7 नोव्हेंबरला मातोश्रीवर ‘मशाल मार्च’ , उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांना हटवा -आ.मेटे

eReporter Web Team


बीड (रिपोर्टर)-मराठा आरक्षणासंदर्भातल्या सरकारच्या समितीने आणि
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरक्षण प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष दिलं
नाही. सगळा सावळा गोंधळ आहे. या बाबत 7 नोव्हेंबर रोजी वांद्रे येथील
मुख्यमंत्र्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी मशाल मार्च काढण्यात येणार
आहे.. या मशाल मार्चमध्ये आमदार-खासदार, नगरसेवक यांनी सहभागी व्हावे,
असे आवाहन करत मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळातील बेजबाबदार सदस्य आणि
हलगर्जीपणा करणारे समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना तात्काळ हटवा व
चांगल्या माणसाकडे जबाबदारी देऊन मराठा समाजाच्या प्रश्‍नाबाबत धोरण आखा,
अशी मागणी या मशाल मार्चमध्ये करण्यात येणार असल्याचे आ.विनायक मेटे
यांनी सांगितले.
ते बीड येथील शिवसंग्रामच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलत होते. या वेळी
मराठा आरक्षण युवा विद्यार्थी परिषदेचे अशोक सुखवसे, अ‍ॅड. शशीकांत
सावंत, अ‍ॅड. शेळके, बबनराव शिंंदे, अ‍ॅड. दोडके, मुकुंद गोरे हे उपस्थित
होते. पुढे बोलताना आ. मेटे म्हणाले की, 9 सप्टेंबरला न्यायालयाने
आरक्षणाला अंतरीम स्थगिती दिली तेव्हा अखंड महाराष्ट्रात समाजामध्ये
संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. आंदोलनं झाली, निषेध झाला, सदरचा
प्रकार हा सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाला. मंत्रिमंडळमंडळातील सदस्य
बेजबाबदारपणे बोलत आहेत. उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हलगर्जीपणाने
वागत आहेत. वकीलांमध्ये समन्वय नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या मराठा
आरक्षणाबाबतच्या हलगर्जीपणाच्या धोरणाविरोधात 7 नोव्हेंबर रोजी मशाल
मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. बांद्रा येथील मुख्यमंत्र्यांच्या
‘मातोश्री’ निवासस्थानी हा मशाल मोर्चा धडकणार आहे, त्याला शिवसंग्रामचा
पुर्ण पाठिंबा असून मी स्वत: शिवसंग्रामचे पदाधिकारी, कार्यकर्ते,
लोकप्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार असल्याचे आ. मेटे यांनी म्हटले. सदरचा
मशाल मार्च हा मंत्रिमंडळातील सदस्य बेजबाबदारपणे बोलत आहेत. उपसमितीचे
अध्यक्ष अशोक चव्हाण हलगर्जीपणाने वागत आहेत. चव्हाणांना पदावरून हटवून
योग्य व्यक्तीची निवड या पदावर करण्यात यावी, समाजाला न्याय देण्यासाठी
योग्य धोरण आखावे यासाठी हा मशाल मार्च निघणार असल्याचे त्यांनी या वेळी
सांगितले. 5 नोव्हेंबर रोजी मराठा आरक्षण युवा व विद्यार्थी परिषदेचे
आयोजन बीड जिल्ह्यातील मराठा समाजातील अभ्यासू युवकांनी केले आहे. या
माध्यमातून आम्ही सर्व युवक, विद्यार्थ्यांना आरक्षणासंबंधी मार्गदर्शन,
योग्य कायदेशीर माहिती मिळावी, आरक्षण लढ्यासाठी आवश्यक माहिती या
परिषदेतून दिली जाणार असल्याचे आ. विनायक मेटे यांनी सांगितले.


अधिक माहिती: beed

Related Posts you may like