‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देत अंबाजोगाईत आ. मुंदडा, दौंड यांच्या घरावर मोर्चा

eReporter Web Team

अंबाजोगाई (रिपोर्टर)- एक मराठा लाख मराठा यासह इतर घोषणांचे फलके हाती घेऊन आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आ. संजय दौंड आणि आ.नमिता मुंदडा यांच्या घरांवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये अनेकांची उपस्थिती होती. हा मोर्चा सकाळी आंबेडकर चौकातून निघाला होता. या मोर्चाचा समारोप आ. नमिता मुंदडा यांच्या घरासमोर करण्यात आला. दोन्ही आमदारांना आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

    सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने राज्यातील मराठा समाजात संताप व्यक्त केला जात आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करण्यात येत आहे. आज सकाळी अंबाजोगाई येथील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आमदारांच्या घरांवर मोर्चा काढण्यात आला. आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा आ. संजय दौंड यांच्या घरावर गेला. त्याठिकाणी लहान मुलींनी आपल्या मागण्यांचे निवेदन आ. दौंड यांना दिले. त्यानंतर सदरील मोर्चा आ. नमिता मुंदडा यांच्या घरावर गेला. त्याठिकाणीही आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे सादर केले. एक मराठा लाख मराठा यासह अन्य घोषणांचे फलक आंदोलनकर्त्यांच्या हातात होते. भगवा ध्वज घेऊन आंदोलनकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. 


अधिक माहिती: online beed reporter

Related Posts you may like