मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचा हेतू दुषीत खा.उदयनराजे भोसले यांनीच पुढाकार घ्यावा

eReporter Web Team

बीड (रिपोर्टर):
महाराष्ट्राच्या सत्तेवर सरमजामी वृत्तीचे सरकार आले आहे. शिवसेना हा पक्ष मुळात आरक्षणविरोधी आहे तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष प्रस्थापित असल्यामुळे त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत काहीच देणे घेणे नाही. उच्च न्यायालयात सुनावणी असतांनासुद्धा सरकारच्या वतीने या संदर्भात नियूक्त केलेले मंत्री अशोक चव्हाण यांना याबाबीचा कोणताही गंध नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात घटनापिठ स्थापन करण्याचा निर्णय सरकारच्या वेळकाढूपणामुळे झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज खा.उदयनराजे भोसले यांनीच मराठा समाजाच्या सर्व संघटनांना एकत्र घेवून पुढाकार घ्यावा असे शिवसंग्राम पक्षाचे आ.विनायक मेटे यांनी प्रतिपादन केले.
आ.विनायक मेटे यांनी आज बीड येथे शिवसंग्राम भवन येथे मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये मेटे म्हणाले की, सध्या सत्तेवर असलेल्या तीन पक्षाच्या सरकारमधील शिवसेना हा पक्ष सुरूवातीपासूनच आरक्षणाच्या विरोधात आहे तर राष्ट्रवादी अन् कॉंग्रेस हे पक्ष प्रस्थापित आहेत त्यांना मराठा समाजातील उच्च शिक्षित, शिक्षित तरुणांचे प्रश्‍नच माहित नाहीत. त्यामुळे त्यांना या आरक्षणाचे काही देणे घेणे नाही. सुप्रिम कोर्टामध्ये पंजाब सरकार विरूद्ध विरेंद्र सिंह, देशातील इतर तीन राज्यातील वेगवेगळ्या जाती समूहाच्या आरक्षणासंदर्भात तेथील राज्य सरकारने मागासवर्गीय जात समूहाला जे आरक्षण दिले आहे त्या संदर्भातील वादही सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे मात्र असे असतांना सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणासंदर्भातील याचिका दाखल करून घेतल्या असल्या तरी देशातील इतर तीन चार राज्यात तेथील राज्य सरकारने जे आरक्षण दिले आहे त्याला मात्र स्थगिती दिलेली नाही पण देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला जे आरक्षण दिले होते. त्या आरक्षणाच्या आधारे शिक्षणामध्ये आणि नौकर्‍यामध्ये जी मुले भरती झालेली आहेत आणि जे भरती प्रक्रियेत आहेत त्याला स्थगिती दिलेली आहे, महाराष्ट्रातील मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जे आरक्षण दिलेले आहे त्याला योग्य रितीने विद्यमान सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडणी न केल्यामुळे किंवा हे जे आरक्षण दिले आहे, गायकवाड कमिशनच्या आधारे, त्या गायकवाड कमिशनचाही अभ्यास विद्यमान सरकारने न केल्यामुळे त्यांना मराठा समाजाचे जे आरक्षण दिलेले आहे ते योग्य प्रकारे बाजू न मांडता आल्यामुळे टिकवता आलेले नाही. विद्यमान सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नियूक्त केली आहे त्या अशोक चव्हाण यांच्या समितीनेही मराठा समाजाच्या इतर संघटनेचे म्हणणे, बैठका घेतलेल्या नाहीत. सुप्रिम कोर्टात या आरक्षण संदर्भात जी वकील मंडळी नियूक्त केली ती अनुभव नसलेली होती. त्यामुळे इथून पुढे मराठा समाजासाठी राज्य सरकारने अद्यादेश काढावा, सोबतच सुप्रिम कोर्टातही राज्य सरकारने दिलेले आरक्षण टिकावे यासाठी खा.उदयनराजे भोसले यांनी सर्व संघटनांना सोबत घेवून दिशा ठरवावी असेही आ.विनायक मेटे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष काकडे, बबन माने, घुमरे आदी मान्यवर उपस्थित होते.

ऊसतोड कामगार मुकादम यांच्या संबंधातील लवाद अमान्य,
ऊसतोड कामगार यांच्यासाठी राज्य सरकारने समितीची स्थापना करावी-आ.विनायक मेटे
बीड जिल्ह्यातील साडे आठ लाख ऊसतोड कामगार पश्‍चिम महाराष्ट्रात ऊसतोडणीसाठी जातात. यामध्ये बैलगाडीने ऊसतोड करणारे कामगार, मुकादम यांचे अनेक प्रश्‍न प्रलंबीत आहेत. दिवंगत गोपीनाथ मुंडे हे गेल्यानंतर ऊसतोड कामगारांसाठी कोणीही नेता उरलेला नाही. त्यांच्यानंतर ऊसतोड कामगारांच्या संदर्भाने जो लवाद स्थापन झालेला आहे तो आता कालबाह्य झालेला असून राज्य सरकारने ऊसतोड कामगार आणि मुकादम यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी एक समिती स्थापन करावी असे मेटे यांनी सांगितले. मेटे हे मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित प्रेसमध्ये ऊसतोड कामगारांच्या प्रश्‍नावर बोलत असतांना कामगारांचा विमा, त्यांना ऊसतोडणीचा दर, मुकादमाचे कमिशन, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ज्या साखर शाळा आहेत त्या बंद करून ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी १०० निवासी आश्रमशाळा स्थापन कराव्यात आणि ऊसतोड कामगारांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी सरकारने मुकादमाचे प्रतिनिधी, कामगारांचे प्रतिनिधी, कारखान्याचे प्रतिनिधी, राज्य सरकारने साखर संचालकाचे प्रतिनिधी या सर्वांची एक समिती स्थापन करावी त्या समितीद्वारे ऊसतोड कामगारांचे सर्व प्रश्‍न सोडवावेत, वेळप्रसंगी या सर्वांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी खा.शरदचंद्र पवार यांनीही मध्यस्थी करावी असे सांगून येत्या २० तारखेपर्यंत सरकारने ऊसतोड कामगारांचे सर्व प्रश्‍न सोडवले नाहीत तर २० ते २५ तारखेच्या दरम्याना ऊसतोड कामगारांच्या, मुकादमाच्या सर्व संघटनांना सोबत घेवून बीड जिल्ह्यामध्ये भव्य असा सर्वांचा मेळावा घेण्यात येईल असेही विनायक मेटे यांनी सांगितले. त्यासाठी शिवसंग्रामच्या वतीने महाराष्ट्र ऊसतोड कामगार, मुकादम, वाहतूक संघटना स्थापन केली आहे या संघटनेच्या माध्यमातून ऊसतोड कामगार, मुकादम सर्वांचे प्रश्‍न सोडवले जातील असेही विनायक मेटे म्हणाले.


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like