कृषी सेवा सहकारी सोसायट्याकडून शेतकर्‍यांची आर्थिक लुबाडणूक

eReporter Web Team


जिल्हाधिकार्‍यांनी उपनिबंधक यांच्यामार्फत कार्यवाही करावी

बीड (रिपोर्टर):- खरीपाच्या हंगामात राष्ट्रीयकृत बँकाकडून पीक कर्जाचे
वाटप सुरू आहे. मात्र सर्वच बँकांनी सोसायट्याचे बेबाकी प्रमाणपत्र
आणण्याची सक्ती शेतकर्‍यांना केली आहे. गेल्या दहा वर्षापासून जिल्हा
मध्यवर्ती बँक आणि त्यांच्या अधिनिस्त असलेल्या कृषी सेवा सहकारी
सोसायट्या यांचे आर्थिक काम काज बंद असतांनाही या सोसायट्या शेतकर्‍यांना
बेबाकी देण्यासाठी चक्क सभासद होण्याच्या अट घालून प्रति शेतकरी
यांच्याकडून 300 ते 500 रूपये वसुल करतात. जो शेतकरी सोसायटीचा सभासद
नाही अशा शेतकर्‍यांनी त्यांच्याकडून कर्ज घेण्याचा कोणताच प्रश्‍न
उद्भवत नसतांना या सोसायट्या मात्र आपल्या खोळंबलेल्या कर्मचार्‍यांचा
पगार काढण्यासाठी ही नवीन शक्कल लढवून प्रत्येक येणार्‍या शेतकर्‍याला
सभासद होण्याचे बंधन घालून त्यांच्याकडून पैसे वसुल करतात. हा गंभीर
प्रकार जिल्हा उपनिबंधक यांना माहित असतांनाही ते मात्र या सोसायटीच्या
कामकाजावर दुर्लक्ष करतात.
महाराष्ट्र ग्रामीण बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर राष्ट्रीयकृत बँका
शेतकर्‍यांना पीक कर्ज देत असतांना 7/12, 8-अ, बाँड या कागदपत्रासोबतच
त्या भागातील कृषी सेवा सहकारी सोसायटी यांचे बेबाकी प्रमाणपत्राची मागणी
करतात. अनेक शेतकरी हे सेवा सहकारी सोसायटीकडून कर्ज न घेतल्यामुळे ते
सभासदही नाहीत. त्यामुळे जो शेतकरी सेवा सहकारी सोसायटीचा सभासद नाही अशा
शेतकर्‍याला कोणतेही शुल्क न घेता बेबाकी प्रमाणपत्र दिले पाहिजे असा
सरकारी नियम असतांना सुद्धा सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन आणि कर्मचारी
या शेतकर्‍याला 300 ते 500 रूपये मोजून सभासद होणे भाग पाडतात. पाचशे
रूपये दिल्यानंतरच या सभासद केलेल्या शेतकर्‍याला बेबाकी प्रमाणपत्र दिले
जाते. याबाबत संबंधित सेवा सहकारी सोसायटी यांच्याकडे विचारणा केली असता
पंधरा ते सोळा महिन्यापासून कर्मचार्‍यांचा पगार नाही. जिल्हा मध्यवर्ती
बँक या कर्मचार्‍यांच्या पगार करत नाहीत. त्यामुळे आमचा पगार वसुल व्हावा
म्हणून आम्ही बेबाकी मागायला येणार्‍या शेतकर्‍याला सभासद करून बेबाकी
प्रमाणपत्र देतोत असे सांगितले. तर दुसरीकडे जिल्हा उपनिबंधक हे
सोसायट्याचे सभासद करून घेणे आणि त्याच्याकडून पैसे घेणे हे बेकायदेशीर
असल्याचे सांगतात. मात्र अशा सोसायट्यावर ते कार्यवाही करत नाहीत.
त्यामुळे शेतकर्‍याची जी होणारी आर्थिक लुट आहे याबाबीकडे
जिल्हाधिकार्‍याने गांभीर्याने लक्ष देवून अशा सोसायट्यावर कार्यवाही
करावी अशी मागणी सर्व शेतकरी वर्गातून होत आहे.

 


अधिक माहिती: beed

Related Posts you may like