क्राईम डायरी- मेहुण्याच्या जमिनीवर नजर पडली; बायकोने नकार देताच जिवंत जाळली

eReporter Web Team

हुंडा हा विवाहितेच्या मानगुटीवर बसलेलं एक भूत आहे. ते भूत त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी केल्याशिवाय उतरत नाही. हुंडाबंदी ही केवळ कागदावर आणि सभा गाजवून टाळ्या मिळवण्यापुरतीच आहे. कारण हुंड्याच वास्तव वेगळच दिसतंंय. आजही हुंड्यापायी गरिबांच्या लेकीचे संसार मोडतात. तर काहींना जिवंत जाळले जाते. हुंडा लग्नांतच नाही तर लग्न झाल्यावरही विविध कारणं काढून स्वतःची हाऊस भागवण्यासाठी माहेर कडून पैसे आण म्हणत विवाहितेचा छळ होतो. अशीच एक घटना गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून तुला एकच भाऊ आहे त्यामुळे तू आर्धी जमीन वाटून घे आणि घर बांधण्यासाठी व गाडी घेण्यासाठी पैसे आण म्हणत एका दोन लेकराच्या आईचा सासरकडून छेळ सुरू झाला. त्या चळाचा अंत एवढा करुण झाल की तीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आले.
शिरूर तालुक्यातील पाडळी येथील महादेव निवृत्ती पाखरे यांना दोन अपत्य एक मुलगा आणि एक लाडाची  लेक. मात्र जेव्हापासून लेकीच लग्न झालं. तेव्हापासून तिच्या सासरी तिचा हुंड्यासाठी छळ होत होता. लग्नाला बारा वर्षे लोटली होती आणि लेकीला दोन मुलं झाली होती. त्यामुळे आज ना उद्या सासरचे लोक बदलतील लेकीला जीव लावतील म्हणून महादेव पाखरे यांनी माहेरी आलेल्या लेकीला पुन्हा नांदवायला पाठवले. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच तिच्या सासरकडून फोन आला आणि पाखरे यांच्या कुटुंबीयांच्या काळजाचा ठोका चुकला कारण पोटची लेक दवाखान्यात असून ती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. काही दिवसापूर्वीच लेकीला सासरी पाठवले होते. तिचा पैशासाठी छळ सुरु होता. त्यामुळे आपल्या पोटच्या गोळ्यासोबत नेमक काय झालं.? या प्रश्‍नाने त्यांच्या उरात काऊर माजलं होतं. या विचारातच यांनी मुलगी ज्या दवाखान्यात ऍडमिट आहे तो दवाखाना गाठला अन् त्यांच्या समोर जे चित्र होते ते एका बापाला अपार वेदना देऊन जाणारे...
