ताज्या बातम्या

वेडं कोण?

नोटबंदी फसली, विकास फसवा 
वेडं कोण?
प्रखर - मजीद शेख 

भाजपा संस्कारी पक्ष म्हणुन ओळखला जात होता. पण आजच्या भाजपात संस्कार आहेत का? असते तर सध्याचे भाजपाचे पुढारी वेड लागल्यासारखं बडबड करत बसले नसते. भाजपाचे काही नेते चुकून आमदार, खासदार, मंत्री झालेले नेहमीच झटके आल्यासारखे बोलतात. बोलावे पण त्या बोलण्याला अर्थ असावा? विचार असावा आणि आपल्या बोलण्यातून लोकांनी काही तरी चांगला बोध घ्यावा? चांगल्या आणि अभ्यासू बोलण्याची नेहमीच देशातील जनतेने कदर केलेली आहे. जे चांगल्या विचाराचे नेते होऊन गेले आणि आज आहेत त्यांचा समाज आदरच करत आलेला आहे पण उगीच झोपेतून उठल्यासारखं काही तरी बोलून चर्चेत राहणार्‍यांची संख्या वाढू लागली. धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तये नेहमीच होत आहेत पण व्यक्तीगत टिका वैचारीक करावी हे शहाणपण संस्कारी भाजपाच्या नेत्यांना कुणी सांगावे? विचार काय असतो हेच भाजपाच्या पुढार्‍यांना माहित नसावं? आपल्याकडे पुढारी होण्यासाठी कुठलीही अट लागत नाही. त्याला कुठलीही परीक्षा द्यावी लागत नाही. त्यामुळे वाचाळ पुढार्‍यांच्या जिभा नेहमीच मोकळ्या असतात. त्या गालात इकडून-तिकडे सैल होत असतात. त्या इतक्या सैल होतात की त्याला काही अंतच नाही. वाईट, वात्रट बोलणार्‍यांना म्हटलं जातं त्याच्या जिभेला हाड आहे की नाही? अशीच परस्थिती आजच्या भाजपाची आहे.
आरोग्य कोणाचं बिघडलं? 
मोठया पदावर बसलेल्यांना आपल्या मनावर ताबा ठेवूनच राजकारण करावे लागते. राजकारण करायचं म्हटलं की तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो. कुठे काय बोलावे आणि कोणते मुद्दे उपस्थित करावे याची अक्कल पुढार्‍यांना असावी. ज्यांच्या अंगी सदगुण आहे तेच पुढारी राजकारणात यशस्वी होत असतात. केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री अश्‍विनी चौबे यांचा तोल गेला आणि त्यांनी राहूल गांधी यांना वेडं म्हटलं. हे महाशय एवढ्यावरच थांबले नाही तर राहूल गांधी हे नालीतील किडा असल्याचे म्हटले म्हणजे आपण मंत्रीपदासाठी किती लायक आहोत हे त्यांनी देशाला दाखवून दिले. आरोग्यमंत्री असलेला माणुस स्वत:च वेड्यासारखी बडबड करतो म्हणजे कुणाला वेडयाच्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे याचं आत्मचिंतन मंत्री अश्‍विनी चौबे यांना करण्याची गरज आहे. 
खोटारड्‌े नाहीत तर काय? 
