आष्टीत भाजपाला आणखी एक धक्का बसणार 

eReporter Web Team

कर्जतच्या राष्ट्रवादी चिंतन बैठकीत भाजपा जि.प. सदस्याची हजेरी
आष्टी (रिपोर्टर):- आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे लढवय्ये बाळासाहेब आजबे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपाला या मतदारसंघात गळती लागली असून गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये झालेल्या चिंतन शिबिरात या मतदारसंघातील भाजपाचा एक मातब्बर जि.प. सदस्य उपस्थित असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे हा जि.प. सदस्य दीड ते दोन दिवस येथे तळ ठोकून होता. त्यामुळे एका पाठोपाठ एक असे जबरदस्त धक्के भाजपाला या मतदारसंघात सोसावे लागणार आहे. 
जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेल्या खबळींगनंतर आष्टी विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला. राष्ट्रवादीमधून माजी मंत्री सुरेश धसांना बेदखल करण्यात आल्यानंतर या मतदारसंघाचे भाजपाचे लढवय्ये बाळासाहेब आजबे यांचा नुकताच राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश झाला. या प्रवेशाच्या कार्यक्रमाला मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती पहाता राष्ट्रवादी रसातळाला जाईल अशी वल्गना करणार्‍यांना जबरदस्त चपराक मिळाली असतानाच रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जे चिंतन शिबिर झाले त्या शिबिरात या मतदारसंघातील एका जि.प. सदस्याची उपस्थिती खासकरून दिसून आली. सदरचा जि.प. सदस्य हा भाजपाचा असल्याचे उघड झाल्यानंतर आष्टीमध्ये भाजपाला आणखी एक खिंडार पडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सदरचा सदस्य हा मातब्बर असून तो राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे. विशेष म्हणजे भाजपाचे अन्य काही स्थानिक स्वराज्य संस्थाचे सदस्यही राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येते. 
 


अधिक माहिती: ashti

Related Posts you may like