मराठवाडाच नव्हे महाराष्ट्र झाला टँकरवाडा

eReporter Web Team

राज्यात ६ हजार टँकर सुरू; ११ लाखांपेक्षा जास्त जनावरे छावण्यात
बीड, नगर, औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता भडकली
बीड (रिपोर्टर):- दुष्काळाशी सामना करणार्‍या महाराष्ट्राची चिंता अधिक वाढत असून यंदा देशभरात मान्सून उशिरा दाखल होत असल्याने राज्यभरातली घालमेल अधिक वाढली आहे. सध्या राज्यात ६ हजार २३६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे तर ११ लाख १ हजार ५१५ जनावरे छावण्यांमध्ये आश्रयास आहेत. महाराष्ट्रातील बीड, नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तर या तीन जिल्ह्यात सर्वाधिक छावण्या असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाने माध्यमांना दिली. यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा केला जातो. त्याचबरोबर ३ लाख ९५ हजार ५२१ जनावरे छावण्यात आश्रयास आहेत.
या वर्षी राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न गेल्या चार महिन्यांपासून आ वासून उभा आहे. दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता अधिक होत आहे. आतापर्यंत राज्यात ६ हजार २३६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तर राज्य सरकारने सुरू केलेल्या चारा छावण्यांमध्ये ११ लाख १ हजार ५१५ जनावरे चारा-पाणी खात आहेत. यंदा मान्सून उशिराने दाखल होत असल्याने दुष्काळाची भयावहता अधिकच तीव्र झाली आहे. राज्यात सर्वाधिक टँकर औरंगाबाद, बीड आणि नगर जिल्ह्यात सुरू आहे तर चारा छावण्याही या तीन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असल्याचे जाणवते. बीड जिल्ह्याची भयावहता अधिक तीव्र असल्याचे स्पष्ट होते. नाशिक जिल्ह्यात ३६२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय, या ठिकाणी ४ हजार ५८६ जनावरे छावण्यांमध्ये दाखल आहेत. सातारा येथे २७१ टँकर तर ५५ हजार ३२ जनावरे छावण्यांमध्ये आश्रय घेत आहेत. सांगलीत १९९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. या जिल्ह्यात १८ हजार १९३ जनावरे छावण्यांमध्ये डेरेदाखल आहेत. जालन्यात ६६२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, या ठिकाणी २३ हजार ६९ जनावरे छावण्यांमध्ये आहेत. उस्मानाबादमध्ये २०६ टँकर चालू असून ७२ हजार २१ जनावरे छावण्यात डेरेदाखल आहेत. सोलापूरमध्ये ३३५ टँकर पाणीपुरवठा करत आहे तर १ लाख ५४ हजार ६७८ जनावरे छावण्यात आश्रयास आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ११४६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याठिकाणी ३० हजार ३९३ जनावरे आश्रयास आहेत. नगरमध्ये ८२७ टँकरने पाणीपुरवठा तर ३ लाख ३६ हजार २०३ जनावरे छावण्यात आश्रयास आहेत. बीड जिल्ह्यात ९४० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शेकडो छावण्यांमध्ये ३ लाख ९५ हजार ५२१ जनावरे आश्रय घेत आहेत. अद्यापही मान्सूनचा पाऊस पडला नसल्याने आणि नदी, नाले, तलावांतले पाणी पुर्णत: संपल्याने विहीर, बोअर पूर्णत: आटल्याने चिंता अधिक वाढीस लागली आहे


अधिक माहिती: beed

Related Posts you may like