गुन्हेगार कोण ?

 

प्रासंगिक - धनंजय गुंदेकर 

     गेल्या दोन वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील आदिवासी पद्धतीने जीवन जगत असलेल्या २२ गावांमधील २५ हजारांपेक्षा अधिक गावकरी अवनी (टी १) या नरभक्षक वाघिणीमुळे दहशतीत जीवन जगत होते. परवा येथीलच सराठी - बोराठी नामक भागामध्ये या नरभक्षक वाघिणीला गोळ्या घालून ठार करण्यात आले. २ वर्षात १३ जणांचा निष्पाप बळी त्या वाघिणीने घेतला होता. या हत्येनंतर परिसरात लाडू वाटून आनंदोत्सव साजरा केला जात असतानाच देशभरातून मात्र प्राणिमित्रांनी या कृत्याचा निषेध नोंदवत हत्येबाबत संशय व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. अवनी आजपर्यंतच्या वन्यप्राण्यांच्या केलेल्या हत्येची द्योतक बनत असून देशभरातून सदर प्रकरणात तेथील वनखात्याची चौकशी करण्यात यावी हि मागणी जोर धरत आहे. सोबतच दुसरा विचारप्रवाह या हत्येस योग्य सांगत निष्पाप बळी घेणाऱ्या वाघिणीचा बळी घेतला हे योग्यच केले असे सांगत आहे. मग यात गुन्हेगार कोण ? 'अवनी' हि नरभक्षक वाघीण का? कि 'मनुष्य' ज्याने आजपर्यंत जगातल्या सर्व नैसर्गिक अधिवासांवर आपले प्रभुत्व स्थापित केले आहे? या प्रश्नाचे उत्तरच अवनीच्या हल्ल्यात बळी गेलेल्या १३ निष्पापांचा गुन्हेगार कोण हे ठरवणार आहे !

