ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांवर काळाचा घाला, दोन अपघातात  १२ ठार

विद्यार्थ्यांवर काळाचा घाला, दोन अपघातात  १२ ठार

गढी जवळ व्यायामपटू विद्यार्थ्यांना चिरडले, पुणे-सोलापूर रस्त्यावर ट्रक-कारचा 
भीषण अपघात; येवतचे ९ विद्यार्थी ठार

तळेवाडी येथे आज पहाटे घडली घटना
गेवराई (रिपोर्टर) :- व्यायामासाठी गेलेल्या तीन शालेय विद्यार्थ्यांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये दोघे जागीच ठार तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज पहाटे गेवराई तालुक्यातील गढी- माजलगाव राष्ट्रीय महामार्गावरील तळेवाडी फाटा येथे घडली. हे तिघेही शालेय विद्यार्थी तळेवाडी येथील असून ते पोलिस भरतीचा सराव करण्यासाठी दररोज पहाटे व्यायाम करत होते.
सुनिल प्रकाश थोटे (वय १६ वर्षे), तुकाराम विठ्ठल एमगर (वय १७ वर्षे) अभिषक भगवान जाधव (वय १५ वर्षे) असे अपघातात  ठार झालेल्या शालेय विद्यार्थ्यांचे नाव आहेत. पोलिस भरतीचा सराव करण्यासाठी तालुक्यातील तळेवाडी येथील ७ ते आठ युवक रोज पहाटे मुंबई- विशाखापट्टन्‌म या राष्ट्रीय महामार्गावरील तळेवाडी फाटा येथे व्यायाम करण्यासाठी जात होते. शनिवारी पहाटे सुनिल, तुकाराम व अभिषक हे तिघेच व्यायाम करण्यासाठी आले होते. ते तळेवाडी फाटा ते खांडवी पळण्याचा सराव करुन आल्यानंतर तळेवाडी फाटा (महामार्ग पोलिस चौकी) समोर व्यायाम काढत होते. याचवेळी अज्ञात वाहनाने तिघांनाही जोराची धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तुकाराम विठ्ठल एमगर हा गंभीर जखमी झाला होता. या घटनेची माहिती मिळताच महामार्गचे सहाय्यक पो.निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांच्यासह पोलीस नाईक साळुंके, मिसाळ, ऊबाळे, परजणे, पालवे, बांगर, चौघुले यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला तत्काळ १०८ च्या रुग्णवाहीकेने उपचारासाठी जिल्हारुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
तळेवाडीवर शोककळा
व्यायामासाठी गेलेल्या तिघांवर काळाने घाला घातल्याची माहिती सुर्य उगवण्यापूर्वीच तळेवाडीत वार्‍यासारखी पसरली. एकाच गावातील तिन विद्यार्थी मृत्यूमुखी पडल्याने गावात नातेवाईकांनी आक्रोश केला तर गावावर शोककळा पसरली.
आज तिघेच गेले होते व्यायामासाठी
तळेवाडीतील ७ ते ८ तरुण पोलिस भरतीची तयारी करत आहेत. त्यासाठी ते रोज पहाटे मुंबई- विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर तळेवाडी फाटा ते खांडवी फाट्यादरम्यान रोज पळण्याचा सराव करत असून तळेवाडी फाटा येथे व्यायाम करत होते. आज पाहाटे हे तिनच विद्यार्थी व्यायाम करण्यासाठी आले होते.
----
पुणे-सोलापूर रस्त्यावर ट्रक-कारचा 
भीषण अपघात; येवतचे ९ विद्यार्थी ठार

पुणे (रिपोर्टर):- सहलीवर गेलेल्या विद्यार्थ्यांच्या इरटीका गाडीने भरधाव वेगात दुभाजक तोडून समोरून येणार्‍या ट्रकला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात नऊ विद्यार्थी जागीच ठार झाल्याची आज पहाटे पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर जवळील कदम वाघ वस्ती, ग्रामपंचायतीसमोर घडली. अपघातातील सर्व विद्यार्थी हे येवत (ता. दौंड) येथील आहेत. या अपघातानंतर येवत शहरावर शोककळा पसरली आहे. 
   याबाबत अधिक असे की, दौंड तालुक्यातील येवत येथील नऊ विद्यार्थी यामध्ये अक्षय भारत वायकर, विशाल सुभाष यादव, निखील चंद्रकांत बावळे, सोनू ऊर्फ नूरमहंमद अशफाक अत्तार, परवेज अशफाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत घिगे, दत्ता गणेश यादव व जुबेर अजिज मुलानी हे सर्व मित्र येवतमधील विद्या विकास मंदिर शाळेत शिक्षण घेत होते. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते वेगळे झाले. परवा मात्र या सर्वांनी एकत्रीत येऊन रायगडसाठी सहल काढली आणि ते सहलीवर गेले. दुर्दैवाने ते परत येवतसाठी निघाले असता इरटीका चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदम वाघ वस्ती येथे दुभाजक ओलांडून इरटीकाने समोरून येणार्‍या ट्रकला जोराची धडक दिली. अपघात एवढा भयानक होता की, कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आणि या अपघातात नऊ जण जिवलग मित्र जागीच ठार झाले. सदरचा अपघात मध्यरात्री साडेबारा ते पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. गाडीमध्ये दोन जण अडकलेले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले. दुर्दैवाने या अपघातात नऊही जणांचा समावेश आहे. अपघातानंतर येवतवर शोककळा पसरली. 

अधिक माहिती: ऑनलाईन रिपोर्टर

Best Reader's Review