ज्यांना घर सोडावे लागले त्यांना गृहनिर्माणमंत्री केले ज्यांना रोजगार नव्हता त्यांना रोजगार हमीची जबाबदारी  क्षीरसागर-विखेंवर धनंजय मुंडेंची बोचरी टीका 

ज्यांना घर सोडावे लागले त्यांना गृहनिर्माणमंत्री केले
ज्यांना रोजगार नव्हता त्यांना रोजगार हमीची जबाबदारी 
क्षीरसागर-विखेंवर धनंजय मुंडेंची बोचरी टीका 
मुंबई (रिपोर्टर):- गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता आहे. देशात भाजप शक्तीशाली असल्याचे त्यांचे नेतृत्व सांगते. मात्र अन्य पक्षातल्या नेत्यांना आयात करून भाजपाने आपण कमकुवतच असल्याचे सिद्ध केले असून या निमित्ताने राजकीय भ्रष्टाचार उभ्या देशाला पहायला मिळाला. ज्यांना घर सोडावे लागले त्यांना महाराष्ट्रात गृहनिर्माण मंत्रिपद दिले गेले तर ज्यांना रोजगार नव्हता त्यांना रोजगार हमीची जबाबदारी दिली, अशी बोचरी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विखे-क्षीरसागरांचे नाव न घेता दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली. 
   धनंजय मुंडेंनी भाजपाकडून राजकीय भ्रष्टाचार होत असल्याचे म्हटले.  बीडच्या राजकारणाबाबत बोलताना मुंडे म्हणाले की, मी जेंव्हा राष्ट्रवादीत आलो तेव्हा क्षीरसागर, धस हे माझे नेते होते. पक्षाने मला विधान परिषदेची जबाबदारी दिली. मी काम करत राहिलो. बीड जिल्ह्यात जेंव्हा केव्हा गेलो तेव्हा क्षीरसागर-धसांना नेताच मानायचो परंतु त्यांचा राजकीय स्वार्थ मोठा होता. राष्ट्रवादीची सत्ता नसल्याने तो स्वार्थ पूर्ण होत नव्हता. म्हणून सत्तेत जायचं, मग दोष कोणाला द्यायचा म्हणून क्षीरसागर आणि धस हे मला दोष देतात, असं म्हणत अधिवेशन काळात सरकारकडून जाणीवपूर्वक माझ्यावर वेळोवेळी कुणाला ना कुणाला पुढे करत खोटे आरोप केले जातात, गुन्हे दाखल केले जातात. सरकारला जर असं वाटत असेल, या आरोपांनी आणि खोट्या गुन्ह्याने मी दबल परंतु मी अशा खोट्या आरोपांना भीक घालणार नाही. सर्वसामान्यांचे आणि शेतकर्‍यांचे प्रश्‍न मांडतच राहणार. मंत्र्यांचे भ्रष्टाचार काढतच राहणार. माझ्यावर केलेले आरोप आणि गुन्ह्यांची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. दोषी असेल तर सरकार जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहे. माझी चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी आणि त्यांच्या भ्रष्ट मंत्र्यांची चौकशी आम्हाला करू द्यावी, असे थेट आव्हानच या मुलाखतीतून धनंजय मुंडे यांनी दिले. महाराष्ट्रात सध्या भयावह दुष्काळ आहे. कोरडवाहू शेतकर्‍यांना ५० हजार आणि बागायतदार शेतकर्‍यांना एक लाखाची मदत द्या, अशी मागणी आम्ही वेळोवेळी केली. ज्या १६ मंत्र्यांचे आम्ही भ्रष्टाचाराचे पुरावे दिले आहेत त्यांच्या चौकशीचे काय झाले? असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित करून लोकसभा निवडणुकीत राष्ट्रभक्तीचा अंडरकरंट आम्हाला जाणवला नाही. आम्ही जीएसटी, नोटबंदी या विषयांवर लक्ष केंद्रित केले. जे बीड जिल्ह्यात निकाल लागले तसेच राज्यात आणि देशात लागले. लोक राष्ट्रभक्ती पुढे, देश भक्तीपुढे सर्व विसरून जातात, असे म्हणून धनंजय मुंडेंनी विधानसभा निवडणुकीमध्ये नक्कीच चित्र बदललेले असेल, असे म्हटले. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review