ताज्या बातम्या

अजातशत्रू 


-गणेश सावंत

त्रिखंडात अजिंक्य असलेल्या अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सिद्धांत ममगात्रानी झाली. साक्षात प्रभू राम सोबतीला असताना लक्ष्मणाला शक्ती लागली. परंतु अटलबिहारी वाजपेयी यांचे उभे आयुष्य ज्या संघर्षातले तुम्ही-आम्ही पाहितले त्या संघर्षात वाजपेयी कधीच मागे नाही हटले. बालवयापासूनच संघर्ष करण्याचा ध्यास घेणारे वाजपेयी तरुण वयात ज्या देशभक्तीने ग्रासून गेले होते तीच देशभक्ती त्यांच्या नसा नसात आणि रक्ता रक्तात शेवटच्या क्षणापर्यंत दिसून आली. अटलबिहारी वाजपेयी यांचा ९४ वर्षांचा कालखंड आजच्या पिढीला धैर्य, संघर्ष आणि देशभक्तीचे टॉनिक देणारा आहे. मी, माझा एवढ्या पुरताच विचार करणार्‍या पिढीला देश, राष्ट्र, भक्ती याची शिकवण देणारा नव्हे नव्हे तर कान धरून त्या रस्त्यावर घेऊन जाणारा वाजपेयींचा इतिहास नक्कीच २१ व्या शतकात आजच्या पिढीला महत्त्वाचा ठरणार आहे. १६ ऑगस्ट रोजी अटलजींची प्रकृती चिंताजनक आहे, अशी बातमी देशभरात पसरली अन् अवघा देश चिंतेत व्याकूळ झाला, त्याच दिवशी संध्याकाळी अटलजींची प्राणज्योत मावळली आणि इतिहासाच्या सुवर्णपानांत अटलजी कधी शब्दबद्ध झाले हे कळालेच नाही. वाजपेयींनी जगाचा निरोप घेतला हे आमचच नाही तर कोणाचंही मन मान्य करायला तयार नव्हता. अटलजी आपल्यातून गेले हेही म्हणण्याचं धाडस होत नव्हतं. अटलजींची अंत्ययात्रा निघाली. त्यांच देह चितेवर ठेवण्यात आला, मानसपुत्रीने अग्निडाग दिला, चिता ढणढण जळत राहिली, अटलजींच्या देहाची राख झाली. ती राख देशाच्या मातीत मिसळली. पण तरीही अटलजी आहेत, ते देशवासियांच्या तना-तनात आणि मना-मनात. आजपावेत या दोन शतकात असा राजकारणी, समाजकारणी, लेखक, पत्रकार, कवी, फर्डा वक्ता झालाच नाही. त्यांची हिंदी अन् हिंदी भाषेत केलेलं उद्बोधन कानाला अक्षरश: मंत्रमुग्ध करून सोडायचं. अटलजींचा इतिहास पराकोटीचा, संघर्षाचा आणि तेवढाच ममता, प्रेम, वात्सल्याचा. शत्रुचा शत्रु जसा मित्र तसा मित्राचा मित्र ही मित्रच मानणारे आणि अंत:करणातून शत्रूत्व हे पूर्णत: डिलिट करणारे 
अटलजी अजातशत्रू 
होते. २५ डिसेंबर १९२४ रोजी अटलजींचा मध्य प्रांतातील म्हणजेच आजच्या मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये जन्म झाला. उत्तर प्रांतातील बाटेश्‍वर येथून वाजपेयी यांचे आजोबा पंडित श्यामलाल ग्वाल्हेरजवळील मोरेना येथे स्थलांतरीत झाले होते. वाजपेयी यांचे वडील कृष्ण बिहारी वाजपेयी हे उत्तम कवी आणि शिक्षक होते. ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरीया महाविद्यालयतून अटलबिहारी वाजपेयी यांनी पदवी संपादन केली. हिंदी, संस्कृत, इंग्रजी विषयात प्रावीण्य मिळविले. त्यानंतर कानपूरमधून राज्य शास्त्रात निशांत पदवी मिळवून १९३९ साली त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला. या वेळी त्यांच्यावर बाबासाहेब आपटे यांच्या शिकवणीचा प्रचंड प्रभाव होता. इथूनच अटलजींच्या पत्रकारितेला, कवित्वाला आणि सामाजिक दृष्टीकोनाबरोबरच देशभक्तीला प्रचंड प्रोत्साहन मिळत गेलं. १९४७ साली संघाचे पूर्णवेळ स्वयंसेवक म्हणून काम करणार्‍या अटलजींनी