सहा महिन्यापुर्वी मंजूर झालेले कुक्कुटपालन पशुसंवर्धन विभागाने नामंजूर केले

सहा महिन्यापुर्वी मंजूर झालेले कुक्कुटपालन पशुसंवर्धन विभागाने नामंजूर केले
कुक्कडगांवच्या विधवा महिलेचे नाव कमी करुन ईतरांचे नाव केले समाविष्ट
कार्यालयासमोर कुटूंबासमवेत उपोषणाला बसण्याचा दिला ईशारा
बीड (रिपोर्टर)ः- प्रशासकीय कामकाजामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. सहा महिन्यापुर्वी कुक्कडगांव येथील एका महिलेला कुक्कुटपालन मंजुर करण्यात आले होते. आचारसंहिता संपल्यानंतर कामकाज सुरू करा असे आदेश पशुसंवर्धन विभागाने संबंधीत लाभार्थ्याला दिले होते.मात्र आचारसंहिता संपताच पशुसंवर्धन विभागाने नावात खालीवर केले. महिलेचे नाव कमी करुन इतराचे नाव त्यात समाविष्ट केले असून यामध्ये संबंधीत अधिकार्‍याने अर्थपुर्ण व्यवहार केला असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी विरोधात कारवाई करण्याची मागणी लाभार्थी महिलेने केली आहे.
अनुसुचीत जाती-जमातीच्या नागरींकांचा आर्थीक स्तर ंउचावा त्यासाठी शासनाच्यावतीने विविध योजना राबविल्या जातात. पशुसंवर्धन विभागाच्यावतीने नाविन्यपुर्ण योजना राबवण्यात येत आहे. सहा महिन्यापुर्वी कुक्कुटपालनसाठी अर्ज मागवण्यात आले होते. यामध्ये कुक्कडगांव येथे रुक्मीण गायकवाड यांनी आपला अर्ज संबंधीत कार्यालयाकडे दाखल केला होता. यात रुक्मीण गायकवाड यांची निवड करण्यात आली होती. त्यांना अडीच लाख रुपयांचे कुक्कुट पालन मंजुर करण्यात आले होते. तसे पत्र जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त बीडच्या कार्यालयाने गायकवाड यांना दिले हेाते याची यादी कार्यालयासमोर डकोवण्यात आली होती. लोकसभा निवडणुक झाल्यानंतर कुक्कुटपालनाचे कामकाज सुरू करा अशा सुचना पशुसवर्धन विभागाने गायकवाड यांना दिल्या होत्या. मात्र आचारसहिता संपताच रुक्मीण गायकवाड यांचे नाव लाभार्थीच्या यादीत नसल्याचे दिसून आले. याबाबत संबंधीतांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांशी विचारणा केली असता त्यांनी मात्र याबाबत उडवा उडवीची उत्तरे दिली. रुक्मीण गायकवाड यांच्या जागी इतरांचे नाव समाविष्ट करण्यात आले. या मध्ये संबंधीत अधिकार्‍यानी अर्थपुर्ण व्यवहार केला असल्याचा आरोप होत असून या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालून दोषी विरोधात कारवाई करावी नसता आपण जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयासमोर कुटूंबासमवेत उपोषणाला बसण्याचा विधवा महिला रुक्मीण गायकवाड यांनी दिला आहे. 

अधिक माहिती: beed

Best Reader's Review