बारा वर्षापूर्वी शिरूर तालुक्यातील पाडळी येथील महादेव निवृत्ती पाखरे यांनी आपली एकुलती एक लाडाची मुलगी सविता हिचा विवाह गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील अंबादास लक्ष्मण खेडकर यांचा मुलगा गणेश अंबादास खेडकर याच्याशी लावून दिला. लग्न मोठ्या धुमधडाक्यात करत संसारोपयोगी वस्तूही दिल्या. लग्नानंतर चार वर्ष गणेश खेडकर आणि सविता यांनी राजाराणीचा संसार करत दोन गोंडस मुले जन्माला घातली. एक मुलगा आणि दुसरी मुलगी. माणसाची सर्वात मोठी संपत्ती आणि श्रीमंती असते ती म्हणजे त्यांची मुलं बाळा. नशिबानं गणेश खेडकर यांना दोन आपत्य देऊन मोठी श्रीमंती दिली होती. सर्व काही सुरळीत असतांना खेडकर कुटुंबीयांना घर बांधण्याची हाऊस झाली. त्यासाठी सून सविता हिने माहेरकडून पैसे आणावेत म्हणून सासरच्या लोकांनी तगादा लावला. मात्र आपल्या बापाची काय परिस्थिती आहे. हे सविताला चांगलंच ठाऊक होतं. तरी देखील सविताच्या मागे पैशाच टुमनं सासरचे लोक लावत असल्याने नाईलाजास्तव सविताने माहेरी पैसे मागिले. सविताच्या वडिलांकडे पैसे नसतांनाही त्यांनी पोरिच्या सुखासाठी नातेवाईकांकडून पैसे गोळा करून सविताच्या सासरी घर बांधण्यासाठी एक लाख रुपये दिले. घर बांधणे होत नाही की पुन्हा गाडी घ्यायला दोन लाख रुपये आन म्हणून सविताचा छळ सुरू झाला. त्यात तुला एकच भाऊ आहे, त्यामुळे आर्धी जमीन आपल्याला वाटून घे म्हणूनही छेळ करत नवरा मारहाण करू लागला. त्यानंतर घरातील सासू-सासरे ही सविताला नीट बोलत नव्हते तेही तिचा छळ करू लागले. या छेळाला कंटाळून सविता आपल्या माहेरी निघून गेली. माहेरी गेल्यानंतर तिने तिच्या आई-वडिलांना आपबीती सांगितली. मात्र आज ना उद्या सासरचे लोक बदलतील सर्व काही सुरळीत होईल म्हणून सविताला पुन्हा सासरी पाठवण्यात आले. मागील दोन वर्षांपूर्वी सविताच्या नंदेच्या लग्नामध्ये सविताच्या आई-वडिलांनी मोठा आहेर घेतला होता. नंदेचे लग्न झाले तेव्हापासून ननंद व तिचा नवरा सविता यांच्या घरीच चकलंबा येथे राहत होते. ते पण सविताचा छळ करू लागले. तिला उपाशीपोटी ठेवून मारहाण होऊ लागली. पोटच्या पोरांना देखील सविताला बोलू देत नव्हते. त्यामुळे सविताच्या आईवडिलांनी तिच्या सासरच्या सोबत बैठक घेऊन त्यांना समजावून सांगितले होते. आणि सविता सासरी गेली. त्यानंतर दिनांक १७ -६ -२०२० रोजी संध्याकाळी जेवण करून सविता त्यांच्या घराच्या छतावर झोपण्यासाठी गेली अंदाजे साडे दहा अकराच्या सुमारास नवरा गणेश अंबादास खेडकर हा सविताकडे आला व ‘तुला तुझ्या आई-वडिलांकडून पैसे घेऊन ये म्हटलं होत ना’, ‘का पैसे घेऊन येत नाही‘, ‘जमिन का वाटून घेतली नाही’ म्हणत मारहाण करू लागला ‘तुला आज जिवंत मारून टाकतो’ असे म्हणून शिवीगाळ करत धमक्या देत असल्याने सविता छतावरून रूममध्ये येऊन झोपली. त्यानंतर अंदाजे बारा वाजण्याच्या सुमारास नवरा गणेश खेडकर हा दुचाकी मधील पेट्रोल काढून ते एका मगामध्ये घेऊन सविता झोपलेल्या रूममध्ये आला व सविताच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवे मारण्याच्या उद्देशाने काड्याची पेटी काढून काडी ओढत तिच्या अंगावर फेकली. त्यावेळी सविताच्या अंगावरील साडीने पेट घेतला व त्यामध्ये सविताच्या पोटाला, पाटीला, दोन्ही पायाला भाजून जखमा झाल्या. सविताच्या अंगाला आग लागलेली असतांना जवळ नवरा गणेश अंबादास