गोदावरीला पुर, नदीकाठच्या गावात भिती 

eReporter Web Team

राक्षसभुवनचे शनि मंदिर, पांचाळेश्वर, गंगामसल्याचे मोरेश्वर मंदिर पाण्याखाली
गोदाकाठच्या ३२ गावांना सतर्कतेचा इशारा, माजलगाव तालुक्यातील सांडसचिंचोलीचा संपर्क तुटला, नागझरी बंंधार्‍यावरून पाणी, २००७ च्या आठवणीने नदीकाठच्या गावात भिती 
गेवराई/माजलगाव (रिपोर्टर)- पैठणच्या नाथसागर धरणाचे सर्वचे सर्व २७ दरवाजे उघडून ९४ हजार ३२० क्युसेक्सने गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील शनि मंदिर पाण्याखाली गेले आहे तर पांचाळेश्वर येथील मंदिरही पाण्याखाली आले आहे. इकडे माजलगाव तालुक्यातही सिंधफणा दुथडी वाहत असून सिंधफणा नदीच्या पुलावरून पाणी गेल्याने सांडस चिंचोली या गावचा संपर्क तुटला आहे. माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील मोरेश्वराचे मंदिरही पाण्याखाली गेले असून गेवराई तालुक्यातील ३२ गावांना संभाव्य धोक्याची शक्यता वर्तवून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. २००७ साली नाथसागरातून २ लाखापेक्षा जास्त क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले होते तेव्हा गोदामायने गेवराई तालुक्यातील शेकडो गावांची स्थिती उद्ध्वस्त केली होती. त्यामुळे या परिसरातील गावात भीतीचे वातावरण दिसून येत आहे. 

   पैठणच्या नाथसागरातून गोदावरी नदी पात्रात ९४ हजार ३२० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जायकवाडीचे सर्वचे सर्व २७ दरवाजे दोन ते चार फुटाने उघडण्यात आले आहेत. दहा ते २७ दरवाजे चार फुटाने उघडण्यात आले असून एक ते नऊ दरवाजे दोन फुटांनी उघडण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे. लाखाच्या आसपास क्युसेसने गोदावरीच्या पात्रात पाणी येऊ लागल्याने गोदावरीने आक्राळ-विक्राळ रुप धारण केले असून शहागड नजीकचा नागझरी बंधारा ओसंडून वाहत आहे. गेवराई तालुक्यातून गोदावरी जात असल्याने कुरणपिंप्री ते तपेनिमगाव या दरम्यान जवळपास ७० ते ८० गावे आहेत. २००७ साली या सर्व गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला होता. आजही मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्यामुळे गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील शनिमंदिर, पांचाळेश्वर येथील मंदिरे पाण्याखाली गेले आहेत. त्याचबरोबर गोदावरी नदी काठच्या ३२ गावांना संभाव्य धोका पाहता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तिकडे माजलगाव तालुक्यातही सिंधफणा नदी दुथडी वाहत असून गंगामसला येथील मोरेश्वराचे मंदिर पाण्याखाली गेले आहे. तर सिंधफणा नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने सांडसचिंचोली या गावचा संपर्क तुटला आहे. 

गेवराई तालुक्यातील या गावांना आहे धोका...
गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीपात्रातले मंदिरे पाण्याखाली गेले आहेत. पात्रा नजीक असलेले राक्षसभुवन, पांचाळेश्वर येथील प्रसिद्ध मंदिरेही पाण्याखाली असून तालुक्यातील राक्षसभुवन, राजापूर, हिंगणगाव, आगर, नांदूर, पांगुळ गाव, गंगावाडी, काठोडा, नागझरी, बोरगाव थडी, पांढरी, मिरगाव, रामपुरी, राहिली, मिरगाव, मनु जवळा, गुंतेगाव, पाथरवाला, गोपत, पिंपळगाव, श्रीपत अंतरवाला, बोरगाव (बु.), गोदी (खु.), सावळेश्वर, खामगाव, संगम जवळा, सुरेगाव, पांचाळेश्वर या गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like