पांचजन्य, स्वदेश, वीर अर्जुन, राष्ट्र धर्म या दैनिकांसाठी काम केले. १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनात २३ दिवसांचा कारावास भोगून १९५१ साली श्याम प्रसाद मुखर्जी यांच्या प्रभावामुळे जनसंघाचे काम करू लागले. उभ्या आयुष्यात आपण राजकीय क्षेत्रात उतरू, अशी पुसटशीही कल्पना नसताना अटलजी राजकीय मैदानात उतरले. पहिल्या निवडणुकीत पराभव स्वीकारल्यानंतर या पराभवाने न खचता अटलजींनी पुन्हा एका निवडणुकीत यश संपादन केले आणि ते लोकसभेत गेले. निवडणुकीच्या दरम्यान त्यांचं वक्तृत्व एवढं प्रभावी होतं की, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हेही प्रभावीत झाले होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जेव्हा आणीबाणी लादली तेव्हा या आणीबाणीला कडवा विरोध करत अटलजींनी लोकशाहीचे पायीक बनणे पसंत केले होते. जेव्हा १९७७ साली जनसंघ जनता पार्टीत विलीन झाला आणि मोरारजी देसाई यांचे सरकार केंद्रात आले तेव्हा वाजपेयी हे मोरारजींच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री होते. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत हिंदीत भाषण करणारे ते पहिले नेते ठरले. त्यांचा कालखंड एवढ्यासाठीच द्यावासा वाटतो. आजच्या पिढीला अटलजींच्या इतिहासाची, संघर्षाची आणि जन्ममरणाची माहिती व्हावी कारण अटलजींचे जीवन किती खरतड असले तरी ते 
‘गीत नया गाता हूँ’ 
असं म्हणत आपला प्रवास चालू ठेवायचे. ‘बेनकाब चेहरे हैं, दाग बडे गहेरे है, तुटता तिलस्म आज सच से भय खाता हूँ, गीत नया गाता हूँ, लगी कुछ ऐसी नजर, बिखरा शिशेसा शहेर, अपनों के मेले मे मीत नही पाता हुँ गीत नया गाता हुँ’ ‘पिठ में छुरी सा चांद, राहु गया रेखा फान, मुक्ती के क्षणों मे बार बार बंध जाता हुँ गीत नया गाता हुँ अशा एकसे बढकर एक सद्य आणि सत्यस्थितीतील कवितांच्या रचना करून सातत्याने सत्यमे जयतेचा नारा देत आले. त्यांच्या कवितेतला शब्द ना शब्द जेवढा मार्मिक होता तेवढाच नत्‌द्रष्ट वृत्तींवर प्रहार करणारा आहे. एका कवितेत तरुण पिढीला नवीन शिकवण होती, त्या कवितेत धैर्य होते, नव्हे नव्हे तर संघर्ष करण्याची शिकवण होती. तुटे हुए सपनों की सुने कौन सिसकी, अंतर को चिरव्यथा, पलको पर ठिटकी, हार नही मानुंगा, रार नही ठाणुंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हुँ गीत नया गाता हुँ यामध्येही अटलजींचा धगधगता स्वभावच नव्हे तर धगधगती देशभक्तीही पहावयास मिळाली. एक सदस्याचा विरोधी पक्ष असलेल्या लोकसभेमध्ये अटलजी जेंव्हा एखादा प्रश्‍न घेऊन बोलायला उभे राहायचे तेव्हा देशातल्या वाडी-वस्ती-तांड्यावरचा प्रश्‍न असो अथवा आंतरराष्ट्रीय सीमा प्रश्‍न असो तो मांडताना जी पोटतिडकी असायची आणि त्या पोटतिडकीत जी देशभक्ती असायची ती देशभक्ती सत्ताधार्‍यांच्या तना-मनातही उफळून यायची एवढी ताकत अटलजींच्या भाषणात होती. आम्ही अटलजींचे २० वर्षे पाहिले यामधले दहा वर्षे हे शब्दविनाचे होते परंतु जे दहा वर्षे होते ते अटलजींच्या कतृत्वाच्या मंदिरावर कळस चढवणारे पाहिले. आम्ही तर स्वत:ला भाग्यवानच समजतो अटलजींच्या संघर्षमय प्रवासाबरोबर सत्तेतला प्रवास आम्हाला याची देही याची डोळा पहावयास मिळाला. आजही आठवतय, जय जवान जय किसान बरोबर अटलजींनी दिलेला 
