ताज्या बातम्या

बीड मला नवीन नाही कामातून दाखवून देऊ नूतन पोलिस अधीक्षक पोद्दारांची पहिली पत्रकार परिषद

बीड मला नवीन नाही कामातून दाखवून देऊ
नूतन पोलिस अधीक्षक पोद्दारांची पहिली पत्रकार परिषद, रस्ते अपघात कमी होण्यासाठी विशेष मोहिम राबवणार

बीड (रिपोर्टर):-मी मराठवाड्यामध्ये काम केलेले आहे. त्यामुळे बीड मला नवीन नाही. कामातून ते दाखवूनच देणार आहे. वाळू माफियांवर एमपीईडी अंतर्गत कठोर कारवाईचे संकेत देत वाहतूक सुरळीत करण्यावर आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यावर आपण भर देणार असल्याचे नूतन पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी आपल्याच पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला नव्या पदभार घेतलेल्या अंबाजोगाईच्या अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, बीडचे अप्पर पोलिस अधिक्षक विजय कबाडे यांची उपस्थिती होती. 
   आज हर्ष पोद्दार यांनी आपल्या पदाचा चार्ज घेतला आणि तात्काळ पत्रकारांच्या प्रश्‍नांना ते सामोरे गेले. पुढे बोलताना पोद्दार म्हणाले की, बीडमध्ये माजी बदली झाल्याची बातमी मिळताच मला अनेकांचे ‘घर वापसी’चे मॅसेज आले. बीड मला नवीन नाही, माझी पहिली पोस्टींग २०१३ ला आयपीएस अधिकारी म्हणून वैजापूर (औरंगाबाद) येथे झाली होती. त्यामुळे मला मराठवाडा नवीन नाही. बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. बीडमध्ये वाळू संदर्भात उघडकीस आलेल्या घोटाळ्याची फाईल सकाळीच माझ्याकडे तत्कालीन एसपी श्रीधरांनी दिली. त्याचा अभ्यास करून वाळू माफियांसह त्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार.
चौकट....
वाहतूक पोलिसांना कारवाईचे टार्गेट राहणार नाही
यापूर्वी वाहतूक पोलिसांना प्रत्येक दिवशी दहा केसेस करण्याचे वरिष्ठांनी फर्मान काढले होते. मात्र नवीन एसपी पोद्दार यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांनी पोलिसांना कुठल्याही केसेसचे टार्गेट नसून वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यावर भर द्यावा, तशा सुचना वाहतूक पीआय यांना देण्यात येणार असल्याचे एसपी पोद्दार यांनी यावेळी सांगितले.

अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Best Reader's Review