
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा
बीड (रिपोर्टर)- अतिरिक्त पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा संकटाच्या काळात केंद्र सरकारने शेतकर्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, सोयाबीनला सहा हजार रुपये भाव द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. शेतकर्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास एकाही खासदाराला रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही, असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला.
परतीचा पाऊस धो दो बरसल्याने महाराष्ट्रातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकर्यांना केंद्र सरकारने नुकसान भरपाई द्यायला हवी, हेक्टरी २५ हजार रुपये द्यावे, त्याचबरोबर सोयाबीनला ६ हजार रुपये हमीभाव जाहीर करावा, कापूस खरेदी केंद्र अद्यापही सुरू झालेले नाहीत. ते तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी लावून धरली आहे. यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरामध्ये आंदोलन करण्यात आले. केंद्राने शेतकर्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले तर एकाही खासदाराला रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
अधिक माहिती: online beed reporter