फायनलसाठी दंड थोपटले!

२०१९ ची लोकसभा महत्वाची आहे. मोदी यांचा कार्यकाळ तितका चांगला राहिला नाही, त्यामुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता आहे. गत लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेनं भाजपाला इतकं बहुमत दिलं की, त्या बहुमताच्या जोरावर भाजपावाले नको ते उद्योग करुन बसले त्यामुळे भाजपा टिकेचा धनी झाला आणि आता निवडणुकीच्या तोंडावर जुळवा जुळवीचे गणीते मांडण्याचा उद्योग भाजपाचे बडे नेते करु लागले. महाराष्ट्र तशी कॉंग्रेसची भुमी राहिलेली आहे. शरद पवार कॉंग्रेस मधून फुटल्यानंतरही जनतेने कॉंग्रेसला चांगली साथ दिलेली आहे. महाराष्ट्रात आज पर्यंत कॉंग्रेसच्या खासदारांचा आकडा कधीच एक अंकी आला नाही तो २०१४ च्या निवडणुकीत आला. आता पुन्हा कॉंग्रेस जोमाने उठली आणि निवडणुकीच्या कामाला लागली. कॉंग्रेसला आव्हाने तितकीच आहेत. राष्ट्रवादी आणि इतर घटक पक्षांना सोबत घेतले तरच कॉंग्रेसचा निभाव लागू शकतो नसता गत लोकसभा निवडणुकी सारखी अवस्था कॉंग्रेसची झाली तर नवल वाटायला नको. राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचीत बहूजन आघाडीचे नेते लोकसभेच्या निवडणुकीची जोमाने तयारी करीत आहेत. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा असल्याने महाराष्ट्राला खुप महत्व आहे. भाजपाला गत निवडणुकीत महाराष्ट्रातून २३ जागा मिळाल्या होत्या. येणार्‍या निवडणुकीत नेमक्या किती जागा मिळतात याची चिंता भाजपाला लागून आहे. 
शिवसेनेची तयारी 
शिवसेना भाजपाची आघाडी होईल की नाही असे अजुन तरी नक्की सांगता येत नाही. काल पर्यंत दोन्ही पक्षाचा ‘बाण’ विरोधातच होता. युती झाली नाही तर पटक देगे असं वक्तव्य नुकतचं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लातूर जिल्हयात केलं होतं. त्याचं हे वक्तव्य शिवसेनेवर दबाव आणणारचं होतं, पण शिवसेना अशा वक्तव्यामुळे दबावात येईल असं तरी वाटत नाही. मुका घेतला तरी आता युती होणार नाही असं वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केले होते. शिवसेना आपल्या वक्तव्याला कितपत महत्वं देते हे दिसूनच येईल, पण युती होऊ अथवा न होऊ शिवसेना निवडणुकीच्या कामाला लागलेली आहे. पक्षाचे नेते राज्यात दौरे करुन सभा घेत आहेत. शिवसेनेला भाजपाने पाच वर्षाच्या काळात आपला घटक पक्ष या नात्याने तितकी केंद्रात व राज्यात किंमत दिली नाही. मुळात शिवसेना हा भाजपाचा जुना सहकारी आहे. याचा विसर भाजपाच्या नव्या पदाधिकार्‍यांना पडलेला आहे हे मान्यच करावे लागेल. जेव्हा भाजपाच्या पाठीशी जनमत नव्हतं तेव्हा शिवसेनेने भाजपाला सहकार्य केलेले आहे. पुर्वीचे भाजपाचे नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे, सुषमा स्वराज याचं आणि शिवसेेनेचं नातं घनिष्ठ होतं. विशेष करुन बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल या नेत्यात आदर होता. आता या प्रमुख नेत्यापैकी वाजपेयी, महाजन, मुंडे यांचे निधन झालेले आहे. आडवाणी, सुषमा स्वराज पक्षात असले तरी पक्षात त्यांना तितके स्थान राहिले नाही. त्यामुळे मोदी, शहा हेच पक्षाचे ‘होल’ आणि ‘सोल’ असल्याने हे दोन्ही नेते शिवसेनेला तितकं महत्व देत नाही. त्यांच्याशी जुळवून घेत नाही. म्हणुन शिवसेनेने भाजपाची नाक कापण्याची एकही संधी सोडलेली नाही. 
राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ 
शरद पवार ’पॉवरबाज‘नेते असले तरी आज पर्यंतच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला खासदारांचा दोन अंकी आकडा गाठला आला नाही. विधान सभा निवडणुकीत पंधरा वर्ष यश आलं, पंधरा वर्ष राष्ट्रवादी राज्याच्या सत्तेत होती. लोकसभा निवडणुका जिंकतांना राष्ट्रवादीची कस लागलेली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीची त्यांच्या पक्षाने जोमाने तयारी सुरु केली. कुठल्याही परस्थिती दोन अंकी आकडा गाठायचा हे ध्येय पवारांनी ठेवलेले आहे. गेल्या पाच वर्षात राज्यात राष्ट्रवादी पक्षाने सरकारला जेरीस आणुन विविध प्र्रश्‍नांवर आंदोलन केलेले आहे. कॉंग्रेस पेक्षा राष्ट्रवादीने आंदोलनात जास्तीचा भाग घेतला आहे. परिवर्तन यात्रा असेल किंवा हल्लाबोल आंदोलन असेल याच्या माध्यमातून राष्ट्रवादीने राज्यभर ‘जागर‘ घातलेला आहे. गत लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या होत्या. कॉंग्र्र्रेसपेक्षा दोन जास्तीच्या जागा मिळाल्या. नुकत्याच झालेल्या पोट निवडणुकीत भंडारा, गोदिंया ही लोकसभेची जागा राष्ट्रवादीने ताब्यात घेतल्याने राष्ट्रवादीचे सध्या राज्यात ५ खासदार आहेत. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी आपल्या पक्षातील बड्या नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकते. ही निवडणुक पवार यांच्यासाठी खुप महत्वाची आहे. जास्तीच्या जागा आल्या तरच राष्ट्रवादीचं दिल्लीत वजन राहणार आहे. 
छोट्या पक्षाचं काय? 
राज्यात छोटया पक्षांची संख्या मोठी आहे. छोट्या पक्षांना लोकसभा निवडणुकीत तितकं यश येत नाही हे आज पर्यंत दिसून आलेलं आहे. रामदास आठवले हे भाजपाच्या सोबत आहे. सध्या ते केंद्रात राज्यमंत्री असल्याने त्यांना कुठला मतदार संघ भाजपा सोडेल हे अजुन तरी निश्‍चीत झालं नाही. महादेव जाणकार हे राज्यात मंत्री आहेत. त्यांच्या पक्षाला भाजपा किती जागा देतेयं हे जागा वाटपाच्या वेळीच समोर येईल. विनायक मेटे हे ही भाजपा सोबत आहे पण ते पक्षावर नाराज असल्याचे वेळोवेळी दिसून आलेलं आहे. लोकसभेत मेटेंना काय स्थान मिळेल हे निवडणुकीत दिसेल. मेटे स्वबळावर काही जागा लढवतात की भाजपासोबत तोडजोड करतात हे येत्या काही दिवसात दिसेल. राजू शेट्टी भाजपा सोबत होते पण त्यांचं आणि भाजपाचं बिनसल्याने ते आता भाजपा सोबत नाही. त्यांना कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीत स्थान मिळू शकतं. शेकाप हा पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत आज पर्यंत आघाडीत राहिलेला आहे. त्यामुळे शेकापाला त्याच्या बालेकिल्यात आघाडी जागा सोडू शकते. कोणता ही छोटा पक्ष असो त्या पक्षाला एक किंवा दोन जागा त्या-त्या प्रमुख पक्षाच्या कोटातून मिळू शकते असं दिसून येत आहे. 
मनसेचं इंजिन कुणीकडे? 
राज ठाकरे हे प्रभावी व्यक्तीमत्व असले तरी त्या व्यक्तीमत्वानुसार त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत आज पर्यंत यश आलेलं नाही. त्यांनी आतापर्यतच्या निवडणुका स्वबळावरच लढवलेल्या आहेत. येत्या निवडणुकीत त्यांची काय भुमिका राहिल हे अद्याप समोर आलेलं नाही. ते स्वबळावर निवडणुका लढवणार का कुठल्या पक्षासोबत आघाडी करणार हे ही स्पष्ट झालेलं नाही. राज आघाडी सोबत जाणार असल्याच्या चर्चा उठवण्यात आल्या होत्या. विशेष करुन राष्ट्रवादी बरोबर पण त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. राज ठाकरे यांनी भाजपाला झोडपण्याची एकही संधी सोडलेली नाही. ठाकरे यांचा विरोधी बाणा लोकसभेत किती प्रमाणात यशस्वी होईल याकडे लक्ष लागून आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीची जोमाने तयारी सुरु केलेली आहे. 
वंचीत आघाडीची धास्ती? 
