ताज्या बातम्या

असा नेता 

प्रखर - मजीद शेख 


   साठ वर्ष देशाच्या राजकारणात अधिराज्य गाजवणारा एकमेव नेता म्हणुन अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव इतिहासात नोंदले गेले. नुसतं राजकारणात असून फायदा नसतो. त्या राजकारणातून माणूस किती घडतो आणि त्यातून तो किती आकाराला येतो यावर सगळं काही अवलंबून असतं. बरीच मंडळी आयुष्यभर राजकारण करत असतात. पण शेवट पर्यंत त्यांना ना सुर सापडतो ना त्यांना नेता होता येतं. आपल्याला मानणारा जनसमुदाय निर्माण करणं हे राजकारणातली सर्वात मोठी कारकीर्द असते. माणसं जोडणं हे काही सोपं काम नाही. सत्ता असतांना जी माणसं सोबत असतात ती सत्ता नसतांना असतीलच असं नाही. पण सत्ता असो किंवा नसो जी माणसं त्या नेत्यासोबत असतात तोच नेता खरा असतो. तोच जनतेला भावत असतो. त्याचीच इतिहास दखल घेत असतो. गेल्या शंभर वर्षाच्या कार्यकाळात देशात नेहरु, गांधी घराण्याचे वर्चस्व राहिलेले आहे. या व्यतिरिक्त इतर नेत्यांना राजकारणात गांधी घराण्या इतका जम बसवता आला नाही. पण विरोधात असलेले एकमेव अटलबिहारी वाजपेयी आहेत त्यांना जनतेच्या मनावर राज्य करता आले. कुठलीही अपेक्षा न ठेवणारा आणि कर्तव्यापासून दुर न हाटणारा, राजकीय धर्माचे काटेकोरपणे पालन करणारा नेता म्हणुन अटल बिहारी यांच्याकडे पाहितले जाते. वाजपेयी आज शरीराने गेले असले तरी मनाने आणि विचाराने ते कायम अमर राहतील असे कार्य त्यांनी आपल्या जीवनात करुन ठेवले. इतिहास कोणाचीही दखल घेत नाही. त्याला तितका त्याग करावा लागतो. तितकी मेहनत घ्यावी लागते तेव्हाच इतिहास त्या माणसाची दखल घेतो. राजकारण कसं असावं हे वाजपेयी यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. नव्या पिढ्यांना वाजपेयी यांच्या सारखे मोठे राजकीय व्यक्तिमत्व पाहता आले हे तरुणांचे भाग्यचं म्हणायचं! साहित्यातून राजकारण फुलवणं हे दर्मिळ आहे. 
ठोस निर्णय 
राजकारणात आपली छाप पाडता आली पाहिजे. अटल बिहारी यांनी सत्ता असतांना अनेक ठोस निर्णय घेवून देशालाच नव्हे तर जगाला आपले कर्तृत्व दाखवले आहे. १९९८ च्या मे महिन्यात अटलजींनी अणुचाचणीचा निर्णय घेतला. याला अमेरिकेचा विरोध होता. पण अमेरिकेला चकवा देत अणु चाचणी घेवून वाजपेयी यांनी मोठी कामगिरी करवून दाखवली. अणुचाचणीमुळे आपल्यावर अमेरिका नाराज होईल किंवा आर्थिक निर्बध लादेल असा कोणताही विचार न करता देशाच्या हितासाठी त्यांनी ११ व १३ मे १९९८ ला पोखरणमध्ये यशस्वी चाचणी केली. तसेच १५ ऑगस्ट २००३ रोजी अटलजींनी चंद्रयान १ ची घोषणा केली. ही देशातील पहिली चंद्र मोहीम होती. २२ ऑक्टोबर २००८ रोजी श्रीहरिकोटा येथून यानाचे प्रक्षेपण झाले. चंद्राची परिक्रमा करणे आणि माहिती गोळा करणं या मोहिमेचे उदिष्ट होते. या यानाने चंद्रावरील पाण्याचा शोध घेतला ते इस्त्रोसाठी सर्वात मोठे यश होते. वाजपेयी भाजपाचे असले तरी ते राजधर्माचे पालन करणारे होते. त्यांनी आपला परका असा भेदभाव केला नाही. गुजरातची दंगल देशासाठी कलंकीत घटना होती. या दंगलीमुळे सर्वत्र टिकीची झोड उठत होती. दंगलीच्यावेळी गुजराचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. गुजरातच्या दंगलीने वाजपेयींचे कवी मन अस्वस्थ झाले होते. मोदी यांना राजधर्माचे पालन करा असं त्यांनी बजावलं होतं. बाबरी मस्जिद पाडल्यानंतर भाजपाचे लोक आनंद व्यक्त करत होते. मात्र वाजपेयी यांनी या दुर्देवी घटनेची निंदा करुन हे चुकीचं झालं आहे असं म्हणत त्यांनी त्यावर टिका केली होती. 