लोकशाहीत वाद-विवाद होत असतात आणि ते झालेच पाहिजेत. सत्ताधारी भलेही बहुसंख्याकाच्या जोरावर सत्तेवर बसलेला असला तरी विरोधात असणार्‍यांना तितकीच किंमत लोकशाहीत असते. विरोधकांना दोन नंबरचे मते पडलेली असतात. विरोधच नसेल तर मग ती लोकशाही कसली? सत्ताधार्‍यांवर अंकूश ठेवण्यासाठी विरोधी पक्ष आक्रमकच असायला हवे. तेव्हा कुठं सत्ताधार्‍यांना कायद्याच्या चौकटीत राहून आपला कारभार हाकावा लागतो पण सध्याचे भाजपाचे सत्ताधारी विरोधकांना देशाचे दुश्मनच समजू लागले. विरोध करणार्‍यांना ते देशद्रोहींच्या रांगेत उभे करु लागले. भाजपा जेव्हा विरोधात होता तेव्हा ते विरोधकांची भुमिका चोख बजावत नव्हते का? मग आजच्या विरोधी मतांचा त्यांना इतका का राग यावा? पंतप्रधान किंवा इतर केंद्रीय मंत्र्यावर आरोप होत असतात. आपल्यावर आरोप झाले म्हणजे आपण आपली पातळी सोडायची का? कंबरेचं सोडून डोक्याला गुंडळायचं का? आज पंतप्रधान मोदी माजी पंतप्रधान स्व. पंडीत नेहरु, इंदिरा गांधी, स्व. राजीव गांधी यांच्यावर देखील आरोप करतात. विशेष करुन जे लोक ह्यात नाही त्यांच्या बद्दल काही वाईट बोलू नये अशी आपली संस्कृती सांगते. मग ह्या संस्कृतीचा विसर पंतप्रधांना का पडत आहे? पंतप्रधानांना खोटारडे म्हटले तर त्यात इतका घुसाडा येण्याचं काहीच कारण नाही? पंतप्रधानांनी जे आश्‍वासने दिली होती. त्यातील किती पुर्ण केली? चार वर्षात देशाचा किती विकास झाला? याचा हिसोब मोदींचे चेले काही देत नाहीत? खोट्याला खोटं नाही तर खरं म्हणायचं का? 
नोटबंदीचा निकाल समोर आला 
दोन वर्षापुर्वी पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदी केली. नोटबंदीचं कारण दिलं होतं. भ्रष्टाचार संपवणं. काळा पैसा बाहेर आणणं आणि दहशतवाद संपवणं? या तीन गोष्टीपैकी एक ही गोष्ट शक्य झाली नाही. उलट नोट बंदी करुन लोकांना वेठीस धरण्यात आले. नोटा बदलण्यासांंठी लोकांना रांगेत उभे राहावे लागले. हक्काचे आणि कष्टाचे पैसे बदलण्यासाठी जे लोक रांगेत उभे होते ते चोर होते का? ते भ्रष्टाचारी होते का? याचे उत्तर मोदी भक्त का देत नाहीत. नोटा बदलतांना रांगेत उभे राहणार्‍या शंभरपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला. भाजपाच्या पुढार्‍यांनी अंधारातून नोटा बदलून घेतल्या. मरणार्‍यापैकी एखादा तरी पुढारी होता का? बरं भाजपाचा एखादा पुढारी नोटा बदलण्यासाठी रांगेत उभा राहिला असं दिसून आलं का? उलट नोट बंदीला ज्यांनी विरोध केला त्यांनाच भाजपाच्या पुढार्‍यांनी वेड्यात काढून हे देशाचे दुश्मन असल्याची त्यांची अवहेलना करुन आपण किती देशभक्त आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत होते. दोन वर्षानंतर रिझर्व्ह बँकेने किती नोटा आपल्याकडे जमा झाल्याचा अहवाल जाहीर केला. ९९.३० टक्के नोटा बँकेत जमा झाल्या. आता कुठं गेला काळा पैसा? नोटबंदीवर पंतप्रधान किंवा त्यांचे चेले काहीच बोलत नाही. देशाची फसवणुक केली म्हणुन ४२० चा गुन्हा कुणाच्या विरोधात दाखल करायला हवा? नोटबंदीचा विरोध करणारे वेडे होते की, निर्णय घेणारे?
भुमिका मांडणे म्हणजे देशद्रोह नव्हे 
आपल्या हाती सत्ता आली म्हणजे दुसर्‍यांना काहीही म्हणुन हिणवायचं. त्यांची तुलना कशाही करायची. अशी जणु मोदी भक्तांमध्ये एक प्रकारची लाटच निर्माण झाली. ज्यांना देशभक्तीची व्याख्या माहित नाही असे लोक दुसर्‍यांना देशद्रोही ठरवून लागले. तसे प्रमाणपत्र वाटप करु लागले. लोकशाहीत एकाच पुस्तकातील गाणे देशभक्तीचा मापदंड ठरु शकत नाही. लोकांना त्यांच्या पध्दतीने देशप्रेम व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. सरकारच्या विद्यमान धोरणाशी जर विचार जुळत नसतील तर त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा आरोप लावता येणार नाही असे. मत विधी आयोगाने व्यक्त केले. यातून मोदी भक्तांनी बोध घेतला तर त्यांचा तो शहाणपणा ठरेल? 
