"कागदपत्रांसाठी शेतकर्‍यांची अडवणूक करू नका, तात्काळ पीक कर्ज द्या"

eReporter Web Team

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनेे तहसीलसमोर आंदोलन
बीड,केज, अंबाजोगाई (रिपोर्टर):- कागदपत्राचे कारण दाखवत अनेक शेतकर्‍यांना बँकांनी पीक कर्जापासून दुर ठेवले आहे. कागदपत्राचे कारण दाखवून त्यांची आर्थिक व मानसिक पिळवणुक केली जात आहे. कोरोनाच्या महामारीत कागदपत्र गोळा करतांना शेतकर्‍यांची दमछाक होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना कुठल्याही कागदपत्रासाठी अडवणूक न करता तात्काळ पीक कर्ज द्यावे या मागणीसाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बीड तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. दरम्यान केज आणि अंबाजोगाई येथे ही तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येत आहे. 
तहसीलदार यांनी दिलेल्या निवेदनात शेतकर्‍यांच्या विविध मागण्या मान्य करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये शेतकर्‍यांची कुठलीही अडवणूक न करता तात्काळ पीक कर्ज वाटप करावे. मागील वर्ष ज्या शेतकर्‍यांना कर्जमाफी होवूनही कर्जमाफी मिळाली नाही अशा शेतकर्‍यांना तात्काळ कर्जमाफी देवून दुसरे कर्ज वाटप करावे, बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सोसायटी मार्फत शेतकर्‍यांना कर्ज तात्काळ विनाअट वाटप करावे, दुबार पेरणीची वेळ आलेल्या व फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांना बि-बियाणे कंपनीकडून शेतकर्‍यांना पन्नास हजार रूपये हेक्टरीी भरपाई देण्यात यावी. वयोवृद्ध शेतकर्‍यांना देखिल पीक कर्ज वाटप करावे, वीज वितरण कंपनी लॉकडाऊन काळातील चार महिन्याचे वीज बील माफ करून वाढीव वीज बील दुरूस्त करून द्यावे यासह विविध मागण्यासाठी आज बीड, केज, अंबाजोगाई तहसील कार्यालयासमोर भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने एक दिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी भाई संग्राम तुपे, राम  नवले, पंडित तुपे, भीमराव कुटे, दत्ता प्रबाळे, गवते प्रविण यांच्यासह आदींची उपस्थिती होती. अंबाजोगाई येथे भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले तर केज येथेही आंदोलन करण्यात आले. या वेळी सौरभ संगेवार, शेख वजीर, किशोर ओव्हाळ, राज करडे, उमेश लाड, करण तपसे, आरेफ काझी, अशोक रोडे, मंगेश देशमुख, जी.बी.देशमुख, विशाल मुळे यांची उपस्थिती होती. 


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like