बीडचं नातं 
प्रचाराच्या दरम्यान वाजपेयी जसं देशातील विविध जिल्हयात जात होते. तसं ते बीडलाही आले होते. १९७७ साली त्यांची अंबाजोगाईला सभा झाली होती. त्यानंतर १९८३ साली त्यांची परळीला सभा झाली होती. १९८४ साली त्यांनी आष्टी तालुक्यातील कडा ग्रामपंचायतला भेट दिली होती. १९८६ साली दुष्काळ पडला होता. त्यावेळी त्यांनी राज्यातल्या अनेक भागात दुष्काळी दौरा केला होता. आष्टी तालुक्यातही त्यांनी दुष्काळी भागाची पाहणी करुन शेतकर्‍यांना दिलासा दिला होता. दुष्काळ निवारणासाठी त्यांना कडयाच्या लोकांनी १७०० रुपयाची थैली दिली होती. बीड तालुक्यातील कुर्ला येथे ही त्यांनी भेट दिली होती. २००४ साली वाजपेयी प्रचारासाठी बीडला आले होते. बीड शहरातील धानोरा रोडवरील मैदानात त्यांची जाहीर सभा झाली होती. या सभेला अलोट अशी गर्दी उसळली होती. या मैदानाला अटल बिहारी यांचे नाव देण्यात आले. १९९९ साली लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रीत झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी परळीला जाहीर सभा घेतली होती. बीड्‌च्या दौर्‍यात त्यांच्या सोबत स्व. प्रमोद महाजन आणि स्व. गोपीनाथराव मुंडे होते. वाजपेयी यांच्याच मार्गदर्शनाखाली महाजन,मुंडे यांची राजकीय जडण,घडण झालेली आहे. महाजन हे वाजपेयी यांचे माणसपुत्र मानले जात होते. वाजपेयी पंतप्रधान असतांना प्रमोद महाजन यांच्याकडे महत्वाचं खातं होतं आणि पक्षाचे काम ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चालत होतं. महाजन केंद्रात आणि मुंडे राज्यात राजकारणात झेप घेवू शकले ते वाजपेयी यांच्या अधिपत्याखाली. महाजन, मुंडे यांंचे वाजपेयी यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. 
भारताचे एक चित्र 
इंदिरा गांधी यांच्या कार्याचं वाजपेयी यांनी जाहीर कौतूक केले होते. इंदिराजींना त्यांनी दुर्गाची उपमा दिली होती. वाजपेयी यांनी आपल्या भाषणात कधीच विखारी भाषा वापरली नाही. कडवटपणाला त्यांनी स्थान दिले नाही. काय बोलावे याचा विवेक त्यांच्यामध्ये कायम जागृक असायचा. ग्रामीण भागातील सक्षमीकरणाकडे त्यांनी विशेष भर दिला. ५२ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्यावरुन देशाला उद्देशुन भाषण करतांना वाजपेयी म्हणाले होते मी भारताचे एक चित्र पाहिले आहे. भुक आणि भयापासून मुक्त असलेला भारत. निरक्षरता आणि दारिद्रयापासून मुक्त असलेला भारत. वाजपेयी हे स्वातंत्र्य चळवळीला योगदान देणारे नेते होते. १९४२ च्या आंदोलनात ते तुरंगात ही होते. १९७५ ला त्यांनी आणीबाणीत तुरुंगवास भोगलेला आहे. लोकशाहीचे ते सच्चे पाईक होते. लोकशाहीच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे. विरोधकांची स्तुती करणारा हा नेता होता. 
