कॉंग्रेसची यात्रा

प्रखर - मजीद शेख 

कॉंग्रेसला विरोधात बसण्याची तितकी सवय नाही. कायम सत्तेत राहणारा पक्ष म्हणुन कॉंग्रेसची ओळख राहिलेली आहे. सत्तेेचा काळ जास्तीचा मिळाल्याने कॉंग्रेसमध्ये घराणेशाहीचा प्रभाव वाढलेला आहे, आणि आज ही तोच प्रभाव कायम असल्याने नव्या कार्यकर्त्यांना तितकी संधी मिळत नाही. जुन्यांना डावलून नव्यांना पक्ष श्रेष्ठी तितका भाव देत नसल्याने नव्या दमाच्या कार्यकर्त्यांचा ओढा कॉंग्रसपक्षाकडे तितका नाही. बुडू नये म्हणुन हातपाय हालवायचे असेच धोरण राज्यातील कॉंग्रेसचे आहे असं म्हणायला काही हारकत नाही. देश पातळीवर राहूल गांधी सत्ताधार्‍यांचा नेहमी समाचार घेत असतात. राहूल एकटे सोडले तर पक्षात गर्दी खेचणारे नेते नाहीत.  २०१४ साली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात कॉंग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झालेले आहे. २०१९ च्या निवडणुकीची तयारी जोरात सुरु आहे. आपलं अस्तित्व दाखवण्याची जोरदार तयारी सगळयाच पक्षाचे नेते करु लागले. गेल्यावेळी जे झालं ते आता यावेळी होऊ नये याची काळजी कॉंग्रेस पक्षाला पडली. राज्यात पक्षाची बांधणी करण्याचे काम कॉंग्रेसचे काही ठरावीक नेते करत असले तरी तितके प्रभावी वजन कॉंग्रेसचे आज तरी पडत नसल्याचे दिसून येऊ लागले. संघर्ष यात्रेतून कॉंग्रेने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण या यात्रेची जितकी चर्चा व्हायला हवी होती तितकी झाली नाही. कॉंग्रेस विरोधात असल्यासारखं वाटत नाही. विरोधक म्हणुन राज्याचं कॉंग्रेस सत्ताधार्‍यावर तितकं तुटून पडत नाही. गेल्या चार वर्षात कॉंग्रेसने विरोधकांना धारेवर धरलं आणि जेरीस आणलं असं कोणतंही दखलपात्र उदाहारण देता येणार नाही.
स्थानिक निवडणुकीत 
प्रभाव दिसला नाही 

लोकसभा-विधानसभा निवडणुका झाल्यानंतर स्थानिक असलेल्या जिल्हा परिषद, नगर पालिका, महानगर पालिकेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकात कॉंग्रेस पक्षाचा प्रभाव दिसला नाही. प्रत्येक जिल्हयात कॉंग्रेसचे जुने-जाणते प्रस्थापित नेते आहेत. मात्र ह्या नेत्यांना आपला गड राखता आला नाही. कॉंग्रेस पक्षाकडून मतदार दुरावला. मतदार आपल्यापासून का दुर गेला याचं आत्मचितंन पक्षाचे नेते करत नाही. कॉंग्रेस पक्षात आपलं राजकीय अस्तित्व टिकणार नाही म्हणुन अनेकांनी हा पक्ष सोडून इतर पक्षात जाणं पसंद केलं. कॉंग्रेसच्या जुन्या नेत्याकडे आर्थिक ताकद असतांना कार्यकर्ते त्यांना कायम जोडून ठेवता आले नाही. त्यामुळे कॉंग्र्र्रेसचे बुरुज ढासळत गेले. मराठवाड्यात तर नांदेड सोडता इतर जिल्हयातील कॉंग्रेस संपुष्टात आल्यासारखीच झाली. मराठवाड्यात पुर्वी कॉंग्रेसचे चांगल्य प्राबल्य होते, पण आज मराठवाड्यात कॉंग्रेसचा शोध घ्यावा लागतो. एकेकाळी मराठवाडा हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. त्या बालेकिल्लयात आज बोटावर मोजण्या इतकेही लोकप्रतिनिधी निवडून येत नाही म्हणजे याला जबाबदार कोण आहे? मराठवाड्याकडे अनेक वेळा राज्याचं नेतृत्व आलेलं आहे तरी मराठवाडयात कॉंग्रेस पक्ष वाढवण्यास नेत्यांना यश आले नाही. ही पक्षासाठी नामुष्की आहे. 
