ताज्या बातम्या

गद्दारी करणारी औलाद इथे जन्मालाच कशी येते? गद्दारांना पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश नाही -अजित पवार 

आष्टी (रिपोर्टर):- गद्दार शब्दालाही लाजवणारी गद्दारी करणारी औलाद इथं जन्मालाच कशी येते? काय दिलं नाही तुम्हाला, तुम्ही हक्कानी मागितलं ते ते दिलं. पवार साहेब हे देत आले, संधीचं सोनं करायचं की तिची राख करायचं हे ज्याने त्याने ठरवायचं असतं, परंतु कुणा कुणाच्या नसा-नसामध्येच गद्दारी असते. अशी माणसं जन्माला तरी कशी येतात? आणि कुठल्या मुहूर्तावर जन्मतात हेच समजत नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी थेट सुरेश धसांना लक्ष्य करत उद्याचा आमदार हा राष्ट्रवादीचाच असेल, असा विश्‍वास देत अशा गद्दारांना राष्ट्रवादीत पुन्हा घेणार नाही, असले चंगु मंगू आले आणि गेले, त्याने राष्ट्रवादीला काहीच फरक पडणार नाही. राष्ट्रवादी अभेद आहे, असेही पवार या वेळी म्हणाले. ते आष्टी येथे बाळासाहेब आजबे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशादरम्यान जाहीर कार्यक्रमामध्ये बोलत होते. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधान परिषदेचे आमदार अमरसिंह पंडित, आ. सतीश चव्हाण, बजरंग सोनवणे, माजी आ. राजेंद्र जगताप, उषाताई दराडे, संदीप क्षीरसागर, शिवाजी राऊत, महेंद्र गर्जे, महेबूब शेख, रेखा फड, सुनिल पाटील, नरेंद्र काळे, किशोर हंबर्डे, अण्णासाहेब चौधरी, ऍड. डी.बी. बागल, डॉ. हंबर्डे, जयसिंह सोळंके यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. 
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यातलंआणि केंद्रातलं सरकार हे पूर्णत: अकार्यक्षमशील आहे. लोकांना स्वत:च्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी थेट मंत्रालयावर जाऊन उडी मारावी लागते, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करावा लागतो यापेक्षा दुर्दैव ते काय असेल. आमच्या काळात कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांची कामे झाली मात्र या सरकारने कर्जमाफीही फसवी केली. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेच्या नावाखाली घोषणा केली खरी परंतु शेतकर्‍यांना त्या योजनेचा फायदा झाला नाही. शेतकर्‍याची चेष्टा, मस्करी आणि थट्टा या सरकारकडून चालू आहे. सध्या पाणी आहे परंतु वीज नसल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. सरकारने जर शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडण्याचं काम केलं तर लोकाहो त्यांना तिथच थांबविण्याचं काम आता करा. सरकारने राज्याचं आर्थिक गणित पूर्णत: बिघडवून टाकलं आहे. अवघ्या तीन वर्षाच्या कार्यकाळात या सरकारने दीड लाख कोटी रुपये महाराष्ट्रावर अतिरिक्त कर्ज करून टाकलं आहे. इथला शिक्षक, अंगणवाडी ताई, एसटी कर्मचारी, शेतकरी, सर्वसामान्य कोणीही समाधानी नाही. राज्यात आणि केंद्रात भाजपाचं सरकार आहे, मग आता कापसाला ६ हजार रुपये भाव का दिला जात नाही. हे सरकार बनवाबनवी करतय. यांच्या निष्क्रीयतेमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. कुपोषित बालके मृत्यूमुखी पडत आहेत. आता कुणावर गुन्हा दाखल करायचाय? असा सवालही अजित पवारांनी या वेळी उपस्थित केला. १५ तारखेपर्यंत खड्डे बुजवणार, आज १३ तारीख आहे. दोन दिवसात खड्डे बुजणार काय? आणि पुन्हा अर्धे डांबरावर पैशे खर्च करा आणि अर्धे मीडियावर पैसे खर्च करा, सांगणारे मंत्री या सरकारमध्ये आहे. भाजपाचे काही मंत्री दारू विकत नाही तर दारूला महिलांचे नाव द्या म्हणतात. लाजा ठेवा थोड्या असं म्हणून अजित पवारांनी सरकारलाही धारेवर धरलं. 

अधिक माहिती: Ashti

Best Reader's Review