खेडकर, सासरा बादास लक्ष्मण खेडकर, सासू गीता अंबादास खेडकर, ननंद बालूबाई ज्ञानेश्वर सोनवणे, दिर युवराज अंबादास खेडकर व ज्ञानेश्वर सोनवणे हे तेथे असतांना त्यांनी सविताला विजवले नाही. त्यामुळे सविताने पेटतेे शरीर घेऊन शेजारी असलेल्या हाऊदामध्ये उडी मारली व शरीराची लाहीलाही होत असल्याने तिने आरडाओरड केली. ही आरडाओरड ऐकून शेजारपाजारचे लोक आल्यानंतर सविताचा नवरा व नणंद यांनी सविताला खाजगी जीप करून शेवगाव येथील नित्यसेवा हॉस्पिटल मध्ये नेले. मात्र सविता गंभीर भाजल्यामुळे त्यांनी सविताला घेतले नाही. त्यामुळे त्यांना सरकारी दवाखाना अहमदनगर येथे जाण्याचा सल्ला दिला. त्यावरून  सविताला घेऊन ते अहमदनगरच्या सरकारी दवाखान्यात गेले व ऍडमिट केले. त्यानंतर दोन दिवस सविताच्या माहेरी याची कानोकान खबरही  लागू दिली नाही. मात्र दोन दिवसानंतर त्यांना सांगण्यात आले तुमची मुलगी गंभीर असून ती नगरच्या सरकारी दवाखान्यात ऍडमिट आहे. त्यामुळे सविताच्या माहेरच्या लोकांनी सरकारी दवाखान्यात धाव घेताच सविताच्या सासरकडील सर्व लोक फरार झाले. सविताने घडला प्रकार आई-वडिलांना सांगितला. घटनेची माहिती चकलांबा पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिस ठाण्याचे सपोनि देशमुख, पीएसआय बी.व्ही. झिंजुर्डे, पोलीस नाईक वनवे यांनी धाव घेत घटनेचा पंचनामा केला.  त्यानंतर सविताचा दवाखाण्यात जावून पोलिसांनी जॉब  घेतला. सविताने दिलेल्या फिर्यादीवरुन सुरुवातीला चकलंबा पोलिस ठाण्यात वरील सर्व आरोपिविरुध्द चकलंबा पोलिस ठाण्यात  गु.नं. १८०/२०/  कलम ३०७ प्रमाणेे गुन्हा दाखल झाला. त्यानंत कविता २० दिवस मृत्यूशी झुंज देत असतांना झुंज व्यर्थ ठरली आणि ८ जुलै  २०२० रोजी रात्री सविताने अखेरचा श्वास घेतला.  त्यापूर्वीच एक जुलै २०२० रोजी पोलिसांनी सविताच्या नवर्‍याला चकलांबा येथून अटक केली. व २ जुलै रोजी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यावेळी पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली देत ज्या गाडीतून पेट्रोल काढले ती गाडी व मग पोलिसांना दिला. त्यादरम्यान त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी सविताच्या अंगावरील कपडे फेकून दिले होते तेही पोलिसांनी जप्त केले. सविताचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी यामध्ये कलम वाढवून ३०७,४९८ (अ),३२३,५०४,५०६,३४,३०२ व पुरावा नंष्ट केला म्हणून २०१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. इतर पाच फरार आरोपीच्या पोलिसांनी ९ जुलै रोजी मुसक्या आवळत त्यांना न्यायालयात हजर केले असता १० तारखेपर्यंत पोलिस कस्टडी देण्यात आली. त्यानंतर सासू-सासरे यांना ८ सप्टेंबर २०२० रोजी अटक केली. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून सध्या आरोपी जेलमध्ये आहे. या घटनेचा संपूर्ण तपास तत्कालीन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, डीवायएसपी स्वप्निल राठोड, चकलांबा पोलिस ठाण्याचे सपोनि. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बप्पासाहेब झिंजुर्डे यांनी पूर्ण केला. या कामी त्यांना पोलीस शिपाई अमोल अवसरमल, महादेव रुईकर, पो.ह.बळीराम आघाव यांचे सहकार्य लाभले. पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे.


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like