ऊसतोड कामगारांनो आता स्वत: गोपीनाथ मुंडे व्हा!-आ.विनायक मेटे कारखानदारांची बाजू घेणारा लवाद बंद करा

eReporter Web Team

ऊसतोड कामगारांनो आता स्वत: गोपीनाथ मुंडे व्हा!-आ.विनायक मेटे कारखानदारांची बाजू घेणारा लवाद बंद करा

बीड (रिपोर्टर): ऊसतोड कामगारांचा लवाद हा कामगाराची बाजू घेत नाही तर कामगाराच्या नावावर कारखान्याची बाजू घेत आहे. कामगारांच्या प्रश्‍नावर बोलण्यापेक्षा कारखान्याच्या प्रश्‍नावर बोलणारे इथे मोठ्या प्रमाणावर आहेत. फक्त आणि फक्त स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडेच ऊसतोड कामगारांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देत होते. आता मुंडे साहेबांचं नाव घेतलं जातं मात्र त्यांच्या विचारांना तिलांजली देत कामगारांकडं दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे प्रत्येक ऊसतोड कामगाराने आता स्वत: गोपीनाथराव मुंडे व्हावं, अन् अन्यायाविरूद्ध उभं राहावं असं आवाहन शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ.विनायक मेटे यांनी करून सध्याच्या लवादावर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर हल्ला चढवला. ते मांजरसुंबा येथे आयोजित ऊसतोड कामगारांच्या मेळाव्यात बोलत होते. पुढे बोलतांना आ.मेटे म्हणाले की, ऊसतोड कामगारांबाबतचा जो लवाद आहे तो लावाद फसवा आहे. तो कामगारांसाठी नाही तर कारखानदारांसाठी आहे, 17 नोव्हेंबर 2015 रोजी झालेला करार वाचून दाखवत या करारामध्ये ऊसतोड कामगारांसाठी काहीच नाही तर कारखानदारांसाठीच सर्व काही असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. स्व.गोपीनाथराव मुंडे हे ऊसतोड कामगारांच्या प्रश्‍नावर लढायचे, भांडायचे परंतू आताचे स्वत:ला ऊसतोड कामगारांचे नेते म्हणणारे, ऊसतोड कामगारांच्या नावावर कारखान्याचं हित पाहत आहेत. त्यामुळे प्रत्येक ऊसतोड कामगाराने स्वत: गोपीनाथ मुंडे होवून आपल्या अन्यायाविरूद्ध आवाज उठवायला हवा. काहीजण म्हणतात मेटेंचा आणि ऊसतोड कामगारांचा संबंध काय? मी म्हणतो मुंबई राहणार्‍यांचा आणि ऊसतोड कामगारांचा संबंध काय? मी तर या मातीत जन्मलो, ऊसतोड कामगारांसोबत लहाणाचा मोठा झालो, त्यामुळे यापुढे ऊसतोड कामगारांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, त्यामुळे मी कोणाच्याही अंगावर जायला तयार आहे. सध्या सुरेश धस या प्रश्‍नावर बोलताना दिसून येतात. माझ्या ऐकीव माहितीनुसार त्यांना त्यांच्या तालुक्यापुरतीच जबाबदारी दिली होती परंतू ते महाराष्ट्रभर कोणाच्या आदेशाने फिरतात हे मला माहित नाही. सुरेश धस यांनी आमच्यासोबत यावं असं आवाहन करून आ.मेटेंनी ऊसतोड कामगारांचा धर्म आणि जात ही कामगारच आहे. त्यामुळे कामगारांच्या कष्टाला त्यांच्या अधिकाराला, मोबदला मिळालाच पाहिजे. राज्यात सर्व कामगारांसाठी कायदा आहे परंतू ऊसतोड कामगारांसाठी कायदा नाही. तो कायदा झाला पाहिजे. कारखान्यांना पैसे देयला तुमच्याकडे पैसे आहेत परंतू ऊसतोड कामगारांना पैसे द्यायला पैसे नाहीत, लाजा वाटल्या पाहिजेत. सत्ताधार्‍यांना आणि ऊसतोड कमागारांच्या नावावर आंदोलन करणारांना. आता स्व.मुंडे साहेब तुमचे प्रश्‍न सोडवण्यासाठी येणार नाहीत त्यामुळे तुम्हालाच गोपीनाथ मुंडे व्हावे लागेल. या प्रश्‍नी मी सहकार मंत्र्यांकडे गेलो, अन्य मंत्र्यांकडे गेलो, ऊसतोड कामगारांचा थोडाफार कळवळा असणारे धनंजय मुंडे यांच्याकडेही गेलो, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर निवेदन दिले. मात्र या प्रश्‍नी अद्यापही काहीच उत्तर मिळाले नाही, सध्याचा लवाद आहे तो ऊसतोड कामगारांच्या विरोधातला आहे, आधी हा लवाद बंद करा, हा लवाद आम्हाला मान्य नाही. जो लवाद कामगारांची बाजू घेत नाही, जो लवाद कारखानदारांची बाजू घेतो तो बंद झाला पाहिजे. ऊसतोड कामगारांसाठी शासनाने एक कमिटी तयार करावी अशी मागणी यावेळी विनायक मेटेंनी केली. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये निवासी शाळा झाली पाहिजे. तीन वर्षांचा लवाद करार हा दोन वर्षाने झाला पाहिजे. थकहमीसाठी कारखाने शासनाकडून प्रत्येक वर्षाला पैसे घेतात आणि शासनही देतं. मग ऊसतोड कामगारांना का नको? असं म्हणत आ.विनायक मेटेंनी आजच्या मेळाव्यात चौफेर टिका केली.


अधिक माहिती: beed reporter

Related Posts you may like