पाण्यासाठी महिलांचा कलेक्टर कचेरीवर ‘आक्रोश’ 

पाण्यासाठी महिलांचा कलेक्टर कचेरीवर ‘आक्रोश’ 
संदीप क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली बीडकरांच्या संतापाला वाट, संतप्त महिलांकडून न.प.विरोधात प्रचंड घोषणाबाजी, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रिकाम्या हंड्यांचा ठणठणाट, 
तर मंत्र्यासंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही -संदीप क्षीरसागर 
बीडची पाणीटंचाई कृत्रीम -मा.आ.धांडे 
बीड (रिपोर्टर):- बीड नगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळ बीड शहरावर पाणी बाणीचे संकट कोसळले. सातत्याने नगरपालिकेला पाण्याची मागणी करूनही सत्ताधारी सत्तेची उब घेण्यासाठी धावपळ करत राहिले. परंतु बीडच्या जनतेला पाणी दिले नाही. अखेर संतापलेल्या शहरवासियांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आज पाण्यासाठी आक्रोश मोर्चा काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चात मोर्चेकर्‍यांनी नगरपालिकेविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. हातात हंडे घेऊन आलेल्या हजारो महिलांनी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात अक्षरश: बोटे मोडली. या वेळी संदीप क्षीरसागरांनी आजचा आक्रोश हा संयमाने घेतल्याचे सांगत बीडकरांना वेळीच पाण्याची व्यवस्था करा, नसता मंत्र्या-संत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा दिला. या वेळी माजी आ. सय्यद सलीम आणि माजी आ. सुनिल धांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत बीडकरांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. 
    बीड नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे बीड शहरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. २० ते २५ दिवसाला पाणी येत असल्याने सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसांना पाण्यासाठी भटकंती करावी लगात आहे. महिला वर्गाला कोसो दूर जावून पाणी आणावे लागत आहे. ही भयानक परिस्थिती गेल्या दोन महिन्यांपासून उद्भवलेली असताना बीड नगरपालिका प्रशासन या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहे. जे पाणी येत आहे ते दूषित येत आहे. त्यामुळे रोगराई वाढत आहे. या प्रकरणी नगरपालिका लक्ष देत नसल्याने आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर शहरवासियांचा जबरदस्त आक्रोश मोर्चा धडकला. मोर्चामध्ये हजारो महिलांनी प्रामुख्याने सहभाग नोंदवला होता. कोणाच्या कमरेवर तर कोणाच्या हातात, डोक्यावर पाण्याचे रिकामे हंडे दिसून आले. महिला वर्गामध्ये प्रचंड संताप त्यांच्या देहबोलीतून व्यक्त होत होता. घोषणाबाजीतून दिसून येत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चामध्ये हजारो महिलांनी सहभाग तर नोंदवला मात्र मोर्चा जसेजसे पुढे येत होता तसे तसे शहरातील लोक त्या मोर्चामध्ये सहभाग नोंदवत होते. दोन दिवसांपूर्वी मोर्चाचे आवाहन संदीप क्षीरसागर यांनी केलं आणि त्यांच्या हाकेला ओ देत संतापलेली बीड शहरातील जनता आज मोर्चामध्ये सामील झाली. हा मोर्चा जेव्हा कलेक्टर कचेरीवर येऊन धडकला तेव्हा संतप्त मोर्चेकर्‍यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नगरपालिकेविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. या वेळी मोर्चाचे नेतृत्व करणारे संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरातील जनतेला वेळीच पाणी द्या नसता रस्त्यावर मंत्र्यांच्या गाड्या अडवू, मंत्र्या-संत्र्यांना फिरू देणार नाहीत, असा इशारा दिला. 

...तर मंत्र्या-संत्र्यांना फिरू देणार नाही -संदीप क्षीरसागर
उपस्थित मोर्चेकर्‍यांसमोर बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते संदीप क्षीरसागर म्हणाले की, जेंव्हा बीडची जनता पिण्याच्या पाण्यासाठी वणवनण भटकंती करत आहे, वीस-वीस दिवसाआड पाणी येत अहे, नगरपालिकेत जावून पाण्यासाठी टाहो फोडत आहे तेव्हा नगरपालिकेतील सत्ताधारी आणि बीडचे आमदार मंत्रीपदासाठी मुंबईत बसून होते. त्यांना बीडच्या जनतेचे देणेघेणे उरले नाही. आजचा हा आक्रोश मोर्चा हा आम्ही संयमाने घेत आहेत.  वेळीच बीडच्या जनतेला पिण्याचे पाणी मिळाले नाही तर मंत्र्यासंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही. ज्यांना काल मंत्रिपद मिळालं त्यांना याआधीही मंत्रीपदे मिळालेले आहेत तेव्हा त्यांना बीडमध्ये साधे गटारे दुरुस्त करता आले नाहीत ते आता काय करणार? असा टोलाही संदीप क्षीरसागरांनी या वेळी लगावला. पाणीप्रश्‍न गंभीर घ्या, लोकांना पाण्यासाठी वणवण भटकू देऊ नका, जर पाण्याचं नियोजन केलं नाही, लोकांना पिण्यासाठी पाणी दिलं नाही तर रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराही संदीप क्षीरसागरांनी या वेळी दिला. 

बीड न.प. कृत्रिम पाणी टंचाई करत आहे -माजी आ. सुनिल धांडे
माजलगाव बॅक वॉटरचे पाणी बीड शहरातील जनतेला पिण्यासाठी नियोजन केले तर पुरणार आहे मात्र नगरपालिका तांत्रिक बाब उभी करून जाणूनबुजून बीड शहरातील जनतेला वेठीस धरत पाण्याची कृत्रीम टंचाई करत जनतेला वेठीस धरत आहे. बीडची जनता हे कधीही सहन करणार नाही. त्यामुळे नगरपालिकेने तात्काळ शहरातील जनतेला आठ दिवसात दोनदा पाणी सोडावे, असे माजी आ. सुनिल धांडे यांनी मोर्चाला संबोधित करताना म्हटले आहे. 


नगराध्यक्षांना पदावरून हटवावे
-माजी आ. सय्यद सलीम
बीडचे नगराध्यक्ष आणि नगरपालिका शहरातील नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरली आहे. मुबलक साठा असतानाही बीड शहरातील जनतेला पाणी दिले जात नाही. मुद्दामहून पाण्याची तीव्र टंचाई नगरपालिका प्रशासन आणि नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर करत आहेत. त्यामुळे त्यांना बरखास्त करावे, अशी मागणी माजी आ. सय्यद सलीम यांनी केली. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review