सत्य लपवण्यासाठी बिहार आणि  महाराष्ट्रातील नेत्यांची हातमिळवणी -राऊत

eReporter Web Team

मुंबई (रिपोर्टर)- अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाच्या तळापर्यंत मुंबई पोलीस जाऊ नये, या प्रकरणाची पाळंमुळं खणून मुंबई पोलिसांनी सत्य बाहेर काढू नये म्हणून महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे नेते आणि बिहारमधील नेत्यांची हातमिळवणी झाली आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा आरोप केला आहे. मुंबई पोलीस हे जगातली सर्वोत्त पोलीस आहेत. मुंबई पोलिसांनी अनेक गंभीर प्रकरणे बाहेर काढली आहेत. अनेक प्रकरणात मुंबई पोलिसांनीच तपास करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानेही दिले आहेत. त्यामुळे सुशांतसिंह प्रकरणात ज्यांचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही त्यांच्या हेतूवरच शंका आहे. त्यांना काही तरी लपवायचे आहे. पोलिसांनी सत्यापर्यंत जाऊ नये, सत्य शोधू नये यासाठी त्यांचा खटाटोप सुरू आहे. सुशांतसिंह प्रकरणाचं सत्य दडवण्यासाठी बिहारचे नेते आणि महाराष्ट्रातील विरोधकांची हातमिळवणी झाली आहे. हा महाराष्ट्रविरोधातील कट आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
हे महाराष्ट्राविरोधातील षडयंत्रं
सुशांतसिंह प्रकरणाचा राजकीय फायद्यातोट्यासाठी वापर केला जात आहे. हे घृणास्पद आहे. पोलिसांना आधी तपास पूर्ण करू द्यावा. त्यानंतर त्यावर टीका करावी. तपास करण्याच्या आधीच बोंबा मारू नये, असं सांगतानाच सुशांत प्रकरणात ४० दिवसानंतर एफआयआर दाखल केला जातो. ४० दिवसानंतर त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसतो. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार या प्रकरणावर प्रतिक्रिया देतात. बिहारच्या विधानसभेत ठराव करून हे प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतलं जातं. केंद्राकडे सीबीआयचा तगादा लावला जातो. महाराष्ट्राला विश्वासात न घेता सीबीआय चौकशीचं नोटिफिकेशन्स काढलं जातं. ही क्रोनॉलॉजी म्हणजे घटनाक्रम एकदा समजून घ्या. सर्व गोष्टी कळून येतील. या सर्व प्रकरणाची कुणीतरी बसून पटकथा लिहिली आहे. त्यानुसार घटना घडत आहेत. काही लोक पडद्यामागून हालचाली करत आहेत. सत्यबाहेर येऊ नये यासाठीचं हे षडयंत्र आहे. महाराष्ट्राविरोधातील हे षडयंत्र आहे, असं राऊत म्हणाले. महाराष्ट्राला घेरलं जात आहे. सत्यबाहेर येऊ नये आणि तपासात अडथळा निर्माण व्हावा यासाठी हा प्रयत्न आहे. पण शिवसेनेला कोणी घेरू शकत नाही. असे चक्रव्यूह तोडून बाहेर येण्याची शिवसेनेला सवय आहे. हा अर्जुनाचा रथ आहे. इथे कृष्ण आणि अर्जुन एकत्र आहे. तुम्ही कितीही अडकवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हीच अडकाल, असा इशाराही त्यांनी दिला.


अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Related Posts you may like