  अवनी या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्याची मोहीम डिसेंबर २०१७ ते ३ नोव्हेंबर २०१८ पर्यंत चालू होती. दरम्यानच्या काळात या नरभक्षक वाघिणी १३ निष्पाप लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरली होती. या वाघिणीला ठार न करता जेरबंद करावे या मागणीसाठी प्राणिमित्रांनी बरेच प्रयत्न केले. मात्र उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वच ठिकाणी ती वाघीण नरभक्षकच आहे असा निकाल दिला गेला. या काळात वनविभागाच्या कॅमेऱ्यांनी अवनीसह दोन बछड्यांचा फोटो कैद केला. फोटोमुळे वनविभागाकडून अवणीला जेरबंद करण्याचे अभियान थांबवले गेले. काही दिवसांनी दोन गावकऱ्यांचा बळी गेल्यानंतर २२ सप्टेंबरला हे वाघिणीला जेरबंद करून ठार मारण्याचे अभियान पुन्हा सुरु करण्यात आले. प्राणिमित्रांनी ४ याचिका दाखल करत ठार मारण्याचे आदेश रद्द करण्याचा प्रयत्न केला होता मात्र न्यायालयाने तो फेटाळला होता. ३ नोव्हेंबर रोजी असगर अली याने डोक्यात गोळी घालून अवनीला ठार केले. वनविभागाच्या म्हणण्यानुसार सदर वाघिणीने जीपवर झडप घटल्यामुळेच तिला गोळ्या घालण्यात आल्या. अन इथेच नियमांची पायमल्ली वनखात्याकडून केल्याचा आरोप प्राणिमित्रांकडून करण्यात येत असून या हत्येमागे संशय व्यक्त केला जात आहे. 
   या नरभक्षक वाघिणीच्या कायमस्वरूपी तोडग्याबाबत चाललेल्या संघर्षातून एव्हाना हा विषय राष्ट्रीय सोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला होता. सदर अवनी या वाघिणीचा तोडगा काढणे प्रतिष्ठेचे बनले होते. नियमानुसार बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन ठार करण्यात आले नाही या आरोपासह प्राणिमित्रांनी संपूर्ण वनखात्यासह व्यवस्थेलाच धारेवर धरायला सुरुवात केली आहे. या संघर्षात मात्र गुन्हेगार कोण या प्रश्नासह कित्येक बाबी उजेडात येण्यास सुरुवात होणार हे मात्र नक्की आहे. देशभरात सर्वस्तरात या वाघिणीच्या हत्येबाबत चर्चिले जात असतानाच अवनी नरभक्षक का झाली याकडेही सुजाणांचे लक्ष वेधले आहे. एका नरभक्षक वाघिणीच्या हत्येचा निषेध करणारांना १३ निष्पापांचा बळी दिसत नाही का हा प्रश्न काहींकडून उपस्थित केला जात आहे. या प्रश्नाच्या प्रत्युत्तरादाखल प्राणिमित्रांकडून मनुष्याने निसर्गाच्या केलेल्या हानीसह वाघ वाचवा या योजनेच्या अपयशाची गणिते मांडत बिघडत चाललेल्या नैसर्गिक असमतोलाला अन ऱ्हास पावत चाललेल्या वनजातींच्या आकडेवारीला पुढे केले जात आहे. 
  अवनी नरभक्षक वाघीण ऱ्हास पावणाऱ्या प्राण्यांच्या घटनेचे प्रतीक प्राणिमित्रांकडून केले जात आहे. खरेतर निसर्गाच्या समतोलाचा विचार केल्यास ते योग्यही आहे. आपणच आजसर्व जगभरातील नैसर्गिक अधिवास संपवून टाकलेला आहे. प्राणी नरभक्षक बनतो कधी याचा आपल्याला अभ्यासही नाही अन त्याचे सोयरंसुतकही नाही. जंगल जर असते तर हिंश्र पशूंना तेथेच शिकार उपलब्ध झाली असती. वन्यप्राणी रहिवाशी भागांमध्ये कशाला घुसखोरी करायला आले असते? याचवेळी मात्र आपण १३ जणांच्या निष्पाप बळीस गुन्हेगार ठरवायचे कुणाला याच्या उत्तरापर्यंत पोहोचतोत. नरभक्षक वाघिणीच्या दहशतीत जगणे सोपे अजिबात नाहीच. आपल्याच घरातील एखादा तिच्याकडून मारला गेला असता तर आपल्याला नक्कीच सदर वाघिणीला ठार मारावे अशी भावना तयारही होईल. नव्हे तशी भावना व्यक्त करत न्यायालयाने तसाच निकालही दिला. परंतु आपण येणाऱ्या काळात किती नरभक्षक प्राण्यांना ठार मारणार आहोत याचाही विचार व्हायालाच हवा. अवनीच्या हत्येनंतर ते दोन्ही बछडे लवकरात लवकर सापडायला हवेत अन्यथा ते देखील अवनीसारखेच नरभक्षक होतील. एकतर त्यांना आत्ताच शिकार करता येत नाही त्यामुळे भुकेनी ते नरभक्षक होण्याची शक्यता अधिक आहे. 
 एकूण क्षेत्रफळाच्या ३३ टक्के नैसर्गिक अधिवास पोषक असताना आपल्याकडे वनांचे प्रमाण किती आहे? ते अगदी नगण्य असून प्राण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. या जगात प्रत्येकाचेच अस्तित्व एकमेकांवर अवलूंबून असताना आपण दुसऱ्या प्राण्यांना का संपवत आहोत याचाही विचार करायला पाहिजे ना? आज अवनी नरभक्षक आहे येत्या काळात शिकारच भेटली नाही तर देशभरात अस्तित्वात असलेले सर्वच मांसाहार पशु नरभक्षक होतील. सर्वच प्रजात नष्ट करायची का मग? शासन, प्रशासन अन जनता या सर्वांनीच आता निसर्गाच्या समतोलाबाबत विचार करणे गरजेचे आहे. अवनीसारख्या वाघिणी नरभक्षक होणारच नाहीत याची काळजी घेणे आवश्यक असून नैसर्गिक अधिवासातच त्यांना शिकार मिळेल अशी व्यवस्था उभारली तर हत्येचे अन नरभक्षणाचे प्रसंगच उद्भवणार नाहीत. आज या घटनेत वनखाते गुन्हेगार कोण? नरभक्षक अवनी हि वाघीण जबाबदार कि  ज्यांनी सर्वांच्याच अधिवासांवर अधिराज्य करून पशूप्राण्यांना निर्वासित केले आहे ते आपण मनुष्य यावर सारासार विचार होणं आत्यंतिक गरजेचे आहे.

अधिक माहिती: Beed

Best Reader's Review