समाजकल्याणच्या योजनेत भ्रष्टाचार सहायक आयुक्त मडावींची चौकशी करण्यासाठी समिती गठीत

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर)- समाजकल्याण योजनेत भ्रष्टाचार करून नियमबाह्य कामे केल्या प्रकरणी सहायक आयुक्त सचिन मडावी यांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मडावी यांच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली. ७ ऑगस्ट रोजी मडावी यांची चौकशी होणार आहे. 
   समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन मडावी यांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत योजनेत नियमबाह्य कामे करत अधिकार नसताना वर्ग ३ व ४ च्या कर्मचार्‍यांच्या नियमबाह्य बदल्या व प्रतिनियुक्त्या केल्या. स्वयंसहायक बचत गटास मिनी ट्रॅक्टर योजनेमध्ये बोगस प्रस्ताव दाखल केल्याचेही समोर आले आहे. दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेत स्वत: दर वाढवून कमिशन घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन किरकोळ दुरुस्ती प्रकरणी तक्रार केलेली असताना ४६ लाख रुपये वर्ग करण्यात आले. मडावीसह कार्यालयातील इतर कर्मचार्‍यांनी भ्रष्ट कामे केल्याने याबाबतची तक्रार बहुजन वंचित आघाडीचे प्रतिक ऊर्फ अजय सरवदे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग मुंबई मंत्रालय यांच्याकडे केली होती. याची दखल घेत वरिष्ठांनी मडावींसह इतर कर्मचार्‍यांवर भ्रष्ट कामे केल्याचा आरोप ठेवत त्या कामाची चौकशी करावी, यासाठी शपथपत्र सादर केले होते. सदरील शपथपत्राची अतिरिक्त आयुक्त, आयुक्तालय पुणे यांनी दखल घेत तात्काळ चौकशी समिती गठीत करण्याचे प्रादेशिक समाजकल्याण विभाग औरंगाबाद यांना आदेशीत केले. त्यानुसार प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण विभाग औरंगाबाद यांनी चौकशी समिती गठीत केली असून दि. ७ ऑगस्ट २०२० रोजी शपथपत्रामध्ये दाखल केलेल्या मुद्यानुसार चौकशी होणार आहे. 


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like