वन विभागाच्या ३४ एकर जमीनीवर वनराई बहरणार

वन विभागाच्या ३४ एकर जमीनीवर वनराई बहरणार
समतल चर खोदून बिया पेरण्याचे काम सुरू 
बीड (रिपोर्टर):- देशातील एकमेव असलेल्या नायगाव येथील मयूर अभयारण्याची अतिक्रमीत ३४ एकर जमीन वनक्षेत्रपाल के.एम. गिते यांच्या प्रयत्नाने वन विभागाच्या ताब्यात आली असून या जमिनीमध्ये समतल चर खोदून बिया टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता या भागात कडु लिंब, करंज, खैर, सीताफळ आदी झाडांनी हा भाग बहरणार आहे.  
   पाटोदा तालुक्यातील नायगाव परिसरातील डोंगराळ भागात देशातील एकमेव मयूर अभयारण्य आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोरांची संख्या आहे. याबरोबरच ससे, हरीण, रान डुक्कर, निलगाय, तडस, कोल्हे आदी प्राणीही मोठ्या प्रमाणात वास्तव्य करून आहेत. कडक उन्हाळ्यात या प्राण्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे करत असताना या भागातील जवळपास ३४ एकर जमीन गेल्या २० वर्षांपासून परिसरातील शेतकर्‍यांच्या ताब्यात असल्याची बाब गिते यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही जमीन ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याबाबत वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आर.आर. काळे, रमेश सोनटक्के, अमोल सातपुते यांच्याशी चर्चा करून ही जमीन वनविभागाच्या ताब्यात घेण्यासाठी गिते यांनी प्रयत्न सुरू केले. याबाबत शेतकर्‍यांना नोटीस देऊन मालकीचे पुरावे सादर करण्याचे सांगितले. मात्र कोणाकडेही पुरावे नसल्याने कुणीही पुरावे सादर केले आहेत. त्यानंतर गिते यांनी हे अतिक्रमण हटवून वनविभागाची चौतीस एकर जमीन ताब्यात घेतली. या जमीनीमध्ये समतल चर खोदण्याचे काम सध्या सुरू असून यासाठी वन विभागाचे कर्मचारी ए.एन. देवगुडे, टी.जे. येदमल, जी.जी. पवार, संगिता राठोड, गायकवाड या कर्मचार्‍यांसह वनमजूर आर.जे. गुजर, हरीभाऊ वनवे, सदानंद सारूक, रामदास कदम हे जोमाने परिश्रम घेत आहेत. समतल चर खोदल्याने वाहून जाणारे पाणी अडवले जाणार असून हे पाणी जमीनीत मुरल्याने या भागातील जमिनीतील पाणी पातळीही वौणार आहे. याठिकाणी झाडांची संख्या वाढवण्यासाठी चर खोदल्यानंतर कडुलिंब, करंज, खेर, सीताफळ आदी झाडांच्या बियांची लागवड करण्यात येणार आहे. यामुळे या अभयारण्यामध्ये वनराई बहरणार असून वन्य प्राण्यांसाठी चार्‍याची सोयही करण्यात येरार आहे. यापुढे या भागात अतिक्रमण होऊच नये यासाठी सर्वत्र तारेचे कंपाऊन्ड घालण्यत येणार आहे.  एखादा प्रमाणिकपणे काम करणारा अधिकारी आल्यानंतर काय होऊ शकते हे वनक्षेत्रपाल गिते यांनी दाखवून दिले आहे. याठिकाणी कर्मचार्‍यांची कमतरता असली तरी जे कर्मचारी आहेत तेवढ्याच कर्मचार्‍यांवर ही वनरात्र बहारदार करण्यासाठी गिते यांचे परिश्रम कामी येणार आहेत. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review