बीडमध्ये शिक्षक झाले डिलिव्हरी बॉय

eReporter Web Team


शिक्षण क्षेत्रात संताप
बीड (रिपोर्टर) राज्यातील शिक्षकांना दारुच्या दुकानांवर होणारी गर्दी नियंत्रित करण्याचे काम दिल्यानंतर, आता 51 शिक्षकांना ’डिलिव्हरी बॉय’ची कामे करण्याचे आदेश दिले आहेत. बीड जिल्ह्यातील पाटोदाच्या तहसीलदारांनी शिक्षकांना नगरपंचायतीच्या हद्दीत राहणार्‍या नागरिकांना किराणा माल; तसेच जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याचे काम दिले आहे. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण असून, शिक्षण क्षेत्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यात करोनाने थैमान घातले असून, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार सरकारी कर्मचार्‍यांच्या सेवा करोनाच्या विरोधात लढण्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यानुसार पाटोद्याच्या तहसीलदारांनी साधारण 51 शिक्षकांची ड्युटी या पाटोदा नगरपंचायत परिसरातील नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार अन्नधान्य, भाजीपाला, किरणामालसोबतच जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यासाठी शुक्रवारपासून लावण्यात आली आहे. या कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जी केल्यास दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्याचे सत्र सुरुच असल्याचे समोर आले आहे. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण झाला आहे. राज्य सरकारच्या या आदेशावर शिक्षण क्षेत्रातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like