आपण मागे राहू नये ! 
राष्ट्रवादीने राज्यात हल्लाबोल यात्रा काढून अवघं राज्य ढवळून काढलं. आपण का मागे म्हणुन कॉंग्रेस पक्षाने ऑगस्टपासून राज्यात संघर्ष यात्रा काढली होती. तिचा समारोप मागील आठवड्यात औरंगाबादमध्ये झाला. या संघर्ष यात्रेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मल्लीकार्जुन खरगे यांच्यासह आदींचा सहभाग होता. कॉंग्रेस पक्षाने बडे नेते निर्माण केले पण त्या बड्या नेत्यांचे आपल्याच जिल्हयात आज तितके वजन राहिले नाही. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याच जिल्हयात कॉंग्रेसची वाईट अवस्था आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात ही कॉग्रेस काही वाढली असे नाही. कारण पृथ्वीराज चव्हाण हे पश्‍चिम महाराष्ट्रातील आहेत. दुसरे नेते राधाकृष्ण विखे पाटील हे ही पश्‍चिम महाराष्ट्रातील आहेत. तरी या विभागात कॉंग्रसेने गेल्या चार वर्षात झेप घेतली नाही. राज्यात सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. शेतकर्‍यांचे प्रश्‍न आहेत. गेल्या चार वर्षात शेतकर्‍यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या. पेट्रोल, डिझेलचे रोजच भाव वाढत आहेत. बेरोजगारांच्या हाताला काम नाही. सततचा दुष्काळ, शेती मालाला योग्य भाव मिळत नाही, असे किती तरी प्रश्‍न असतांना कॉंग्रेसला विरोधी पक्ष म्हणुन या प्रश्‍नाबाबत प्रभावी मांडणी करता आली नाही किंवा त्या बाबत आवाज उठवता आला नाही. कॉंग्रेस विरोधात आहे की, सत्तेत हेच कधी-कधी त्यांच्या भुमिकेमुळे कळत नाही. सुस्ती आल्यासारखी अवस्था राज्याच्या कॉंग्रेसची झालेली आहे. राज्यात कॉंग्रेसचे खंडीभर मोठे नेते आहेत. त्यांना अजुनही सुर सापडला नाही. राज्यात नवं नेतृत्वही पुढे आलं नाही त्यामुळे जुन्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचा गाढा सुुरु आहे. गाढा ओढण्यात कितीपत यश येत हे दिसून येईल.  
स्वार्थी भुमिका 
मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला. सर्वत्र पाण्याची टंचाई असतांना मराठवाड्यात पाण्यासाठी संघर्ष होत आहे. मराठवाडयातील परस्थिती पाण्याच्या बाबतीत अंत्यत बिकट असून मराठवाड्याला हक्काचे जायकवाडीचे पाणी मिळावे म्हणुन मागणी करण्यात आली. मात्र मराठवाड्याला पाणी देऊ नये अशी भुमिका नगर, नाशिकचे पुढारी घेतात. विशेष करुन विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच कारखान्याने मराठवाडयाला पाणी देवू नये म्हणुन कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने मराठवाडयाला पाणी सोडण्याचे आदेश दिले. विखे पाटील हे राज्याचे विरोधीपक्ष नेते असतांना त्यांची प्रवृत्ती ही संकुचीत आहे. त्यांनी फक्त आपल्याच जिल्हयाचा विचार केला. त्यामुळे  एक विरोधी पक्ष नेते म्हणुन त्यांना राज्यातील जनतेच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार राहत नाही. संपुर्ण राज्याच्या विकासाबाबत त्यांच्या मनात विचार आला असता तर त्यांनी मराठवाडयाला पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध केला नसता. विखे पाटील यांनी जी भुमिका घेतली ती नक्कीच पटणारी नाही. त्यांची ही भुमिका कॉंग्रेसची आहे की काय असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. विखे जेव्हा ही मराठवाड्यात येतील तेव्हा त्यांना नक्कीच मराठवाड्यतील जनतेच्या रोषाला समोरे जावे लागेल. विखे यांच्या या निर्णयामुळे याचा फटका कॉंग्रेसला बराच बसू शकतो. 