आजचे नेते 
आजच्या नेत्यामध्ये विश्‍वासार्हतेचा प्रचंड अभाव आहे. त्याचं उघड-उघड कारण म्हणजे त्यांची वचनं धांदात खोटारडेपणाची असतात. काही नेते सत्तेसाठी तत्वं बदलतात तर काही तत्वांसाठी सत्ताच बदलतात. खोट्या नेत्यासाठी सत्ता शक्तीमान असते. तर पैसा सर्वशक्तीमान असतो. खोट्या नेत्यांचे विचार सिमेंट क्रॅक्रीटसारखे असतात. एकमेकांत मिसळून भेसळ झालेले आणि कायमचे घट्ट झालेले. त्याचे विचार संकुचीत असतात. खोटारड्‌े नेते लोकप्रियेतेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. ते निमित्ता, चारित्र्य आणि सत्यनिष्ठा यांच्याबरोबर तडजोडी करु शकतात. आर्थिक फायद्यासाठी ते समाजच उध्दवस्त करु शकतात. भावना भडकवणारी भाषणं करणं किंवा मोर्चाच्या अग्रभागी असणं म्हणजे नेतृत्व नव्हे? नेतृत्व विश्‍वासावर ठामपणे आधारलेले असतं. आपला अहंभाव आपला मीपणा सार्वजनिक हितासाठी दुर्लक्षीत करणारे लोकच दुसर्‍यामध्ये विश्‍वास जागृक करु शकतात. महात्मा गांधी यांच्याकडे बंदुका नव्हत्या. पैसाही नव्हता. पण कोट्यावधी लोकांना हलवून सोडण्याचं सामर्थ्य मात्र त्यांच्या ठायी होतं. प्रचंड विश्‍वासापोटी लोक गांधीजींच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करत होते. आज गांधी यांचे नाव स्वार्थापोटी घेतलं जातं. एकीकडे हिंसेला थारा नाही म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र हिंसेला अंधारातून पाठींबा द्यायचा ही आजची राजनिती आहे. हे राजकारण घातकी आहे, वेडपटपणाचं आहे?
फेस आणला 
चार वर्षातच भाजपाचा रंगाचा बेरंग झाला. पुढील निवडणुका जिंकण्यासाठी वेगवेगळ्या आयडीया भाजपावाले लढवू लागले. मग त्या आयडीया समाजाचं नुकसान करणार्‍या असल्या तरी भाजपा ते करायला तयार आहे. दोन समाजात फुट पाडायची किंवा आपल्या विरोधी लोकांना कुठल्या ना कुठल्या कारवायात आडकावयाचं असचं धोरणं भाजपावाल्याचं दिसू लागलं. विरोधात असलेले कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी गेल्या दीड वर्षापासून चांगलेच चर्चेत आले. पुर्वी राहूल गांधी यांची सगळेच खिल्ली उडवत होते. त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी देखील त्यांची अनेक वेळा टिंगल केलेली आहे पण पुर्वीचे राहूल आणि आजच्या राहूलमध्ये खुपच बदल झाला. गुजरातच्या निवडणुका पासून राहूल गांधी यांचा करिष्मा देशाला दिसून आलेला आहे. राहूल हे राजकारणात चांगलेच मुरब्बी होऊ लागले. विशेष करुन ते भाजपाला जशास तसे उत्तर देवू लागल्याने भाजपावाल्यांची गाळण होऊ लागली. राहूल हे पप्पू राहिले नसून ते टप्पू देवू लागल्याने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकू लागली. उठता-बसता भाजपावाल्यांना राहूलच दिसू लागल्याने त्यांचे संस्कृतीला लाजवणारे वक्तव्ये तोंडातून बाहेर पडू लागले म्हणजे भाजपाला आता पासून आपल्या पराभवाची भीती वाटू लागल्याने भाजपाचे नेते वेड लागल्यासारखे बरळू लागले. जी माणसं स्वत:च वेडयासारखी वागतात आणि दुसर्‍यांना वेडं म्हणण्याचा शहणपणा दाखवतात ती माणसं जनतेच्या नजरेत वेडे असतात? 

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review