ताज्या बातम्या

भाजप नेत्यांनी कंबरेचं सोडलं डोक्याला बांधलं

आज रिपोर्टर रोखठोक

देखोणी हरखली अंड | पुत्र झाला म्हणे रांड ॥ 
तव तो झाला भांड | चाहाड चोर शिंदळ ॥

भाजप नेत्यांनी कंबरेचं सोडलं डोक्याला बांधलं

गणेश सावंत -9422742810
प्रभु रामाचं नाव घ्यायचं, रामराज्याची भाषा करायची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे स्वप्न दाखवायचे, निवडणुकांमध्ये मते घ्यायची आणि निवडूण आलं की रयतेला अक्षरश: नागवायचं. निजामशाही, कुतुबशाही, आदीलशाहीला लाजवेल असे कृत्य करायचे. कुठे कुभांड अखायचं तर कुठे आळ घ्यायचा. सत्ताधार्‍यांविरोधात बोललं तर त्यांना नक्षलवादी ठरवायचं, देशद्रोही ठरवायचं. स्वत: मात्र वर शेपूट करून उधळलेल्या वळु गत जिकडं तिखडं उधळायचं. नाही त्या आळीला जावून नरकडी करायची असे एक ना अनेक उदाहरणे सत्ताधीश भाजपाच्या नेत्यांचे या चार वर्षामध्ये आढळून आले आहेत. मग सत्ताधार्‍यांना सत्तेचा माज चढलाय का? सर्वसामान्य कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर यांना बटीक समजतायत का? स्त्रियांकडे भोगाची वस्तु म्हणून पाहिल जातय का? असे एक ना अनेक प्रश्‍न रावसाहेब दानवे, प्रशांत परिचारक, गिरीष बापट, मुक्ता टिळक, छिंदम आणि आता राम कदम यांनी केलेल्या वक्तव्यावरून पडल्याशिवाय राहत नाही. खर पाहिलं तर सत्तेत आलेलं भाजप सत्तेच्या शेजेवर पडल्यापासून कंबरेखाली आलय तर नेत्यांनी कंबरेचं सोडून डोक्याला बांधलय. कामातूर झालेल्या, मदमस्तीत असलेल्या आणि सत्तेचा माज चढलेल्या अशा लोकांवर कठोर कारवाई झाली नाही तर भविष्यात या महाराष्ट्रात अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे सात्वीक असल्याचा अभास दाखवायचा आणि दुसरीकडे जाहीरपणे स्त्री जातीचा अपमान करायचा अन् पुन्हा माजावर आल्यागत पश्‍चातापही करणार नाही. ही सध्याच्या भाजपातील वाच्चाळ वीरांची भूमिका मग कुठय तुमची 
संस्कृती आणि संस्कार?
आम्ही सांगू ते चांगले, आम्ही करू ते देशहिताचे, आम्ही बोलू ते देशभक्तीचे हा जो भाजपाचा अठ्ठहास आहे तो भाजप नेत्यांच्या आजच्या वाच्चाळ बडबडीने अक्षरश: नागवा झाला आहे. भाजप म्हणजे संस्काराचं माहेरघर, भाजप म्हणजे संस्कृतीचा महामेरू अस म्हणत स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची कधी रामाच्या नावावर, कधी धर्माच्या नावावर तर कधी वंदे मातरम्, भारत माताच्या नावावर राजकारण करायचं. या राजकारणातून एखाद्याने त्रुट्या काढत हे राजकारण जातीयवादी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याला देशद्रोही म्हणायचं. ही जी भाजपाची संस्कृती आहे ती संस्कृती ना हिंदुस्तानची ना महाराष्ट्राची. ज्या महाराष्ट्रामध्ये स्त्री जातीला देहवार्‍यातील देवी समजले जाते त्याच स्त्री जातीवर अपशब्द वारंवार वापरण्याचं काम भाजपाच्या नेत्यांकडून विधीमंडळातल्या पदाधिकार्‍यांकडून होत असेल तर भाजपाची संस्कृती आणि संस्कार हे अश्‍लिल आणि नागवे म्हणावे लागतील. तेही खरे आहे. मनु संस्कृतीने पछाडलेल्या भाजपाकडून आणि त्यांच्या पदाधिकार्‍यांकडून अपेक्षा ती दुसरी काय करणार. मनु संस्कृती सांगते स्त्री भोगाची वस्तु आहे. अन् त्याच मनु संस्कृतीत भाजपाचे नेते लहानाचे मोठे झाले आहेत. त्यामुळे स्त्रीयांचा आदर करणे हे या नेत्यांकडून अपेक्षित नाही. स्त्रीयांचे सोडा. जात, पात, धर्म, पंथावर माणसा माणसाची विभागणी करणार्‍या सत्ताधार्‍यांना कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दीनदुबळे हे ही अच्छुत वाटतात. म्हणूनच भाजपाचा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शेतकर्‍यांना आणि कष्टकर्‍यांना साले म्हणून हिनवतो. ज्या कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूरांवर हा देश चालतो त्याच देशवासियांना साले म्हणून एखाद्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष शिव्या घालत असेल तर हीच का ती भाजपची संस्कृती हा सवाल विचारलाच गेला पाहिजे. या पुढे जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मते मागायची, सत्तेत यायचे आणि त्याच महाराजांचा अपमान करायचा हे धारीष्ठ नव्हे तर रयतेच्या राजाचा अपमान भाजपाच्याच नेत्यांकडून होतो. हे दुस्साहस छिंदमसारख्या भाजपाच्या पदाधिकार्‍याने करावं अन् त्या पदाधिकार्‍याला भाजपाने अद्यापही आपल्या पखाखाली ठेवावं म्हणजे वाच्चाळ वीरांना भाजपाचीच साथ अथवा फुस आहे का? छिंदम पाठोपाठ प्रशांत परिचारक नावाचा भाजप पुरस्कृत आमदार व्यासपीठावरून सैनिक तिकडे वर्ष-वर्ष सीमेवर असतात ईकडे त्यांची पत्नी बाळांत होते अन् ते तिकडे पेढे वाटतात अशा पद्धतीचं अत्यंत घानेरड, संतापजनक वक्तव्य करून सैनिक पत्नींच्या चारित्र्यावर शिंतोडे भाजपाच्याच व्यासपीठावरून उडवले जातात. मग भाजपाची हीच संस्कृती आहे काय? भाजपाचे हेच पदाधिकार्‍यांना संस्कार आहेत काय? गिरीष बापट तरूणींसमोर येतात आणि जाहीरपणे तुम्ही जे व्हीडीओ दिवसा पाहता ते आम्ही रात्री पाहतो असे म्हणत पानाचा देठ किव हिरवा म्हणत म्हतारपणी चाळे करतात. ही संस्कृती भाजपाचीच म्हणावी लागेल काय? किती नावं घ्यावीत आणि भाजपाचे नागवेपण किती दाखवावे. नक्कीच भाजपातील सर्वच नेते असे आहेत हे म्हणणे योग्य ठरणार नाही. परंतू ज्याप्रमाणे 
सर्वच मुसलमान अतिरेकी नसतात,परंतु 
पकडलेला प्रत्येक अतिरेकी मुसलमान असतो 
असा प्रचार भाजप समर्थक ज्या पद्धतीने करत आले आहेत त्याच पद्धतीने आज आम्ही ही म्हणतो. प्रत्येक भाजपाचा नेता हा स्त्रीयांचा अपमान करत नसतो. परंतु जो स्त्रीयांचा अपमान करतो तो भाजपाचाच नेता असतो. आज हा विषय छेडण्याचे कारण एवढेच दहीहंडी सारख्या गोपळकाल्याच्या व्यासपीठावर स्वत:ला श्रेष्ठ, बुद्धीवादी, तत्त्वनिष्ठ, सामाजिक कार्य करणारा, सहा-सहा हजार बहिण असणार्‍या राम कदमांनी पोरांनो तुम्हाला एखादी मुलगी पसंत पडली तर मला फोन करा मी तिला उचलून आणून तुम्हाला देईल असं म्हणून जो आगाऊपणा केला आहे तो आगाऊपणा पोटातले ओठात आल्यागत आहे. कामातुरा भय न लज्जा प्रमाणे राम कदमांनी आपली अवकात दाखवू दिली आहे. एकीकडे राम कदम आपण हजारो महिलांकडून राखी बांधून घेतो असे म्हणतात मग आम्ही तर या राखीला असं म्हणू राख्या बांधणार्‍या महिला केवळ राम कदमाकडून सुरक्षित राहावे या भितीपोटीच राखी बांधून घेतात की काय? हा आम्हलाच नव्हे तर अखंड महाराष्ट्राला पडलेला प्रश्‍न आहे. ज्यावेळेस राम कदमांनी असे निर्लज्ज भाष्य केले, त्यानंतर राज्यभरातून छि थू झाल्यानंतरही राम कदम यांच्या चेहर्‍यावर किंचतसाही पश्‍चाताप दिसून आला नाही. स्वत:ला ह.भ.प.म्हणून घेणारे अन् मी तरूणांना आई-बापांची सेवा करा म्हणून सांगतो असा डांगोरा पिटवणारे राम कदम नावात जरी राम असले तरी कर्मात रावण असल्याचे चित्र महाराष्ट्रासमोर गोपाळकाल्यादिवशी आले. सात्वीकतेचा देखावा निर्माण करणारे राम कदम अंतरबाह्य वाच्चाळ असल्याचेही यातून स्पष्ट झाले. त्यांच्या लिलया या आधीही प्रकाश झोतात आल्या. परंतू महाराष्ट्राने त्याकडे दुर्लक्ष केले. राम कदमांच्या मते विरोधक जाणीवपूर्वक हा विषय वाढवत आहेत. मी चुकीचं काहीच बोललो नाही, तितले वातावरण हलके, फुलके करण्यासाठी आपण बोललो. ५४ सेकंदाची क्लिप दाखवून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही राम कदमांनी म्हटलं. ज्यावेळी राज्यभरातून दबाव वाढला त्यावेळी माफी नाही तर दिलगीरी व्यक्त करून राम कदमांनी पुन्हा स्वत:च्या वक्तव्यावर ठाम असल्याचं दाखवून दिलं. राम कदम कुणी चौराव्यावर बसणारे टोळक्यातलं पोर नव्हे, विधीमंडळात बसणारं एखादं विभागाचं नेतृत्व आहे. हे राम कदमांना माहित नसावं. राम कदमांचं वक्तव्य नक्कीच महिलांचा विनयभंग करणारं आहे. ज्या पद्धतीने राम कदम यांनी मुली पळवण्याची भाषा केली ती भाषा त्यांच्या घरातील महिला वर्गांना तरी अवडली असेल काय? आणि जिच्या उद्रातून राम कदमांनी जन्म घेतला ती माता तर म्हणत असेल 
देखोणी हरखली अंड | पुत्र झाला म्हणे रांड ॥ 
तव तो झाला भांड | चाहाड चोर शिंदळ ॥
जाये तिकडे पिढी लोका | जोडी भांडवल थुंका ॥
थोर झाला चुका | वर का नाही घातली ॥
भूमी कापे त्याचे भारे | कुंभपाकाची शरीरे निष्ठूर उत्तीरे ॥
पाप दृष्टी मळी न चित्त | दुराचारी तो चांडाळं पाप सांगते विटाळं ॥
तुका म्हणे खळ | म्हणूनी निषेध तो ॥

