ताज्या बातम्या

जातीची शिंदळी तिला कोण वंशावळी

 

-गणेश सावंत 

स्वराज्य म्हणजे काय? जसा हा प्रश्‍न विचारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजेच स्वराज्य, हे उत्तर अखंड देशच नव्हे तर जग महाराष्ट्रासाठी देतो. स्वाभिमानाने, अभिमानाने छत्रपतींच्या स्वराज्याचं तो गुणगाण गातो, त्याच महाराष्ट्रात आज जात म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? याचं उत्तर शोधण्यासाठी अनगिणत वणवण फिरत आहेत. काहींना उत्तराचा मार्ग मिळाला, काहींनी उत्तराचा मार्ग शोधला मात्र काही जात आणि धर्माचं उत्तर शोधण्यासाठी जे भरकटून गेले ते एकतर धर्माच्या नावावर कर्मकांड करणारे भोंदू ठरले नाहीतर धर्माच्या नावावर धर्म रक्षणाच्या भाबड्या अभिमानावर दहशतवादी होत राहीले आणि या दहशतवाद्यांची पैदास छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात होते यापेक्षा दुर्दैव ते काय? महाराष्ट्राच्या साधू-संत-सुफींनी, समाज सुधारकांनी आपलं उभं आयुष्य माणूस ही जात सांगण्यासाठी घालवलं. देव देवळात नाही तर माणसात आहे. वेळोवेळी ठणकावून सांगितलं. त्याच महाराष्ट्रात काही धर्ममार्तंड आणि कर्मठ लोक जेंव्हा धर्माचा पुरस्कार करण्याचा आव आणत आतंकवादी बनतात, तेव्हा हा तोच महाराष्ट्र आहे का? जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. हा तोच महाराष्ट्र आहे का जिथं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी कर्मकांडावर आसुड ओढले. ‘वेदाचा तो अर्थ आम्हासी ठावा, इतरांनी वहावा भार माथा‘ म्हणत शिक्षण कोणाची जहागीरी नाही. वेद शिकणे, अक्षर ओळख होणे, सज्ञान होणे, साक्षर होणे हे कोण्या एका जातीचं प्राबल्य नाही म्हणत तुकोबांनी उभं आयुष्य समाजाला दिशा दिली. याच महाराष्ट्रात शाहू-फुले-आंबेडकर यांनी जातीच्या उतरंडी खोडून टाकल्या. संत तुकडोजी, संत गाडगेबाबा यांनी पोटतिडकीने खरा धर्म सांगितला. साने गुरुजींनी ‘खरा तो एकची, धर्म जगाला प्रेम अरपावे’ हे समजावून सांगितले. परंतु त्याच बहुजन विचारसरणीच्या महाराष्ट्रात 
जातीची शिंदळ 
जन्मल्याच कशा? हा प्रश्‍न आश्‍चर्यकारक नाही. कारण आजही छत्रपती शिवाजी महाराजांपासून जगद्गुरू संत तुकोबा आणि शाहु-फुले-आंबेडकरांपर्यंतच्या विचारसरणीला अंदरुणी विरोध करणारी पैदास घर करून आहे आणि याच कर्मठ धर्म मार्तंडांनी त्याकाळी जे केले तेही आज ‘जय जवान जय किसान’ बरोबर ‘जय विज्ञान’चा नारा देणार्‍या २१ व्या शतकातही तेच करण्याचं काम सुरू ठेवलं. अशा धर्म-मार्तंडांबाबत किंवा जातीचे बेगडे डांगोरे पिटवणार्‍यांबाबत जगद्गुरू तुकोबा म्हणतात, 
जातीची शिंदळ | तिला कोण वंशावळ ॥
आप घर | ना बाप घर| चित्ती म्हणी व्याभिचार ॥
शेजे असुनिया धनी | पर द्वार मनानी ॥
तुका म्हणे, असील जाती | जातीसाठी खाती माती ॥