बीडसह अनेक ठिकाणी वाईट अवस्था  
बीड जिल्हयात गेल्या वीस वषार्र्पासून कॉंग्रेसची वाईट अवस्था आहे. जिल्हयाचे कॉंग्रेसचे नेतृत्व राज्याच्या राजकारणात चर्चीत असतांना मा. खा. रजनीताई पाटील यांना आपल्या जिल्हयात पक्षाचा विस्तार करता आला नाही. पक्षश्रेष्ठीही जिल्हयात कॉंग्रेस का वाढत नाही याचा जाब विचार नसल्यामुळेच कॉंग्रेसला बारा महिने मरगळ असते. काही बोटावर मोजण्या इतके जि.प. सदस्य निवडून येतात मात्र ते सदस्य कधीच कॉंग्रेस पक्षाशी इमान राखून नसतात. या ना त्या पक्षाशी ते सलगी करुन सत्तेत वाटा मिळवत असतात. नगर पालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती निवडणुकीत कॉंग्रेसचा भोपळाच असतो. राष्ट्रीय पक्ष जिल्हयात दुर्मिळ झाला. बीडच्या कॉंग्रेसमध्ये फक्त नेते राहिले आहेत. कार्यकर्त्यांचा पत्ता नसतो. कोणत्या ही निवडणुका आल्या की, नेत्यांना कार्यकर्त्यांची आठवण होतेे. ऐरवी कार्यकर्ते जोडले जात नसल्यामुळे बीडची कॉंग्रेस संपली. बीड सारखीच राज्याच्या अनेक जिल्हयाची अवस्था असल्यामुळे राज्यात कॉंग्रेसला घरघर लागू लागली. 
तिढा कायम 
कॉंग्रेस पक्षाने गेल्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवली होती. मताचे विभाजन झाल्याने या पक्षाचे जे व्हायचं ते नुकसान झालं. फक्त दोनच खासदार आणि ४१ आमदार विजयी झाले. जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त आमदारांची संख्या कमी झाली. येत्या निवडणुकीत आपण वेगळं लढलो तर चांगलं यश मिळेलच असं काही सांगता येत नाही. याची जाण पक्षाच्या नेत्यांना असणार? जनतेचा रोष सध्याच्या सत्ताधार्‍यांच्या विरोधात आहे पण त्याचा लाभ कॉंग्रेस पक्षाला उठवता येईना. कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाणार का या बाबत अजुन नक्कीच झालेलं नाही. दोन्ही पक्षात बोलणी सुरु असल्याची नुसतीच चर्चा होत आहे. कॉंग्रेसला आघाडी केल्याशिवाय पर्याय नाही. कॉंग्रेसचा बराच पारंपारीक मतदार इतर पक्षाकडे वळल्याने कॉंग्रेसची चांगलीच गोची झालेली आहे. याचा फटका स्थानिक निवडणुकीत अनेक जिल्हयात या पक्षाला बसलेला आहे. पुन्हा आपल्याला जनाधार कसा मिळवता येईल याचा विचार कॉंग्रेस करत आहे. इतर छोटे-मोठे पक्ष जोडता येतील काय? तशी तडजोड केली जाऊ लागली. एकूणच कॉंग्रेससाठी आगामी निवडणुका तितक्या सोप्या नाहीत. गेल्या चार वर्षात कॉंग्रेस पक्षाने राज्यात पक्ष संघटनेचं काम केलं नाही, त्यामुळे कॉंग्रेसशी नवे कार्यकर्ते जुळले नाही. याला कारणीभूत स्थानिकचे प्रस्थापित नेते आहेत. सत्ताधार्‍यांच्या विरोधात कॉंग्रेसने संघर्ष यात्रा काढली खरी पण या संघर्ष यात्रेतून किती परीवर्तन घडले आणि यातून किती कार्यकर्ते जोडले गेले हे येत्या निवडणुकीतून दिसून येईल. 

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review