आघाडीची मोट बांधली 
देशात अनेक वर्ष कॉंग्रेसची सत्ता राहिली. तसं कॉंग्रेस पक्षाचं वलय मोठं होतं. कॉंग्रेस पक्षाच्या हातातून सत्ता हास्तगत करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. भाजपाच्या विचाराची लोकं त्यावेळी दुर्मिळ होती. आपल्या बाजुने जनमत निर्माण करणं म्हणजे एखाद्या मोठ्या पर्वतावर विजय मिळवणं अशीच परस्थिती होती. पण वाजपेयी पक्षाला ताकद देण्याचे काम करत राहिले. अगदी ग्रामीण भागात जावून ते लाखोंच्या जाहीर सभा घेत होते. भाजपाला १९९६, १९९८ आणि १९९९ साली सत्ता मिळाली. १३ दिवस, १३ महिने आणि पाच वर्ष वाजपेयी पंतप्रधान होते. एकट्या भाजपाला सत्ता मिळणार नाही म्हणुन त्यांनी काही पक्षांना सोबत घेवून राष्ट्रीय लोकशाहीची मोट बांधली. १९९९ साली सत्तेची पाच वर्ष पुर्ण केली ती घटक पक्षाच्या सहकार्यामुळेच. वाजेपयी यांनीच भाजपासोबत काही घटक पक्षाचा मेळ घालून दिलेला आहे. आज जे काही घटक पक्ष भाजपा सोबत आहेत ते आजच्या भाजपाची कृपा किंवा त्यात सध्याच्या नेत्यांचे योगदान आहे असं नाही ती वाजपेयी यांची पुण्याई आहे. वाजपेयी यांच्यामुळेच राज्यातही भाजपा-शिवसेनेची युती झाली होती. मात्र आज या दोन्ही पक्षात विस्तही जात नाही. शिवसेनेची सध्याच्या भाजपा नेतृत्वाने कदर केली नाही म्हणुन शिवसेना भाजपापासून मनाने दुर गेली. इतर काही घटक पक्षही भाजपापासून बाजुला गेले. याला कारण म्हणजे आजच्या भाजपा पुढार्‍यांच्या नाकात सत्तेचं वारं घुसलं आणि घटक पक्षाला दुय्यम वागणूक मिळू लागली. वाजपेयी यांचे राजकारण कधीच खुनशी पणाचे नव्हते म्हणुन ते देशाच्या राजकारणात प्रभावी ठरले. विरोधकांनाही त्यांनी मान दिला. त्यांचा आदर केला. सत्तेसाठी वाट्टेल ते हे ध्येय त्यांचे कधीच नव्हते. पंडीत नेहरुंनी सुध्दा त्यांचे कौतूक केलेले आहे. एकता, संरक्षण, विकास ही वाजपेयी यांच्या राष्ट्रवादी विचारांची त्रिसुत्री होती. ते एक मोठ्या मनाचे नेते होते. संसदेची प्रतिष्ठा कायम राखाली पाहिजे अशी त्यांची नेहमीच तळमळ असायची. ते राजकारणातील आगळे वेगळे राजकारणी होते. राजकारणी म्हणुन ते थोर होते. त्यांच्या थोरवीचे कितीही गोडवे गायले तरी कमीच आहेत. त्यांच्या आदर्श राजकारणातून सध्याचे भाजपावाले किती बोध घेतात? वाजपेयी तीन वेळा पंतप्रधान होते पण कधीच देशातील अल्पसंख्याक किंवा इतरांना आपण असुरक्षीत आहोत असं वाटलं नाही. आज काय परस्थिती आहे? आजच्या राज्यकर्त्यांच्या काळात लोक सुरक्षीत आहेत का? वाजपेयी यांचा आदर्श आजचे भाजपावाले घेतील का?

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review