एखादी शिंदळ आपल्या नवर्‍याशेजारी शेजेवर झोपलेली असताना शेजार्‍याच्या दाराकडे लक्ष ठेवत असेल  तर तिची जात ती काय? आज तीच परिस्थिती जातीयवाद करणार्‍या प्रत्येक धर्माच्या व्यक्तीबाबत निर्माण झाली आहे. आपण काय करतोय, कशासाठी करतोय आणि यामध्ये आनंद तरी काय, आम्ही नेहमी म्हणतो, स्वत:च्या धर्माचा नक्की गर्व करावा, परंतु दुसर्‍याच्या धर्माचा अनादर करण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि नेमके इथेच काही पिलावळी धर्माचा झेंडा घेऊन धर्मांधतेचा नारा देत हिंडतात आणि माणसा-माणसामध्ये झगडे लावण्याचा प्रयत्न करतात. गेल्या शतकामध्ये जसे समाजसुधारक होते तसे २१ व्या शतकातही माणसाला माणूस म्हणून जगा म्हणणारे, जगवा म्हणून सांगणारे नरेंद्र दाभोळकरांसारखे, पानसरेंसारखे, कलबुर्गे, गौरी लंकेशसारखे असे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर कित्येक नावे घेता येतील. ते आपल्या विचाराशी दृढतेने राहिले. हेच विचार त्याकाळच्या मंबाजींना आणि आजच्या दहशतवाद्यांना खपले नाही अन् या सोन्यासारख्या माणसाला माणूस म्हणून जगा म्हणणार्‍या माणसांची निर्घृण हत्या केली. त्यांची हत्या म्हणजे माणूस म्हणून जगणार्‍या प्रत्येक व्यक्तीची हत्या आहे. जेंव्हा हे प्रकरणे उघडकीस आले तेव्हाही स्फोटके, शस्त्रास्त्रे त्या नत्‌दृष्टांच्या घरी आणि दारी सापडले. याला योगायोग म्हणायचं का? नक्कीच नाही. हा दळभद्री भोग म्हणावा लागेल. मुसलमानाचा जिहादी अतिरेकी दहशतवादी असतो, मग 
हिंदुंचा धर्मरक्षक कसा? 
हा जळजळीत प्रश्‍न विचारण्याचं धाडस आम्ही नक्की केलय? छत्रपतींचे मावळे म्हणवून घेणारे आणि जगद्गुरू संत तुकोबांचे भक्त म्हणून आम्ही वावरणारे हे प्रश्‍न, हा सवाल करूच. कारण मुंबईतील नालासोपार्‍यात वैभव राऊत नावाचा कर्मठ धर्मांध पकडला गेला. २० पेक्षा जास्त जिवंत बॉम्ब त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर आरडीएक्स सापडलं. त्यापाठोपाठ सुंधवा गोंधळेकर, शरद कळसकर, सचिन अंधुरे, श्रीकांत पांगारकर यांच्यासह अन्य आठ ते दहा त्याच दहशतवादी विचारसरणीचे लोक शस्त्रास्त्रासह मिळून आले. महाराष्ट्राची कुस ही माणसाला माणूस म्हणवून जगवणारी आहे. महाराष्ट्र राज्य हे स्वराज्याचा उदो उदो करणारा प्रदेश आहे आणि याच प्रदेशात कुठल्या एका धर्मरक्षणासाठी शस्त्रास्त्र वापर कोणी करत असेल तर तो धर्मरक्षक असूच शकत नाही तो दहशतवादी आणि आतंकवादीच असू शकतो. कुठल्याही दहशतवाद्याला अथवा आतंकवाद्याला जात नसते, धर्म नसते, पंथ नसते त्याला असते ती विकृती. पाकिस्तानातील मुस्लिम आतंकवादी हिंदुस्तानात आतंकवादी कारवायांना अंजाम देतात तसेच पाकिस्तानसह अन्य मुस्लिम बहुबहल राज्यात आणि देशात मुस्लिम आतंकवादीच आतंकवादी कारवायांना अंजाम देत आले आहेत. त्यामुळे मुस्लिम अतिरेकी हे केवळ हिंदुच मारतात, असे नाही किंवा हिंदू अतिरेकी हे केवळ मुसलमानालाच मारतील असे नाही. अशा कर्मठ आणि धर्मांधांच्या मस्तकामध्ये विकृतीच्या अळ्या अशा काही वळवळ करतात आणि त्या वळवळणार्‍या अळ्यातून एखाद्या घटनेला अंजाम दिले जाते तेव्हा सरकारही आणि काही धर्माचे पुरस्कर्तेही त्यांना पाठीशी घालतात तेव्हा 
हम आह भी करते है तो हो जाते है बदनाम
वो कत्ल भी करते है तो चर्चा नही होती 

असे म्हणण्याची वेळ एखाद्या समाजाला येते तेव्हा शिवरायाचा महाराष्ट्र बदनाम होतो, शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र काळवंडला जातो आणि हे कुणामुळे होते? जात-पात -धर्म-पंथाच्या नावावर राजकीय पोळ्या भाजणार्‍या तथाकथीत राजकारण्यांमुळेच. महाराष्ट्रात सध्या जी काही 
धर्मांधांची टोळधाड 
पहावयास मिळत आहे ही टोळधाड महाराष्ट्राच्या विचारसरणीला बरबाद करणारी आहे. त्यामुळे अशा टोळधाडीला वेळीच आवर घालणं महत्त्वाचं आहे. दहशतवाद्यांना जात नसते, गुंड -मवाल्यांना धर्म नसतो त्यामुळे ज्यांच्याकडे बॉम्ब, आरडीएक्स, शस्त्रास्त्रे सापडले आहेत हे धर्माचे रक्षक नव्हे तर त्या त्या धर्माचे राक्षस समजावेत. कुठली एखादी संघटना अथवा पक्ष अशांना पाठीशी घालत असेल तर ती संघटना आणि तो पक्ष मुळासकट उखडून काढावा. महाराष्ट्राच्या मातीत निपजलेल्यांना अशा नत्‌द्रष्ट पैदासींना मुळासकट उपटणे कधीच अवघड गेलेले नाही. म्हणून आम्ही पुन्हा राज्य सरकार आणि केंद्र सरकारला आवाहन करत आहोत. जात-पात- धर्म-पंथाच्या नावावर तरुणांचे टाळके भडकवणार्‍या जाती-जातीत भांडणे लावणार्‍या लोकांच्या मुसक्या बांधणे, नव्हे नव्हे तर अशा लोकांच्या टिर्‍या सोलून काढणे गरजेचे आहे. आज हे केलं नाही, आज झालेली ही छोटी जखम उद्या कुरूप होईल आणि उभ्या महाराष्ट्राला काळवंडून टाकेल. असो तो कुठल्या जातीचा, असो तो कुठल्या धर्माचा आणि कुठल्याही पक्ष-संघटनेचा, तो मुसलमान आहे की हिंदू आहे, तो पारशी आहे की अन्य कुठल्या जातीचा? तो गुंड-मवाली आणि दहशतवादी एवढाच आहे आणि त्याचा धर्म हा विध्वंस आहे.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review