाठी गोडाऊन मालकाने वॉचमन ठेवणे गरजेचे आहे. मात्र बेथमुथ्था यांनी सुरक्षेसाठी वॉचमन ठेवलेला नव्हता. याबाबत पोलीस प्रशासनाने प्रश्‍न उपस्थित केला होता.

अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Best Reader's Review