राज्यात तिसरा पर्याय म्हणुन ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांची वंचीत बहुजन आघाडी उभी राहत आहे. आंबेडकर यांनी आपल्या वंचीत आघाडीत एमआयएमसह अन्य पक्षांना स्थान दिलेले आहे. गेल्या दोन महिन्यापासून राज्यात वंचीत आघाडीने सभांचा धडाका सुरु केलेला आहे. त्यांच्या सभांना गर्दी पाहता कॉंग्रेस,राष्ट्रवादीच्या नेत्यांना धडकी भरु लागली. आंबेडकर यांनी राज्यातील ४८ जागा लढवल्या तर याचा बराच परिणाम राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्षाला सहन करावा लागणार आहे हे नाकारुन चालणार नाही. वंचीत आघाडी कॉंग्रेस सोबत जाणार का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. कॉंग्रेस सोबत जाण्या बाबत दोन्ही पक्षातल्या नेत्यात चर्चा झाल्या मात्र अद्याप पर्यंत ठोस काही निर्णय झाला नाही. वंचीत आघाडीने कॉंग्रेसकडे १२ जागांची मागणी केलेली आहे. १२ जागा दिल्या तरच कॉंग्रेस सोबत आघाडी करु असे वारंवारं ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेले आहे. कॉंग्रेस यावर काय भुमिका घेतेय याकडे लक्ष लागून आहे. काही ठिकाणी वंचीत बहुजन आघाडीने आपले उमेदवारही जाहीर केलेले आहे. कॉंग्रेसने लवकर भुमिका जाहीर केली नाही तर वंचीत बहुजन आघाडी सर्व जागावर निवडणुका लढवू शकते. तशी तयारी वंचीत आघाडीने केलेली आहे. नुकसान टाळायचं की, होवू द्यायचं याचा विचार कॉंग्रेस पक्ष करत असून यावर काय तोडगा काढता येईल याच्या विचारात सध्यातरी कॉग्रेस पक्ष आहे. राष्ट्रवादीपेक्षा कॉग्रंेस पक्षाला वंचीत आघाडीचं टेन्शन आलं आहे. 
शक्ती प्रदर्शन 
कॉंग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी होण्यातच जमा आहे. कोणाला किती जागा द्यायच्या हे अजुन पुर्णंता ठरलेले नाही. आघाडी करण्यात आपलं हित आहे हे दोन्ही पक्षांनी ओळखलेले आहे त्यामुळे या दोन्ही पक्षांनी एक-एक पाऊल मागे घेत आघाडीचं जुगाड लावलं तर दुसरीकडे भाजपा-शिवसेनेतून विस्तव जात नाही. भाजपा हा अतिउत्साही पक्ष म्हणुन ओळखला जातो. तसे लक्षणे या पक्षाच्या नेत्यांचे असतात. ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत बाजी मारल्यामुळे भाजपाचे अनेक नेते हवेतच असतात. ते जमिनीवर येण्याचं नावच घेत नाहीत. गत लोकसभेच्या विजयाचं भुत या पक्षाच्या डोक्यातून आजुही गेलेलं नाही. गेल्या लोकसभेत आम्हाला इतकी लीड मिळाली होती. त्यामुळे आमचा विजय यावेळीही पक्काच आहे असं सध्याचे भाजपाचे लोकसभेचे खासदार बोलत असतात. गत वेळी मोदी लाट होती. आज तितकी मोदींची लाट राहिली नाही हे विद्यमान खासदारांना कुणी सांगावं? एका सर्व्हे मध्ये भाजपाच्या राज्यातील विद्यमान अकरा खासदारांना धोका असल्याचे समोर आलेलं आहे. त्यामुळे भाजपासाठी राज्यात काटेरी आव्हान आहे हे नाकारुन चालणार नाही. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आकाशाला ठिगळं लावण्याचं काम केलं. राज्यात ४५ जागा भाजपाच्या निवडून येईल असा दावा त्यांनी केल्याने त्याचं हे वक्तव्य नक्कीच कसलेल्या राजनीती करणाराचं नाही. त्यांचं वक्तव्य हासू आणणारं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर बारामतीची जागा जिंकण्याची भाषा करतात म्हणजे हा विनोदच आहे. भाजपा, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचीत बहुजन आघाडी या प्रमुख पक्षासह छोटया पक्षांच्या नेत्यांनी निवडणुकीसाठी हाबूक ठोकलेले आहे. २०१९ च्या लोकसभेच्या फायनल निवडणुकीत राज्यातील जनता कोणाच्या माथी किती यश मिळून देतयं याकडे लागून आहे. आज तरी राज्यातील नेते एकमेकांना बेडकुळ्या दाखवत दंड थोपटत आहेत. कोण किती पाण्यात हे निवडणुकी नंतरच दिसून येईल!

 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review