‘जय विज्ञान’ 
चा नारा या देशात आजही कर्मठ धर्म मार्तंड पहावयास मिळतात. धर्मांधतेचा पुरस्कार करणारा व्यक्तीही इथं दिसून येतो. बुवाबाजी आणि देवळातल्या पुजेला महत्त्व देणारा वर्गही इथं मोठ्या प्रमाणावर दिसतो, जो जनसंघ आणि भाजप हिंदुत्वाचा पुरस्कार करत सत्तेवर आला आणि संस्कृतीचा डांगोरा पिटवत जगासमोर चालायला धजला नाही तेव्हा त्याच जनसंघ आणि भाजपाच्या विचारसरणीवर आपला जीव ओवाळून टाकणार्‍या अटलजींना हिंदुस्तानच्या भविष्याचा वेध घेता आला. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला, परंतु २१ व्या शतकात जय जवान जय किसान बरोबर जय विज्ञानचा नारा देत देशाला शस्त्रस्त्राने अधिक बळकट करणारा पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पहावेच लागेल. अटलजींनी लाल किल्ल्यावरून भाषण केले तेव्हा ही अणुचाचणी देशाच्या तरुणांना धैर्य देणारी त्याचबरोबर त्या तरुणांच्या देशभक्तीला प्रोत्साहन देणारी असेल असेही अटलजींनी तेव्हा म्हटले. वाजपेयींची कारकिर्द वादळी नक्कीच परंतु वादग्रस्त नाही हेही तेवढेच खरे. अरे दुश्मनालाही हेवा वाटावा आणि अटलजींबद्दल आदर वाटावा, असे अटलजी देशासाठी आणि देशातील तरुणांच्या भविष्यासाठी झगडत राहिले. आज भाजपाची भूमिका सत्ताकारणाची असली तरी अटलजींच्या भाजपाची भूमिका सत्ताकारणापेक्षा समाजकारण आणि देशभक्तीची ठरली हे उघड सत्य कोणीही नाकारू शकणार नाही. 
अटल मृत्यू 
हे उघड सत्य प्रत्येकाच्या जिवनात असले तरी वाजपेयींचा शरीराने मृत्यू झालेला असला तरी त्यांच्या विचारांनी अटलजी आजही चीरतरुण जिवंत आहेत. ज्या पद्धतीने अटलजींचा प्रवास प्रत्येकाला हेवा वाटणारा आहे तेवढाच त्यांचा आत्मा जिवंत राहणारा असेल, असे आम्ही छाती ठोकपणे एवढ्यासाठीच सांगू शकतो. अटलजींचे विचार हिमालय एवढे उंच, सह्याद्रीसारखे ताठर, सागरासारखे अथांग आहेत. मेरे प्रभू मुझे इतनी उँचाई कभी मत देना, गैरों को गले लगा न सकू इतनी रुसवाई कभी मत देना, असं म्हणणारे अटलजी आठवले की, आजची लोकसभेतली परिस्थिती डोळ्यांसमोर तरली जाते. वाद-विवाद, हट्ट, हटवादेपणा याने व्यापलेली लोकसभा पाहितली की, आता लोकसभेमध्ये लाठ्या-काठ्या घेऊन बसायचे की शस्त्र घेऊन उभे राहायचे हेच कळायला मार्ग नाही. अटलजींच्या बाबतीत बोलावे तरी काय, लिहावे तरी काय, अटलजी होते तरी कसे ? या प्रश्‍नांचं उत्तर 
देशभक्तीने अटल 
असं एका वाक्यात देता येईल. पंतप्रधान मोकळे होते, मनमिळावू होते, समजून घेणारे होते, माणसाला माणूस म्हणूनच पाहणारे होते, असे एका ज्येष्ठ पत्रकाराने टेलिव्हिजनवर सांगितले. स्वत:चे अनुभव सांगताना तो पत्रकार म्हणाला, अटलजी जेंव्हा पंतप्रधान होते तेव्हा मी त्यांना रस्त्यात अडवून एक प्रश्‍न विचारला, माझ्या अन्य पत्रकार मित्रांनी अरे ते पंतप्रधान आहेत, असे विचारत नसतात, असे म्हटले, परंतु अटलजींनी थांबून माझ्या प्रश्‍नाचे उत्तर दिले. यातूनच अटलजींच्या उंचीची कल्पना येईल, अशा या अजात शत्रूला सायं. दैनिक बीड रिपोर्टरकडून त्रिवार वंदन.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review