एखाद्या मातेला पुत्र झाल्यानंतर त्याची अंडकुळी पाहिली तर त्या महिलेचा आनंद गगनात मावेत नाही. आपलं पोर भविष्यात मोठं व्हाव, त्याने आई बहिणीची इज्जत करावी. वडीलधार्‍यांची सेवा करावी असं प्रत्येक आईला वाटतं. मात्र तो पुत्र भविष्यात चाढ, चोर, शिंदळ निघाला. जाईल तिकड लोकांना पिढा द्यायला लागला तर लोक त्याच्यावर थुंकतील. अशा पोराचा निषेध आईसुद्धा करेल तीच स्थिती राम कदमांच्या बाबतीत उभ्या महाराष्ट्रांला होतांना दिसत आहे. 
राम कदमांचंं कर्तव्य, कर्म काय? 
हा प्रश्‍न जेंव्हा उपस्थित होतो तेंव्हा राम कदम आपल्या सात्वीकतेचा पाढा वाचून दाखवतात. मी किती सात्वीक आहे, धार्मिक आहे, देशभक्त आहे, आई-वडीलांची सेवा, वडीलधार्‍यांची सेवा करण्यात किती धन्यता मानतो, सण उत्सव किती साजरे करतो हे दाखवण्याचा प्रयत्न वेळोवेळी करतात. भाजपाचे प्रवक्ते म्हणून राम कदमांना आम्ही अनेक वेळा टि.व्ही. पाहतो. त्यावेळी त्यांचा आवीरभाव असतो तो नक्कीच मोहात टाकणारा असतो. परंतू वस्तुस्थिती जर पाहिली तर राम कदम राख्या बांधून घेतात, काही लोकांना देवदर्शनाला पाठवतात आणि एवढी दहीहंडी करतात या व्यतिरीक्त राम कदमांचं कर्तव्य कर्म कुठलं हा सवाल आम्ही आज जाहीरपणे विचारता. हा संताप केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राम कदमांसारखी पिळावलं जन्माला आली म्हणूनच आहे. जर छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये राम कदमांनी हेच वक्तव्य केलं असतं तर शिवछत्रपतींनी राम कदमांचा चौरंगा केल्याशिवाय राहिले नसते. आज घटनेला चार दिवस झाले आहे. मात्र भाजपाकडून राम कदमावर कुठलीही कारवाई झाली नाही. भाजपाच्या नेत्यांनी कुठली प्रतिक्रिया दिली नाही. भाजपाचं बटीक असलेल्या महिला आयोगाने कुठली प्रतिक्रिया दिली नाही. मात्र काल रात्री उशिरा राम कदमांना नोटीस बाजवली ती केवळ महाराष्ट्रातल्या संतापामुळे. आज मिळालेल्या माहितीनुसार राम कदमानी माफी मागितली. राम कदमाचा वक्तव्य माफी लायक नाही. राज्यात आणि देशात भाजपाच्या पदाधिकार्‍यांकडून ज्या पद्धतीने महिलांचा अपमान सातत्याने केला जात आहे त्या सर्व बाबी लक्षात घेतल्या तर भाजप केवळ आणि केवळ जात, पात, धर्म पंताबरोबर असल्या वाच्चाळ वक्तव्यातून देशाचं लक्ष मुख्य विषयातून बाजूला सारतं एवढं मात्र यातून स्पष्ट होतं. परंतू हे जास्त काळ टिकत नसत. भारतीय स्त्रीला देहवार्‍यातली देवी जोपर्यंत सत्ताधारीच माणणार नाही तोपर्यंत स्त्री जातीवरचा अन्याय थांबणार नाही हेही तेवढेच खरे.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review